दिनविशेष १७ मे
दिनविशेष
दि. १७ मे
■ दिनविशेष
१. जागतिक उच्च रक्तदाब दिन (WorldHypertensionDay)
उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम लोकांच्या लक्षात आणून देऊन त्यांना रक्तदाबाची मोजणी नियमितपणे करण्यासाठी प्रवृत्त करावे, या उद्देशाने वर्ल्ड हायपरटेन्शन लीगच्या वतीने दरवर्षी १७ मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून पाळला जातो
उच्च रक्तदाब कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. 'जागतिक उच्च रक्तदाब दिन' अर्थात 'सायलेंट किलर' याविषयी जगभरातील सामान्य लोकांमध्ये जागरुकता वाढवण्याच्या उद्देशाने १७ मे रोजी जागतिक उच्च रक्तदाब दिन किंवा जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा केला जात आहे
उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाबाचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असतो. याची वेगवेगळी कारणे असू शकतात- कौटुंबिक इतिहास, तणाव, चुकीचे खाणे आणि जीवनशैली इ. पण हे टाळण्यासाठी केवळ आहार आणि जीवनशैलीची काळजी घेणे आवश्यक नाही, तर तणाव कमी करण्यासाठी आणि शरीर सक्रिय ठेवण्यासाठी व्यायाम देखील खूप आवश्यक आहे
आजकाल १८ ते ५० वर्षे वयोगटातील लोक उच्च रक्तदाबाचे जास्त बळी आहेत. जरी ६० वर्षापूर्वी पुरुषांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो, परंतु त्यानंतर पुरुष आणि महिला दोघांनाही समान धोका असतो. दैनंदिन जीवनात आपल्याला सर्व प्रकारच्या गोड-कडू गोष्टींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत राग येणे स्वाभाविक आहे. पण रागाने व्यसनाचे रूप धारण केले तर त्याचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक मुद्द्यावर रागावणे याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. असे दिसून आले आहे की ज्या लोकांना राग येत नाही, ते कमी आजारी असतात
२. जागतिक दूरसंचार दिन
जागतिक दूरसंचार दिन हा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ठरावाद्वारे १७ मे रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. २००५ च्या ट्युनिसमधील माहिती संस्थेच्या जागतिक शिखर परिषदेनंतर हा ठराव झाला
हा दिवस यापूर्वी १७ मे १८६५ रोजी आंतरराष्ट्रीय दूरसंचार युनियनच्या स्थापनेच्या स्मरणार्थ 'जागतिक दूरसंचार दिन' म्हणून ओळखला जात होता
या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे इंटरनेट आणि नवीन तंत्रज्ञानाद्वारे आणलेल्या सामाजिक बदलांविषयी जागतिक जागरूकता वाढविणे. तसेच डिजिटल विभाजन कमी करण्यात मदत करण्याचे उद्दिष्ट आहे
◆ जन्म
१. (१८६५) महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे व्यासंगी इतिहासकार, रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म
ते मराठी इतिहासकार व लेखक होते. मराठा साम्राज्याच्या इतिहासाविषयीची आठ खंडांत मराठी रियासत, तीन खंडांत मुसलमानी रियासत व दोन खंडांत ब्रिटिश रियासत या ग्रंथरचनांतून यांनी महाराष्ट्राचा सुमारे हजार वर्षांचा इतिहास मांडला. भारतीय सरकारने इतिहासविषयक साहित्यातील योगदानासाठी त्यांना इ.स. १९५७ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले
● निधन
१. (२०२०) मराठीतील गूढकथा लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे निधन
मतकरी हे नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते आणि चित्रकार देखील होते. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करून बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांनी नाटक शिकवले
वृत्तपत्रीय सदरलेखन, मालिका-चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन, माध्यमांतर, बालनाट्य व सूत्रधार या नाट्यसंस्थांचे लेखक, दिग्दर्शक, नट, नेपथ्यकार, निर्माते वगैरे, कथाकथनकार, दूरदर्शनवरील शरदाचे चांदणे व ‘गजरा’सारख्या कार्यक्रमांचे सादरकर्ते, ‘नर्मदा बचाओ आंदोलन’ व ‘निर्भय बनो’ आंदोलनांमधील सक्रिय सहभाग, हौशी चित्रकार, चांगले वक्ते असे मतकरींचे चौफेर कर्तृत्व होते
बावीस नाटके, अनेक एकांकिका, २३ कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेखसंग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी मतकरींचे विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहिरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या दूरचित्रवाणी मालिकांचे लेखन रत्नाकर मतकरींचे होते. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्व्हेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमांमधली कामेही रसिकप्रिय ठरली आहेत
२००१ साली पुण्यामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. रत्नाकर मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांत त्यांचा समावेश होतो
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment