दिनविशेष ३१ डिसेंबर
दिनविशेष
दि. ३१ डिसेंबर
● निधन
१. (१९९७) सौदागर नागनाथ गोरे ऊर्फ छोटा गंधर्व यांचे निधन
मराठी रंगभूमीवरील नामवंत गायक नट. ‘सौदागर’ ह्या नावानेही परिचित. संपूर्ण नाव सौदागर नागनाथ गोरे. जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जवळच्या भाडळे या गावी. त्यांचे औपचारिक शिक्षण फारसे झाले नाही. मराठी रंगभूमीच्या इतिहासात बालनटांची नाट्यसंस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘बालमोहन संगीत मंडळी’चे मालक दामूअण्णा जोशी हे गोड गळ्याच्या मुलांच्या शोधात असताना त्यांना सौदागरांची माहिती मिळाली आणि त्यांच्या आईवडिलांची समजूत घालून त्यांनी सौदागर आणि त्यांचा धाकटा भाऊ पितांबर यांना आपल्या मंडळीत आणले. ‘बालमोहन संगीत मंडळी’ने रंगभूमीवर आणलेल्या प्राणप्रतिष्ठा ह्या पहिल्याच नाटकात सौदागरांना त्यांची पहिली भूमिका वयाच्या १० व्या वर्षी मिळाली आणि तीही नायिकेची. पुण्याच्या विजयानंद नाट्यगृहात हा प्रयोग झाला (२२ जुलै १९२८). सौदागरांच्या सुरेल आवाजाने आणि गाण्याच्या आकर्षक मांडणीने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या गंधर्वतुल्य आवाजामुळे दामूअण्णांनी आपल्या संस्थेतर्फे होणाऱ्या नाट्यप्रयोगांच्या जाहिरातींत सौदागरांचा उल्लेख ‘छोटा गंधर्व’ असा करण्यास सुरुवात केली आणि नंतर हेच नाव रूढ झाले.
‘बालमोहन’च्या अन्य काही नाटकांत कामे केल्यानंतर, ह्या संस्थेने सादर केलेल्या संशयकल्लोळ ह्या नाटकातल्या नायिकेची-रेवतीची त्यांनी केलेली भूमिका अतिशय गाजली. त्यांनी गायलेल्या अनेक पदांना प्रेक्षकांकडून पसंती मिळत असे. संगीतकलेत सौदागरांची अधिकाधिक प्रगती व्हावी म्हणून दामूअण्णांनी सौदागरांना उत्तमोत्तम गायकांची तालीम मिळेल, अशी व्यवस्था केली. बळवंत गोवित्रीकर, दत्तुबुवा बागलकोटकर, नरहरबुवा पाटणकर, धुळे येथील गायनशिक्षक गणेशबुवा पाध्ये ह्यांनी त्यांना आरंभी गाणे शिकवले. सवाई गंधर्वांचीही थोडीशी तालीम मिळाली. कृष्णराव गोरे, अब्दुल करीमखाँ, मा. दीनानाथ ह्यांचाही काही सहवास आणि मार्गदर्शन त्यांना मिळाले. मात्र १९३९ साली ग्वाल्हेर घराण्याचे गायक सेंदेखाँ ह्यांचा गंडा बांधून सौदागर त्यांच्याकडे शिकू लागले. हे लाहोरकडचे गवई तेव्हा मुंबईत राहत होते. पुढे १९४४-४५ साली ते कोल्हापूरला असताना भूर्जीखाँ यांच्याकडे गाणे शिकले. अनेकांच्या गायकीचे अनुभव व संस्कार लाभल्यामुळे जेथे जे चांगले गवसेल, ते घेऊन आपल्या स्वत:च्या गायकीचे सुंदर रसायन त्यांना घडविता आले. मुंबईत १९८० साली झालेल्या साठाव्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता
२. (२०१८) प्रसिद्ध हिंदी विनोदी अभिनेते कादर खान यांचे निधन
ते हिंदी चित्रपटांचे पटकथा लेखक आणि त्यांत अभिनय करणारे अभिनेते होते. ज्या चित्रपटाची कथा कादर खान लिहीत, किंवा ज्या चित्रपटात ते अभिनय करीत त्या चित्रपटांत ते स्वतःला पूर्णपणे झोकून देत. चित्रपटाचा ते कणा असत. त्यांच्या कथेत त्यांना मोडतोड होताना दिसली तर ते दिग्दर्शक-निर्मात्याशी भांडत, आणि कथेत का बदल केला हे दिग्दर्शकाने पटवून दिले की शांत होत. नंतर मात्र त्यांचे दिग्दर्शकाला पूर्ण सहकार्य असे
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment