दिनविशेष १७ सप्टेंबर

दिनविशेष 

दि. १७ सप्टेंबर

★ महत्वपूर्ण घटना

१. (१७ सप्टेंबर १९४८)
मराठवाडा (हैदराबाद) मुक्तीसंग्राम दिन 

ब्रिटिश भारतात हैदराबाद राज्य नावाचे एक संस्थान होते. त्यात तेलंगणा, मराठवाडा, उत्तर कर्नाटक आणि विदर्भ या आधुनिक राज्यांचा समावेश होता. निजाम १७२४ ते १९४८ पर्यंत हैदराबाद राज्याचा कारभार पाहत होता. आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रदीर्घ हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर निजामाच्या कारकिर्दीविरुद्ध पोलिस कारवाई, हैदराबाद १९४८ मध्ये भारतात विलीन झाले

खरं तर, १७ सप्टेंबर १९४८ ची घटना भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाला कलाटणी देणारी होती. हैदराबादच्या लोकांनी या प्रदेशाला स्वतंत्र राष्ट्र स्थापन करण्याच्या निजामाच्या प्रयत्नांना पराभूत करण्याबरोबरच हा प्रांत भारताच्या संघराज्यात विलीन करण्याचा निर्णय घेतला

१५ ऑगस्ट १९४७ रोजी निजामाच्या संस्थानातील लोकांना दडपशाही आणि दडपशाहीचा सामना करावा लागला, जेव्हा उर्वरित भारत स्वातंत्र्य दिन साजरा करत होता, तेव्हा हैदराबाद राज्य भारताशी एकीकरण करण्याच्या आवाहनासाठी. निजाम आणि त्याच्या वैयक्तिक सैन्याच्या, 'रझाकार' च्या हिंसाचाराला न जुमानता हैदराबादचे लोक त्यांच्या स्वातंत्र्याच्या उत्कटतेवर कायम राहिले

तत्कालीन गृहमंत्री आणि 'लोहपुरुष' सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या धाडसी कृतीमुळे निजामाला भारतीय संघराज्यात सामील होण्यास भाग पाडले गेले, ज्यांनी पोलिस कारवाईचे आदेश दिले. हे १७ सप्टेंबर १९४८ रोजी घडले. ऑपरेशन पोलो हे या ऑपरेशनचे नाव होते. परिणामी, एकदा का उर्वरित भारत ब्रिटिशांच्या वर्चस्वातून मुक्त झाला, तेव्हा हैदराबादच्या लोकांना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी १३ महिने आणि दोन दिवस लढावे लागले

◆ जन्म 

१. (१८७९) महान क्रांतीकारी, सनातन धर्माचे विरोधक, द्रविड चळवळीचे जनक पेरियार रामास्वामी नायकर यांचा जन्म 

ते विज्ञान बोध आणि तर्क विषयाचे क्रांतीकारी विचारक होते. त्यांनी समाजातील अस्पृश्य, पीडित, व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा व समान अधिकार मिळाविण्याचा मार्ग दाखवला. पेरियार एकमेव असे क्रांतीकारक होते की त्यांनी दक्षिण भारतातील राजकारणामधुन ब्राम्हणवादाला सुरूंग लावला आणि समाज व्यवस्था बळकट केली तसेच तमिळनाडूच्या राजकारणात ब्राह्मणेत्तर समाजाला वर्तमान इतिहासातील राजकारणात बरोबरीने बसवले. तामिळनाडू राज्यात आज पण पेरियार रामस्वामी यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो

२. (१८८५) समाजसुधारक, पत्रकार, लेखक, वक्ते, इतिहासकार केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म   

ते मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. देवांचा धर्म की धर्माची देवळे हे त्यांचे पुस्तक फार प्रसिद्ध आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र आहेत

केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी साऱ्यांची दाणादाण उडवून दिली

सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. मग भले बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्न असो; ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहिले. त्यांच्या लढ्यापासून, तत्त्वांपासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, अनेक आमिषे दाखविली पण प्रबोधनकारांनी कशालाही दाद दिली नाही. अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला

समाजातील सर्व विकारांचे मर्म ब्राह्मणी कर्मकांडांत आहे असे त्यांचे मत होते. धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत, ते सर्व परिपाठ ब्राह्मणांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत. या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो. विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो. सारांश सर्व अशिक्षित जनता या रूढींखाली भरडली जाते असे वाटल्याने त्यांनी या सर्व घटकांच्या मुळावर, म्हणजेच ब्राह्मणशाहीवर घाला घातला. पुरोगामी, उदारमतवादी, सुधारक विचारांच्या ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात द्वेषभावना नव्हती. पण धंदेवाईक भट-भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते टीकाकार होते. संत एकनाथांच्या जीवनावरील ’खरा ब्राह्मण’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या ब्राह्मणांची भूमिका मांडली

त्यांच्या कार्यख्यातीमुळे ते राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले. शाहू महाराज हे स्वतः सुधारणावादी व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे ते प्रबोधनकारांचे चाहते झाले. त्यांनी प्रबोधनकारांची परीक्षाही घेतली व नंतर जाहीरपणे सांगितले की, लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे, ती म्हणजे प्रबोधनकार होय

मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी हुंडाप्रतिबंधक चळवळ हाती घेतली. सर्व जातींची हुंडाप्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन करून अनेक वरपित्यांना त्यांनी घेतलेल्या हुंड्याच्या रकमा परत देण्यास भाग पाडले. त्या काळी विवाहाआधी प्रेम करणे हा गुन्हा, व्यभिचार समजला जाई. अशा काळात त्यांनी अनेक प्रेमी युगुलांचे विवाह लावून दिले. आजच्या काळात हे संदर्भ वाचताना आपणास या गोष्टी सहज वाटतात, या समस्यांची तीव्रता आपल्या लक्षात येत नाही. त्या काळच्या कर्मठ वातावरणात समाजसुधारणांचा केवळ उच्चार करणेही अवघड होते. आजही हुंड्याविरोधात अनेक कायदे आहेत, पण हुंडा घेण्याच्या प्रवृत्तीचा समूळ नाश झालेला नाही. स्त्रियांवर अत्याचार होतच आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या समस्येची काय तीव्रता असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी! यावरून प्रबोधनकारांचे द्रष्टेपण सिद्ध होते

प्रबोधनकार हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्‍तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा (आत्मचरित्र) ही चरित्रे - अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. त्यांची ’खरा ब्राह्मण’ आणि ’टाकलेले पोर’ ही दोन्ही नाटके समाजसुधारणांसाठी क्रांतिकारकच ठरली. खरा ब्राम्हण या नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये अशी मागणी पुण्यातील ब्राम्हणांनी न्यायालयाकडे केली असता, न्यायाधीशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निकाल दिला होता

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा लढा होता. या वेळी त्यांचे वयही बरेच झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी या चळवळीला नेतृत्व दिले, काही काळ कारावासही भोगला. या चळवळीतील त्यांच्या योगदानाची बरोबरी फक्त प्रल्हाद केशव अत्रे आणि कॉम्रेड डांगे यांच्याशीच करता येईल. या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले. ते कुशल संघटकही होते


३. (१९२५) प्राच्यविद्यापंडित, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि कृषी संस्कृती, बुद्धविचार व अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र यांची नव्याने वैचारिक मांडणी करणारे, जातीव्यवस्थेविरोधात प्रखर लढा देणारे ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड शरद तानाजी पाटील यांचा जन्म

जातिभेद आणि लिंगभेद यामुळे निर्माण झालेल्या दास्याचा अंत घडवून आणण्याची कॉ. पाटलांची प्रेरणा अस्सल होती व तळमळही पराकोटीची होती, यात शंका नाही. त्यासाठी त्यांनी शाक्त तंत्राच्या अब्राम्हणी प्रवाहाचे जात्यंतक रूप पुढे आणले. दास-शूद्रांची गुलामगिरी या द्विखंडी अभिजात ग्रंथाद्वारे त्यांनी इतिहासपूर्व काळातील दास-शूद्रांच्या गुलामगिरीचा मूलभूत प्रश्न सर्व इतिहासकारांच्या विरोधात जाऊन पुढे आणला. प्राथमिक साम्यवादाच्या कम्युनिस्टांच्या गंधर्वनगरीला अनैतिहासिक ठरविले. मातृसत्ताक, स्त्रीसत्ताक समाजांचा इतिहास सर्वप्रथम साधार मांडला

४. (१९३८) लेखक, कवी आणि टीकाकार दिलीप पुरषोत्तम चित्रे यांचा जन्म 

हे मराठी कवी, कथालेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार होते. मराठी साहित्यविश्वातील मानाचे पान समजल्या जाणा-या 'लघुनियतकालिक चळवळी'मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या मराठी साहित्याची जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश भाषांतरे झाली आहेत

५. (१९३९) मराठी संतांचे चरित्र कादंबऱ्यातून रेखाटणारे लेखक प्रसिद्ध कवी, नाटककार, पटकथाकार रविंद्र सदाशिव भट यांचा जन्म 

हे मराठी संतांचे चरित्र कादंबऱ्यांतून रेखाटणारे लेखक, प्रसिद्ध कवी, नाटककार, पटकथाकार होते. त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह म्हणून काम केले होते. 'ते माझे घर' या चित्रपटाचे रवींद्र भट निर्माता होते. 'ते माझे घर' या चित्रपटास १९६३ सालचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे

६. (१९५१) समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्म

डॉ. राणी यांनी एम.बी.बी.एस. उत्तीर्ण केल्यानंतर त्यांचे पती प्रख्यात समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्याशी विवाहबद्ध होऊन समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. त्यांनी, आदिवासी स्त्रियांच्या आरोग्याविषयक समस्या व त्यांच्या भावविश्‍वाचा वेध घेणारी 'कानोसा' व 'गोईण' ही दोन पुस्तके लिहिली आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारासह महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

● निधन

१. (२००२) शब्दसंपन्न भाषा, वैविध्यपूर्ण विषय, विलक्षण शब्दचापल्य, हेवा वाटावा अशी लेखनशैली असणारे ज्येष्ठ कविवर्य वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट यांचे निधन

प्रा. बापट हे स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते. १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, ऑगस्ट १९४३ ते जानेवारी १९४५ पर्यंत ते तुरूंगात होते. १९४७ ते १९८२ पर्यंत ते मुंबई विद्यापीठात प्राध्यापक होते. १९८३ ते १९८८ पर्यंत ते सा. ‘साधना’चे संपादक होते. राष्ट्रसेवा दलाशी ते संलग्न होते. १९७२ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते

लहानपणापासून बापटांवर राष्ट्र सेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. ‘बिजली’ (१९५२) ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. ‘अकरावी दिशा’ (१९६२), 'सकीना’ (१९७२), आणि ‘मानसी’ (१९७७), हे त्याचे बिजलीनंतरचे काव्यसंग्रहातून त्यांच्या अनुभवांचे क्षेत्रही उत्त्तरोत्तर अधिकाधिक विस्तारत गेल्याचे दिसते. संस्कृत, बंगाली आणि इंग्रजी कवितेचा प्रभावही ह्या कवितेवर दिसून येतो. सामाजिक विषमता आणि अन्याय ह्यांच्या तीव्र जाणिवे बरोबरच यौवनाचा अभिजात डौल, निसर्गाच्या विभ्रम-विलांसाहून खटयाळ शृंगार व्यक्तविण्याची प्रवृत्ती, लावणीसारख्या जुन्या काव्यप्रकाराचे पुनरुज्जीवन करण्याचा रसिक प्रयत्न ह्यांच्या प्रत्यय त्यांच्या बिजलीनंतरच्या कवितेत येतो. त्यांच्या कवितेचे परिपक्व रुप मानसीमध्ये विशेषत्वाने जाणवते. ह्या काव्यसंग्रहातील त्यांची कविता मितभाषी; परंतु आशयदृष्टया अधिक गहन अशी आहे

जनजागृति करणे हेही कवितेचे एक महत्त्वाचे कार्य आहे, असे बापट मानत असल्यामुळे राष्ट्रीय संकटाच्या, दु:खाच्या वा देशातील विविध जन-आंदोलनांच्या प्रसंगी त्यांनी आपली संवेदनशील प्रतिक्रिया आपल्या कवितेतून व्यक्तविली आहे. ‘उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू’ ही त्यांची गाजलेली कविता किंवा त्यांनी रचिलेला ‘संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा’ हि त्याची काही उल्लेखानीय उदाहरणे होत. ‘गांधींची जीवनयात्रा’ (१९४८), ‘नव्या युगाचे पोवाडे’ (भाग १ ते ३), ‘सैन्य चालले पुढे’ (१९६५), ह्या त्यांच्या रचनाही या संदर्भात निर्देशनीय आहेत

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर