दिनविशेष ३० जुलै
दिनविशेष
दि. ३० जुलै
■ दिनविशेष
१. आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे
मैत्रीचे नाते हे आयुष्यातील सर्वात जवळच्या नात्यांपैकी एक आहे. आपल्या कुटुंबाइतकेच आपल्या आयुष्यात आपल्या जवळच्या मित्रांनाही महत्त्वाचे स्थान असते. अश्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण आपल्या कुटुंबियांना सांगायला घाबरतो किंवा त्यांना सांगत नाही, पण आपल्या जवळच्या मित्राला नक्कीच सांगतो
पॅराग्वेमध्ये फ्रेंडशिप डे सुरू झाला. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याचा प्रस्ताव प्रथम १९५८ मध्ये येथे मांडण्यात आला, त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी ३० जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. म्हणूनच आजही ३० जुलैला अनेक देशांमध्ये फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. पण भारत, बांग्लादेश, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांसारखे देश ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करतात
मैत्रीचा खरा अर्थ समजावून सांगण्यासाठी, त्याची भावना जिवंत ठेवण्यासाठी आणि मैत्रीचे क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी दरवर्षी मैत्री दिन साजरा केला जातो. या दिवशी लोक त्यांच्या मैत्रीबद्दल त्यांच्या मित्रांचे आभार मानतात. ते एकमेकांना फ्रेंडशिप बँड घालतात आणि ही मैत्री कायम ठेवण्याचे वचन देतात. या दिवशी अनेक मित्र एकमेकांना भेटवस्तू देतात आणि त्यांचे महत्त्व दर्शवतात
◆ जन्म
१. (१९२८) मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर आपल्या उत्कृष्ट अभिनय शैलीमुळे अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा जन्म
सन १९४३ ला त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्री / घरंदाज आई म्हणून काम केले. भालजी पेंढारकरांचे त्यांना मार्गदर्शन लाभले
● मृत्यू
१. (१९८३) शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक वसंतराव देशपांडे यांचे निधन
ते हिंदुस्तानी संगीत शैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते. वसंतराव देशपांड्यांनी असदअली खाँ, सुरेशबाबू माने, अमानतअली खाँ यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. त्या काळात 'कट्यार काळजात घुसली' या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता एकदम वाढली. सर्व प्रकारच्या गायकीवर आणि तबला, संवादिनी या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. इ.स. १९८२ सालच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते
२. (१९९४) साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक शंकर पाटील यांचे निधन
त्यांचे चोरा मी वंदिले, सागराचे पाणी, सवाल, बाजिंदा हे कथासंग्रह तसेच सरपंच, इशारा, घुंगरू, कुलवंती, बेईमान, ललाट रेषा, सुन माझी सावित्री या कादंबर्या हे गाजलेले साहित्य आहे
एक गाव बारा भानगडी, गणगौळण, युगे युगे मी वाट पाहिली, वावटळ, पाहुणी, पिंजरा, भुजंग, भोळीभाबडी, असला नवरा नको गं बाई! या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहल्या
इ.स. १९८५ सालातील नांदेड येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते
३. (२०११) संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचे निधन
अशोक दामोदर रानडे हे विद्वान संगीतकार आणि वांशिक संगीतशास्त्रज्ञ होते. रानडे हे पारंपारिक हिंदुस्थानी कला संगीताचे प्रशिक्षण घेतलेले गायक होते. ते एक संगीतकार होते जे सतत नवे नवे प्रयोग करत असे
४. (२०२१) शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन
ते ५४ वर्षे सांगोला विधानसभा आमदार पदावर होते. त्यांना लोक प्रेमाने आणि आपुलकीने 'आबासाहेब' म्हणत. समानतेच्या तत्त्वांसह ते आदर्श व्यक्ती होते. त्यांना शेतकरी आणि कामगारांकडून 'भाई' म्हटले जाते. गरीब, महिला, मागासलेले, शेतकरी, कामगार यांच्यासाठी त्यांनी अनेक लढाया लढल्या
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून १९६२ पासून अनेक दशके ते महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले. महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ आमदार असण्याचा मान मिळालेल्या गणपतराव देशमुख यांनी अकरा वेळेस विधानसभा निवडणूक जिंकली होती
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment