दिनविशेष ०२ सप्टेंबर

दिनविशेष

दि. ०२ सप्टेंबर

◆ जन्म 

१. (१८८६) साहित्यिक, विचारवंत, समाज सुधारणे साठी सतत प्रयत्न करणारे श्रीपाद महादेव माटे तथा श्री. म. माटे यांचा जन्म

माटे यांनी आयुष्यभर अस्पृश्योद्धाराचे काम केले. प्रासादिक, प्रसन्न, शैलीदार माटे हे विसाव्या शतकाच्या प्रथमार्धात कसदार व विपुल लेखन करणाऱ्यांपैकी एक होते. शिक्षक, कृतिशील सुधारक, नितळ-निर्व्याज 'माणूस' ही गुणविशेषणे त्यांना सार्थपणे लावली गेली. त्यांच्या आयुष्यातील लेखनपर्व तसे उशिरा सुरू झाले, पण एकदा सुरू झाल्यावर वीस वर्षे ते लिहीत राहिले. दहा हजारांहून जास्त भरतील इतकी छापील पृष्ठे त्यांच्या खात्यावर जमा आहेत. लेखनकाळ १९३० ते १९५५. संशोधन, संकलन, चरित्रे, वैचारिक, तत्त्वचिंतनात्मक, इतिहासमंथन, चालू घडामोडी, निबंध, ललितलेख... असा प्रचंड मोठा पट या लिखाणाचा आहे. पक्षिकेचा वारा ही त्यांची एकमेव कादंबरी

२. (१९५०) लेखिका, अपंगांना साहाय्यभूत ठरेल अशी ‘हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड' ही संस्था स्थापन करणाऱ्या नसिमा हुरजूक यांचा जन्म

● निधन

१. (१९७६) मराठी साहित्याचा मानबिंदू, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक विष्णु सखाराम खांडेकर तथा वि. स. खांडेकर यांचे निधन

वि. स. खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यांच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला

खांडेकरांच्या कथेत रचनाकौशल्य व तंत्रनिपुणता आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि. स. खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते

त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाले. त्यांच्या उल्का या कादंबरीवर मराठी चित्रपट निघाला. त्यांचे लेखन बहुविध स्वरूपाचे होते त्यात १५ कादंबऱ्या, ३१ लघुकथासंग्रह, १० लघुनिबंधसंग्रह, ६ रूपककथासंग्रह, १ नाटक आदींचा समावेश आहे


२. (२०११) गोरी गोरी पान, फुलासारखी छान या व अशा अनेक सुरेख गाण्यांना स्वरबद्ध करणारे संगीतकार श्रीनिवास खळे यांचे निधन

ते मराठी संगीतकार होते. त्यांनी आपल्या कर्णमधुर आणि भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मोहिनी घातली होती. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादी भाषांमधील गीतांना खळे अण्णांनी जरी स्वरबद्ध केले असले तरी त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत ह्या गीतप्रकारामध्ये आहे. भावगीतांव्यतिरिक्त ‘बोलकी बाहुली’, 'जिव्हाळा’, ‘पोरकी’, ‘पळसाला पाने तीन’ यासारख्या निवडक सहा मराठी चित्रपटांना खळेअण्णांनी संगीत दिले होते

३. (२०१७) हायकु हा अल्पाक्षरी जपानी काव्यप्रकार मराठीत लोकप्रिय करणाऱ्या ज्येष्ठ कवियत्री, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या 'शिरीष अत्रे पै' यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर