दिनविशेष १९ मे
दिनविशेष
दि. १९ मे
◆ जन्म
१. (१९०५) भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्म
हिराबाईंनी अनेक गानप्रकार गायले. राग संगीताबरोबरच नाट्यपदे, ठुमरी, भावपदे, भजन, अभंग त्या आवर्जून गात असत. त्यांनी गाण्यातून भावनिकता आणि वैचारिकता यांचा सुरेख मेळ साधून ते संगीत जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. अत्यंत तलम, रेशमी, सुरेल आलापी आणि तारषड्जाचा हमखास प्रभावी लगाव ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये. सोज्वळपणा व शालीनता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुण त्यांच्या गाण्यातही आविष्कृत होत असे. शांत व संयमी भाव हे त्यांच्या अभिव्यक्तीचे वैशिष्ट्य होते. हिराबाईंनी स्त्रियांच्या गायनाच्या सादरीकरणाला शालीनता, शिस्त, प्रतिष्ठितपणा आणि भारदस्तपणा प्राप्त करून दिला
२. (१९३४) भारतीय लेखक आणि कवी रस्किन बाँड यांचा जन्म
३. (१९३८) ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा जन्म
ते कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार होते. गिरीश कर्नाड हे १९७६-७८ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते. १९८८-९३ मध्ये नाटक अकादमीचे ते सभापती होते. त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले त्यात अभिनयही केला
● निधन
१. (१९०४) आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे निधन
जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत. त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना 'भारतीय उद्योगाचे जनक' म्हणून ओळखले जाते
२. (१९९९) काव्य आणि संत वाड्मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक प्रा. रमेश तेंडुलकर यांचे निधन
त्यांचे पहिले समीक्षा लेखांचे पुस्तक ‘गीतभान’च्या रूपाने १९८२ मध्ये प्रकाशित झाले. यातील भा.रा.तांबे, पु. शि. रेगे, अनंत काणेकर, इंदिरा संत, बा. भ. बोरकर, ग. दि. माडगूळकर इत्यादींविषयीची त्यांची काव्य-समीक्षा त्यांच्या सूक्ष्म, मर्मग्राही, रसिकतापूर्ण आणि प्रसन्न समीक्षा शैलीचा प्रत्यय देते. ‘मराठी रोमँटिक काव्यप्रतिभा’ (१९९९) व ‘बालकवींची कविता: तीन संदर्भ’ (१९९९) ही दोन पुस्तकेही मराठी काव्य-समीक्षेत मोलाची ठरतात. आधुनिक मराठी काव्यातील रोमँटिसिझमच्या प्रभावाची तेंडुलकरांनी केलेली चिकित्सा मराठी समीक्षेत दुर्मिळ ठरते. त्याचप्रमाणे केशवसुत, गोविंदाग्रज आणि मर्ढेकर यांच्याशी असलेला बालकवींच्या काव्यजाणिवेचा अंतरंग-संबंध तीन स्वतंत्र शोधलेखांतून त्यांनी उपरोल्लिखित पुस्तकात प्रभावीपणे उलगडून दाखविला आहे
३. (२००८) नाटककार, चित्रपट कथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचे निधन
त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत २७ नाटकं लिहिली. गिधाडे, घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर ही त्यांची नाटकं खूप गाजली. सामना, सिंहासन अर्धसत्य, उंबरठा आदी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी ताकदीने लिहिल्या
सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. 'शांतता! कोर्ट चालू आहे' यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणाऱ्या विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला. 'सखाराम बाईंडर' मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि 'घाशीराम कोतवाल' मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली
मानवी मनाचे, त्यातही त्याच्या कुरूपतेचे चित्रण करून अशा व्यक्तिरेखांना समजून घेण्यात, त्यांचे जीवन मांडताना घडते-बिघडते संबंध, त्यातील ताण, त्या अनुषंगाने व्यवस्थांचे बंदिस्तपण टिपण्यात त्यांची लेखणी रमते. काव्य-कारुण्य, व्यक्ती-समाज, वास्तव-फॅन्टसी यांची कलात्मक सरमिसळ त्यांच्या नाटकांत आढळते. नवनाट्य, वास्तववाद यांच्याशी त्यांच्या लेखनाचे आंतरिक नाते दिसते. तरीही त्यांच्यावर कोणताही शिक्का मारता येत नाही इतकी प्रयोगशीलता दिसते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment