दिनविशेष १० मे
दिनविशेष
दि. १० मे
■ दिनविशेष
१. जलसंधारण दिवस (महाराष्ट्र)
जलक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा स्मृतिदिन १० मे महाराष्ट्रात 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा केला जातो
सुधाकर नाईक यांनी जलसंधारण खात्याची महाराष्ट्रात सुरुवात केली. राज्य जलसंधारण सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महाराष्ट्रात झंझावती दौरे करून भूजलपातळी वाढविण्यासाठी कार्यक्रम आखले
◆ जन्म
१. (१९२७) भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांचा जन्म
या इंग्लिश लेखिका आहेत. यांच्या 'रिच लाइक अस' या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे
२. (१९३२) ज्येष्ठ मराठी गीतकार जगदीश खेबूडकर यांचा जन्म
१६ व्या वर्षी 'मानवते तू विधवा झालीस...' हे खेबुडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जाते. त्यानंतरच त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबूडकर हे पेशाने शिक्षक होते
त्यांनी आपल्या कारकिर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. सुधीर फडके, पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते अलीकडच्या सोनू निगमपर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. संत एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, बा. सी. मर्ढेकर या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबुडकर मानत असत. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य आहे
३. (१९३७) आधुनिक मराठी कवी माणिक गोडघाटे तथा ग्रेस यांचा जन्म
ते मराठी कवी होते. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये त्यांची गणना व्हायची. 'वाऱ्याने हलते रान' ह्या त्यांच्या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि सात ललित लेखसंग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत
● निधन
१. (१९९८) पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचे निधन
ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, एक उत्कृष्ट लेखक व संपादक आणि मराठी साहित्यिक होते. साने गुरुजी यांचा त्याच्यावर प्रभाव होता. ते 'साधना साप्ताहिका'चे संपादक होते
२. (२००१) महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे निधन
ते जागतिक ख्यातीचे जलतज्ञ होते. २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचा 'पाणीदार नेता' , आणि 'जलक्रांतीचे जनक' म्हणून सुधाकरराव नाईक ओळखले जात. जलक्रांतीचा 'लढवय्या जलनायक' या शब्दात प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ पवार यांनी सुधाकरराव नाईक यांच्या प्रेरक कार्याचे वर्णन केले आहे. शेतकऱ्यांना पिक कर्जाच्या दहा टक्के व्याजदर रकमेवरून सहा टक्के व्याजदर करण्याचा क्रांतिकारी निर्णय सुधाकरराव नाईक सरकारने घेतला. अमरावती विद्यापीठ व रामटेक येथील संस्कृत विद्यापीठाची स्थापना देखील त्यांच्या कारकिर्दीत झाली. देशात पहिल्यांदाच जलसंधारण खात्याची स्वतंत्र निर्मिती करून त्यांनी जलक्रांतीची बीजे रुजवली. महिला आणि बालकल्याण विभागाची निर्मिती देखील सुधाकरराव नाईक सरकारच्या कारकिर्दीत झाली. मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढीसाठी सुधाकरराव नाईक यांनी मुलींचे शैक्षणिक शुल्क माफीचे तसेच उपस्थिती भत्ता सारखे कल्याणकारी योजना सुरू केल्या
३. (२००२) गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी यांचे निधन
ते एक भारतीय उर्दू-हिंदी कवी, पटकथालेखक, अभिनेते, शायर व गीतकार होते
४. (२०१५) भारतीय इतिहासकार, लेखक निनाद बेडेकर यांचे निधन
निनाद बेडेकर हे एक मराठी इतिहासकार होते. छत्रपती शिवाजी महाराज तसेच मराठेशाहीच्या इतिहासावर त्यांचा विशेष अभ्यास होता. जगभरात फिरून, पुरातन कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून, गडकिल्ले धुंडाळून ते शिवकालीन इतिहासात रममाण झाले होते. या अभ्यासासाठीच अरेबिक व पर्शियन भाषाही ते शिकले होते. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, छ्त्रपती शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंपैकी प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांनी त्यावर लिखाण केले होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment