दिनविशेष ०२ मे

दिनविशेष

दि. ०२ मे 

◆ जन्म

१. (१८९९) मराठी चित्रपटसृष्टीचे चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म

ते मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या भावनेचा व स्वातंत्र्याचा दिव्य संदेश भालजींनी आपल्या चित्रपटांतून दिला. बहिर्जी नाईक, नेताजी पालकर, मोहित्यांची मंजुळा यांतील संवादांमधून भालजींनी दुबळेपणा व लाचारीविरुद्ध शाद्बिक आसूड ओढले. स्वातंत्र्य मिळाले तरी सुराज्य निर्माण करण्यासाठी त्याग, निष्ठा, औदार्य व संयमी असा खंबीरपणा आणि आत्मविश्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टिकोनातून उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती केली

२. (१९२०) शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म

ते हिंदुस्तानी संगीत शैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते. तसेच त्यांनी पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, दूधभात, अवघाची संसार वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्या काळात कट्यार काळजात घुसली या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली. सर्व प्रकारच्या गायकीवर आणि तबला, संवादिनी या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. इ.स. १९८२ सालच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते

३. (१९२१) ख्यातनाम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते भारतरत्‍न सत्यजित रे यांचा जन्म

हे ऑस्कर पुरस्कार विजेते भारतीय लेखक, पटकथालेखक, संगीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक होते. चित्रपट जगतातील त्यांच्या कामगिरीबद्दल इ.स. १९९२ मध्ये त्यांना जीवनगौरव ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. ऑस्कर मिळवणारे ते एकमेव भारतीय दिग्दर्शक आहेत. त्यांनी अपु के वर्ष (इ.स. १९५० ते इ.स. १९५८) व इ.स. १९५५ मध्ये पथेर पांचाली या चित्रपटाची निर्मिती केली. यांनी एकूण ३७ चित्रपटांची निर्मिती केली. ते स्वतःच चित्रपटांना संगीत देत, पटकथा लेखन, दिग्दर्शन व संपादन अशी अनेक कामे करत

४. (१९५५) मराठी रंगभूमी व चित्रपट सृष्टीतील कलाकार विजय चव्हाण यांचा जन्म

त्यांनी अनेक नाटकांत आणि चित्रपटांत कामे केलेली असून, प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेल्या मोरूची मावशी या नाटकातील मावशीच्या स्त्री-भूमिकेसाठी ते विशेष ओळखले जातात. या नाटकाचे जवळ जवळ दोन हजार प्रयोग झाले. त्यानंतर मालिका आणि चित्रपटात बिझी असलेल्या विजय चव्हाण यांनी एकाच नाटकात चौदा भूमिका करण्याचाही विक्रम केला

● निधन

१. (१५१९) इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो दा विंची यांचे निधन

लिओनार्दो हे १५ व्या शतकात रेनेसान्स (प्रबोधन) काळात झालेले एक महान चित्रकार व संशोधक होते. कलेच्या इतिहासात त्यांनी संशोधक वृत्तीने दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्यांचे नाव नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. लिओनार्दो यांनी अनेक क्षेत्रांत योगदान दिले असले, तरी इतिहासात त्यांचे नाव चित्रकार म्हणून ठळकपणे दिसते. मोनालिसा, द लास्ट सपर, मॅडोना ऑफ द रॉक्स ही त्याची काही जगप्रसिद्ध चित्रे आहेत

२. (१९७३) लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचे निधन

बेडेकरांनी १९३६ च्या आसपाच कथा, तसेच राजकीय वाड्मयीन स्वरूपाचे लेखन करावयास सुरुवात केली होती. तथापि त्यांचे सर्व महत्त्वाचे लेखन १९५० नंतरच्या कालंखडातच झाले. नवकाव्य, नवकथा, नवे साहित्यविचार, सौंदर्यशास्त्रीय मीमांसा, अस्तित्ववादासारख्या विचारप्रणाली ह्यांचा हा काळ होता आणि ह्या काळाची आव्हाने व आवाहने साक्षेपाने स्वीकारुन बेडेकर समीक्षेच्या क्षेत्रात उतरले. साहित्य : निर्मिती व समीक्षा (१९५४), साहित्यविचार (१९६४), केशवसुतांची काव्यदृष्टी (१९६६), आधुनिक मराठी काव्य : उदय, विकास आणि भवितव्य (१९६९) ह्यांसारख्या ग्रंथांतून मोजकाच परंतु मौलिक साहित्यविचार त्यांनी माडंला. समाजचिंतन (१९६९), विचारयात्रा ह्यांसारख्या ग्रंथातून त्यांच्या सामाजिक विचाराची ओळख होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर