दिनविशेष ३१ डिसेंबर
दिनविशेष दि. ३१ डिसेंबर ● निधन १. (१९९७) सौदागर नागनाथ गोरे ऊर्फ छोटा गंधर्व यांचे निधन मराठी रंगभूमीवरील नामवंत गायक नट. ‘सौदागर’ ह्या नावानेही परिचित. संपूर्ण नाव सौदागर नागनाथ गोरे. जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जवळच्या भाडळे या गावी. त्यांचे औपचारिक शिक्षण फारसे झाले नाही. मराठी रंगभूमीच्या इतिहासात बालनटांची नाट्यसंस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘बालमोहन संगीत मंडळी’चे मालक दामूअण्णा जोशी हे गोड गळ्याच्या मुलांच्या शोधात असताना त्यांना सौदागरांची माहिती मिळाली आणि त्यांच्या आईवडिलांची समजूत घालून त्यांनी सौदागर आणि त्यांचा धाकटा भाऊ पितांबर यांना आपल्या मंडळीत आणले. ‘बालमोहन संगीत मंडळी’ने रंगभूमीवर आणलेल्या प्राणप्रतिष्ठा ह्या पहिल्याच नाटकात सौदागरांना त्यांची पहिली भूमिका वयाच्या १० व्या वर्षी मिळाली आणि तीही नायिकेची. पुण्याच्या विजयानंद नाट्यगृहात हा प्रयोग झाला (२२ जुलै १९२८). सौदागरांच्या सुरेल आवाजाने आणि गाण्याच्या आकर्षक मांडणीने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या गंधर्वतुल्य आवाजामुळे दामूअण्णांनी आपल्या संस्थेतर्फे होणाऱ्या नाट्यप्रयोगांच्या जाहिरातींत स...