दिनविशेष २४ नोव्हेंबर
दिनविशेष
दि. २४ नोव्हेंबर
◆ जन्म
१. (१९३३) महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीचे शिलेदार, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा जन्म
इ.स. १९५२ पासून कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेले पानसरे अनेक सामाजिक चळवळीत सक्रिय होते. त्यांनी कामगारांसाठी तसेच घर कामगार महिलांसाठी अनेक लढे उभारले. ते कोल्हापूर टोलविरोधी आंदोलनातही अग्रभागी होते
कॉ. पानसरे शालेय जीवनापासूनच सामाजिक चळवळींकडे आकर्षित झाले होते. सुरुवातीला राष्ट्र सेवा दल व त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. दहा वर्षांसाठी ते भाकपचे महाराष्ट्र सेक्रेटरी होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ व गोवा मुक्ती चळवळीत ते सहभागी होते. तडजोड न करता समाजातील सर्वांत जास्त शोषित लोकांच्या हक्कांसाठी लढणारे ते कार्यकर्ता होते. ते कष्टकऱ्यांच्या शेकडो संघर्षांमध्ये सहभागी झाले व अनेकांचे नेतृत्वदेखील केले, विशेषतः असंघटित क्षेत्रांतील कामगार, शेतमजूर, घरकामगार, ऑटोरिक्षा युनियन, दूध उत्पादक, झोपडपट्टी रहिवासी, इत्यादी. कोल्हापुरमधील टोलविरोधी आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते या आंदोलनात अग्रभागी होते
कॉ. पानसरे हे एक लेखकसुद्धा होते व त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. शांतता व धर्मनिरपेक्षतेच्या अभियानांमध्ये ते अथकपणे कार्यरत होते. 'शिवाजी कोण होता?' हे त्यांच्या अनेक लेखनांपैकी सर्वांत प्रसिद्ध लेखन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची खरी माहिती लोकांपर्यंत जावी यासाठी त्यांनी अभ्यास करून 'शिवाजी कोण होता ?' हे पुस्तक लिहले. हे पुस्तक लहानचं असून पण शिवाजी महाराजांचे वेगळे विशेषगुण, पैलू दाखवणारे आहे. अथक परिश्रमाअंती त्यांनी ह्या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची इतिहासाशी इमान राखणारी प्रतिमा लोकांपर्यंत पोहचवून लोकशिक्षणाची महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. ह्या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे व १.५ लाखाहून जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत
२. (१९३७) मराठी भाषेतील कवी, लेखक आणि नाटककार केशव मेश्राम यांचा जन्म
वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतून लेखन करणार्या मेश्रामांचा मूळ पिंड कवीचा होता. ‘कविता’ हा त्यांचा विशेष आवडीचा साहित्यप्रकार. ‘रहस्यरंजन’ विशेषांकात त्यांची ‘मेळा’ ही पहिली कविता प्रसिद्ध झाली (१९५८). त्यानंतर त्यांनी सातत्याने काव्यलेखन केले. ‘उत्खनन’ (१९७७), ‘जुगलबंदी’ (१९८२), ‘अकस्मात’ (१९८४), ‘चरित’ (१९८९), ‘कृतकपुत्र’ (२००१), ‘अनिवास’ (२००५) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. डॉ. सुमतेन्द्र नाडिग यांच्या मूळ कन्नड भाषेतील चिंतनकाव्याचा त्यांनी ‘दाम्पत्यगीता’ हा मराठी भावानुवाद केला
दलित कवितेच्या प्रारंभ काळातील एक प्रमुख कवी म्हणून त्यांचा उल्लेख होतो. सर्व प्रकारच्या अनुभवांना मोकळेपणाने सामोरी जाणारी त्यांची कविता असून पारंपरिक लयीतील, तसेच मुक्तछंदात्मक लयीतील काव्यलेखनातून त्यांचे काव्यमूल्य सिद्ध होते. समाजातील दैन्य, दारिद्र्य, विषमता व जीवनाच्या सर्वच क्षेत्रांतील अनास्था भाव हे त्यांच्या काव्यलेखनाचे विषय होत. नव्या पिढीच्या ध्येयशून्य तडजोडीची वेदनाही त्यांच्या काव्यात उमटलेली दिसते. म्हणूनच ‘निसर्गाच्या विविध कळा - त्यांतल्या सर्व तरल छटांसह रंगवणार्या मेश्रामांच्या लेखनात शहरी जीवनातील रूक्ष व कडवट अनुभव तीव्रपणे चित्रित झालेले आहेत,’ असे शांता शेळके यांना वाटते
आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ अश्या दोन्ही प्रवाहांना एकत्र आणणारे कवी मेश्राम पुढे यंत्रयुगीन कुचंबणा व मानवी दुःखाना वाचा फोडणारे साहित्यिक म्हणून ओळखले गेले. उत्खनन, जुगलबंदी, अकस्मात हे त्यांचे काव्यसंग्रह गाजले
३. (१९४४) प्रतिभावान अभिनेते अमोल पालेकर यांचा जन्म
हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार आहेत. पालेकर यांनी सत्यदेव दुबे यांच्याबरोबर मराठी प्रयोगात्मक नाटकात रंगभूमीवर पदार्पण केले आणि नंतर 'अनिकेत' या नावाची स्वतःची नाट्यसंस्था १९७२ मध्ये सुरू केली. त्यांनी चित्रपटातील अभिनयाची सुरुवात इ.स. १९७१ सालच्या शांतता! कोर्ट चालू आहे या सत्यदेव दुबे दिग्दर्शित मराठी चित्रपटातून केली. या चित्रपटापसून नवीन मराठी चित्रपट चळवळ सुरू झाली असे समजले जाते. इ.स. १९७४ मध्ये अमोल पालेकर यांनी बासू चॅटर्जी यांच्या रजनीगंधा आणि छोटीसी बात या कमी खर्चात केलेल्या पण गाजलेल्या चित्रपटांत काम केले. यातूनच आणखी विनोदी चित्रपटांतून त्यांना 'मध्यमवर्गीय' माणसाच्या भूमिका मिळत गेल्या. नरम गरम, गोलमाल हे असे चित्रपट आहेत
४. (१९६१) बुकर पुरस्कार विजेत्या मानवाधिकार कार्यकर्त्या लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्म
या भारतीय साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या 'द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज' कादंबरीने इ.स. १९९७ वर्षीचा बुकर पुरस्कार जिंकला होता. रॉय यांच्या दोन पटकथा आणि अनेक लेखसंग्रहही प्रसिद्ध आहेत. अनेक सामाजिक, पर्यावरणविषयक आणि राजकीय मुद्द्यांवर रॉय यांनी लेखन केले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment