दिनविशेष १५ जुलै

दिनविशेष

दि. १५ जुलै 

■ दिनविशेष

१.  जागतिक युवा कौशल्य दिन

युनायटेड नेशन्स जनरल 'असेंब्ली'ने नोव्हेंबर २०१४ मध्ये ठराव मंजूर करून १५ जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन (WYSD) म्हणून मान्यता दिली. २०१३ मध्ये अंदाजे ७४.५ दशलक्ष आणि त्यांपैकी बहुतेक विकसनशील देशांमध्ये राहणाऱ्या जागतिक स्तरावर बेरोजगार असलेल्या तरुणांच्या मोठ्या संख्येबद्दल महासभा चिंतित होती. तेव्हापासून हा दिवस रोजगार, योग्य काम आणि उद्योजकतेसाठी तरुणांना कुशल बनवण्याच्या प्रयत्नासाठी साजरा केला जातो

◆ जन्म

१. (१९०३) काँग्रेसचे जेष्ठ नेते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. कामराज यांचा जन्म

ते भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यसेनानी राहिलेले कामराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते होते. ते संविधान सभेचे सदस्य होते. त्यांनी राबवलेला निवडणुकीचा 'कामराज पॅटर्न' ऐतहासिक ठरला होता

२. (१९२७) विचारवंत, वक्ते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचा कलेढोण, सातारा येथे जन्म

फलटणच्या मुधोजी कॉलेज येथे तर्कशास्त्र, मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय शिकवण्यास १९५७ मध्ये त्यांनी प्रारंभ केला. अत्यंत कठीण असणारे हे विषय सहज, सोपे करून शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. याच कॉलेजमध्ये त्यांनी सुमारे २५ वर्षे प्राचार्यपदाची धुरा सांभाळली. (१९८८ - ९१) या काळात त्यांनी औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपद सांभाळले


३. (१९२९) ज्येष्ठ कामगार नेते, सामाजिक कार्यकर्ते,  प्राध्यपक एन. डी. पाटील यांचा जन्म

एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले. बेळगाव सीमा लढ्याचे प्रणेते म्हणूनही त्यांना ओळखले जाते

४. (१९३१) मराठी शाहीर व लोककलाकार विठ्ठल उमप यांचा जन्म

उमप लहानपणापासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीकडे आकर्षित झाले होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. त्या काळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांमध्ये लोकगीतांमार्फत आणि पथनाट्यांमार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होते. विठ्ठल उमपांनी हेच कार्य पुढे चालू ठेवले

विठ्ठल उमप यांच्या नावावर एक हजाराहून अधिक लोकगीते आहेत. त्यांनी १० चित्रपटांमध्येही काम केले आहे. ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, टिंग्या आणि विहीर या चित्रपटांचा समावेश होतो. शाहिर उमप यांनी लोककलेच्या सर्वच कलाप्रकारांत लीलया संचार केला होता. त्यात पोवाडा, बहुरूपी, भारूड, भजन, गण-गवळण, लावणी, कवने, तुंबडी, बोबडी, धनगरी गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी असे अस्सल मऱ्हाटमोळी कलाप्रकार होतेच, पण कव्वाली आणि गझल गायनांतही ते आघाडीवर होते. 'उमाळा' हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे. आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून देशाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळवून दिले. त्यांनी सतत आपल्या गाण्यांमधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. 'अबक, दुबक, तिबक', 'अरे संसार संसार', 'खंडोबाचं लगीन' आणि 'जांभूळ आख्यान' ही त्यांची काही अविस्मरणीय नाटके आहेत

५. (१९३२) भारतीय लेखक, विद्वान आणि टीकाकार नरहर कुरुंदकर यांचा जन्म

हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता. कुरुंदकरांनी अनेक पुस्तकांना प्रदीर्घ प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्‍यांनी लिहिलेल्या प्रस्तावनांमधून आठ प्रस्तावनांची निवड करून ‘निवडक नरहर कुरूंदर’ हे संपादित पुस्तक आकाराला आले

● मृत्यू 

१. (१९६७) गायक व नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचे निधन

ते विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील 'बालगंधर्व' या नावाने लोकप्रिय असलेले, मराठी रंगभूमीवरील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते होते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहूब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते

प्रभात फिल्म कंपनीसाठी बालगंधर्वांनी ‘धर्मात्मा’ चित्रपटात संत एकनाथांची भूमिका केली. बालगंधर्वानी आपल्या भूमिका साकारून संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहिलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली

२. (२००४) कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. बानू कोयाजी यांचे निधन

परिवार नियोजन, जनसंख्या नियंत्रण, समाज सेवा या विषयांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. आपल्या समाजातील स्त्रियांचे आरोग्य, त्या विषयीचे प्रश्न, त्यातील समस्या याविषयी त्यांना अचूक भान होते. सन १९७८ पासून त्यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय कामाचे प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली. त्याआधी १९४० मध्ये श्री.र.धो. कर्वे यांच्यापासून प्रेरणा घेऊन, त्यांनी काही वर्षे कुटुंबनियोजनाचे काम प्रतिकूल परिस्थितीतही केले होते. डाॅ. बानू कोयाजी यांनी स्त्रियांसाठी 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' या संस्थेची स्थापना केली

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर