दिनविशेष २१ सप्टेंबर

दिनविशेष

दि. २१ सप्टेंबर

★ महत्वपूर्ण घटना

१. (१९१७) छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला 

शिक्षणातून फक्त सुशिक्षित समाज तयार करणे, इतकेच माफक उद्दिष्ट न ठेवता शिक्षण ही परिवर्तनाची गंगोत्री आहे ते सर्वांपर्यंत पोहचायला हवे. हे ध्येय बाळगून राजर्षी शाहू महाराजांनी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. २४ जुलै १९१७ रोजी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यासाठी कायदा केला होता. या जाहीरनाम्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी २१ सप्टेंबर १९१७ रोजी करण्यात आली होती

आजच्या काळात शिक्षणाचे बाजारीकरण व व्यापारीकरण होत असताना अपुरी साधनसंपत्ती व आर्थिक चणचण असतानाही शाहू महाराजांनी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची अंमलबजावणी केली. शाहू महाराजांनी १८९४ मध्ये कोल्हापूर संस्थानाचा कारभार हाती घेतल्यावर लोककल्याणाचे अनेक निर्णय घेतले. लोकोपयोगी कायदे केले. अज्ञानात असलेल्या समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी प्राथमिक शिक्षणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. सर्व जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची स्थापना केली. शाहूंनी २८ वर्षात १८ वसतिगृहांची स्थापना करून कोल्हापूरला ‘मदर ऑफ होस्टेल’ अशी ओळख मिळवून दिली. शहरात शिक्षणाची सोय असली तरी शिक्षणाची ज्ञानगंगा ग्रामीण भागात पोचवण्यासाठी शाहूंनी विशेष प्रयत्न केले

मोफत प्राथमिक शिक्षण आणि सक्तीचा कायदा प्रसिद्ध करताना त्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले की, ‘प्रत्येक गावातील पालकांनी ३० दिवसांत मुलांची नावे कळवावीत. नावे न कळवणाऱ्या पालकांना समन्स बजावण्यात येईल. जो विद्यार्थी शाळेत येणार नाही, त्याच्या पालकास दिवसाला एक रुपये दंड ठोठावला जाईल

१८९४ मध्ये संस्थानात २२१ शाळा होत्या तर १९२२ मध्ये शाळांचे प्रमाण ५५५ वर पोचले. १९१७ मध्ये या कायद्याची अंमलबजावणी झाली, तेव्हा १२९६ विद्यार्थी शिक्षण घेत होते. शाहूंच्या मृत्यूसमयी १९२२ मध्ये २२ हजार ७ विद्यार्थी शिक्षण घेत होते. शाहूंच्या शिक्षणाचे धोरण कोल्हापूर संस्थानासह संपूर्ण देशाने स्वीकारले. घटनेतही प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले

शाळांसाठी इमारती व पैसे नसतानाही राजर्षी शाहूंनी सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षणांसाठी कष्ट घेतले. आज जिल्हा परिषद, महानगरपालिकेसाठी इमारती, शिक्षक व निधी असतानाही शिक्षणाची हेळसांड होत आहे. शाहूंचे उठता बसता नाव घेणाऱ्या राज्यकर्त्यांनी त्यापासून धडा घ्यायला हवा



■ दिनविशेष 

१. जागतिक शांतता दिवस ( WorldPeaceDay )

द्वेषाची आणि दुजाभावाची पुसून टाकू आडवी रेष, 
एकजुटीने देऊयात सर्वजण शांततेचा संदेश

आपल्या जीवनात शांतीचं महत्व फार मोठं आहे. ज्या ठिकाणी शांती असते त्या ठिकाणी बंधुभाव, मधुरता, समाधान आणि आनंद असतो. शांतीविना जगण्याला कोणताच अर्थ नाही. याच शांततेचं महत्व सांगण्यासाठी जगभरात दरवर्षी २१ सप्टेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय शांती दिवस' (World Day Of Peace) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्षाची परिस्थिती संपवून शांतीला प्रोत्साहन देणं हा आहे

हा दिवस १९८२ पासून 'Right to peace of people'  या थीमसह सुरू करण्यात आला. १९८२ ते २००१ पर्यंत, सप्टेंबरचा तिसरा मंगळवार हा आंतरराष्ट्रीय शांतता दिवस किंवा जागतिक शांतता दिवस म्हणून साजरा केला जात होता. परंतु, २००२ पासून, २१ सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी जागतिक शांतता दिन साजरा केला जातो. जगभरात शांततेचा संदेश देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने कला, साहित्य, संगीत, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना शांतता दूत म्हणून नियुक्त केले आहे

जागतिक शांतता दिनी पांढरे कबूतर उडवून शांततेचा संदेश दिला जातो आणि एकमेकांनी शांतता राखावी अशीही अपेक्षा असते. पांढरे कबूतर शांतीचे प्रतिक मानले जाते. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघाकडून विविध संस्था, शाळा, महाविद्यालयांमध्ये शांतता दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केले जातात. जीवनाचे मुख्य ध्येय शांती आणि आनंद प्राप्त करणे आहे, ज्यासाठी मनुष्य सतत प्रयत्नशील असतो. परंतु, शांतीसाठी प्रयत्न करत नाही

२. राष्ट्रीय चमत्कार सत्यशोधन दिन ( National Miracle Exposure Day )

आजच्याच दिवशी २१ सप्टेंबर १९९५ रोजी, गणपती दूध पितो ही अफ़वा पसरविण्यात आली होती. अशा प्रकारचे चमत्कार सर्रास सांगितले जातात आणि लोक मोठ्या प्रमाणावर त्याला बळी पडतात. या गोष्टीत तथ्य नाही असे अंनिस संस्थेने दाखवून दिले. या दिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस अंनिस राष्ट्रीय चमत्कार सत्यशोधन दिन म्हणून साजरे करते

३. जागतिक कृतज्ञता दिवस ( World Gratitude Day )

आपल्या आजूबाजूला माणुसकी, मैत्री, नातं सांभाळणाऱ्या दोस्तांमुळे सारं काही आलबेल आहे. त्याबद्दल आपल्या हितचिंतक मंडळींना धन्यवाद म्हणण्यासाठी जगभरात दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी जागतिक कृतज्ञता दिवस (World Gratitude Day) साजरा केला जातो

४. जागतिक अल्झायमर दिवस ( World Alzheimer’s Day )

जागतिक अल्झायमर दिवस दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. १९९४ मध्ये 'अल्झायमर्स डिसीज इंटरनॅशनल'ला दहा वर्षे पूर्ण झाल्यामुळे अल्झायमर डे साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली

अल्झायमर म्हणजे माणसाला दुर्बल करणारा वार्धक्यातील विस्मृतीचा विकार. या आजारात रुग्णाची विचार करण्याची क्षमता नाहीशी होते आणि स्वत:कडे लक्ष देण्यासाठी तो असमर्थ होतो. या रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी 'अल्झायमर दिन' साजरा केला जातो

◆ जन्म 

१. (१९२९) शास्त्रीय गायक आणि संगीताचे अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म

सुस्पष्ट उच्चार, लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेवून मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचं मर्म होतं

अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवीत झाली ती १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित 'संगीत मत्स्यगंधा' या नाटकामुळे. या नाटकातल्या पदांचं संगीत अभिषेकींचे होतं. त्यांनी एकूण १७ नाटकांना संगीत दिलं

प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्त्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा. मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती

● निधन

१. (१९८२) मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचे निधन

अद्भुताकडे झुकणारी विमुक्त, स्वैर चमकदार कल्पनाशक्ती, सर्वस्पर्शी वृत्ती आणि उपहास-उपरोधाची छटा असलेला विनोद ही त्यांच्या काव्याची महत्वाची वैशिष्ट्ये होत. जीवनातील वैफल्य. नैराश्य आणि एकाकी पणाचे तीव्र दुःख त्यांच्या काव्यातून विलक्षण उत्कटतेने व्यक्त झालेले दिसते. यांखेरीज तरल संवेदनशीलता, निसर्गप्रेम आणि नवनवीन शब्दसंहतींचा वापर ही वैशिष्ट्येही त्यांच्या काव्यात दिसतात

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर