दिनविशेष ०१ मे
दिनविशेष
दि. ०१ मे
■ दिनविशेष
१. जागतिक कामगार दिन
हा दिवस जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी साजरा करण्यात येतो. १ मे रोजी जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. १ मे रोजी जागतिक कामगार दिवस म्हणून साजरा केले जाण्याची सुरुवात १९ व्या शतकाच्या मध्यावर एका कामगार चळवळीतुन झाली होती. ह्या चळवळीत कामाचा दिवस आठ तासाचा करण्यात यावा अशी मागणी मजदुर कामगार वर्गाकडून करण्यात आली होती
२. महाराष्ट्र दिन
१ मे १९६० साली मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. हा दिन महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो
३. गुलमोहर डे (सातारा)
साताऱ्यात १ मे हा दिवस 'गुलमोहर डे' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करणारे सातारा हे बहुधा जगातले पहिलेच शहर असावे. १९९९ सालापासून साताऱ्यात हा दिवस साजरा केला जात आहे
मे महिन्यात गुलमोहोराच्या झाडाला बहर येतो. लाल-केशरी फुलांनी ते झाड बहरून येते. फुलांनी नखशिखांत डवरून वाऱ्याच्या झुळकीबरोबर एकेक फूल जमिनीवर सोडून तांबड्या पाकळ्यांचा भरगच्च गालिचा पसरायचा, हा गुलमोहराचा स्थायीभाव दरवर्षी अनुभवाला येतो. त्याची आठवण ठेवणारा वर्षातला एक दिवस असावा असे वाटून गुलमोहराला अर्पण केलेला दिवस म्हणून 'गुलमोहर डे' साजरा करण्याची पद्धत साताऱ्यात सुरू झाली. सागर गायकवाड आणि पी. व्ही. तारू या दोघांनी सर्वांत आधी ही कल्पना मांडली. दरवर्षी १ मे ला कलासक्त मंडळी एकत्र येतात आणि आपापल्या परीने गुलमोहराचे वर्णन करतात. चित्रकार गुलमोहराची चित्रे काढतात, कवी गुलमोहरावर कविता करतात, फोटोग्राफर कॅमेऱ्यांत बंदिस्त केलेल्या गुलमोहराच्या फोटोंचे प्रदर्शन भरवितात
साताऱ्याच्या पोवई नाक्याजवळ गुलमोहराची झाडे असणाऱ्या रस्त्यावर हा उपक्रम साजरा केला जातो. हा उपक्रम आता एक सांस्कृतिक चळवळ बनून गेला आहे. वृक्षारोपण, प्रत्यक्ष निसर्गचित्रण, चित्रप्रदर्शन, कविता वाचन, कथ्थक नृत्य, शास्त्रीय गायन असे विविध कार्यक्रम या दिवशी केले जातात. गुलमोहोराची रोपे देऊन त्यांची काळजी घेण्याचे आवाहनही केले जाते
◆ जन्म
१. (१९१५) हिन्दी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल उर्फ अंचल यांचा जन्म
हिंदीतील 'छायावादी’ (स्वच्छंदतावादी) काव्याचा बहर ओसरू लागण्याच्या सुमारास ‘अंचल’ यांनी काव्यरचनेस सुरूवात केली. छायावादाच्या प्रभावाखाली असलेली त्यांची सुरुवातीची कविता पुढे स्वतंत्र झाली आणि ते प्रेम आणि सौंदर्याचे पूजक बनले. नंतर मात्र मार्क्सवादी विचारांचा प्रभाव पडून मानवाचे कल्याण, सामाजिक विषमता, बंड क्रांती इ. त्याचे काव्य विषय बनले. या दृष्टीने किरण वेला (१९४१) आणि करील (१९४२) हे त्यांचे काव्यसंग्रह उल्लेखनीय होत. पुढे अरविंदबाबू घोष यांच्या आध्यात्मिक विचारांचा प्रभाव पडून ते तत्त्वचिंतनपर कविता लिहू लागले. त्यांच्या विचारांत आणि तदनुरोधाने काव्यात सतत परिवर्तन झालेले आढळते. मधूलिका (१९३८), अपराजिता (१९३९), लाल चूनर (१९४२), वर्षोंतक के बादल (१९५४) आणि विरामचिन्हे (१९५७) हे त्यांचे काव्यसंग्रह होत
२. (१९१९) भारतीय भाषेतील प्रतिभासंपन्न पार्श्वगायक मन्ना डे यांचा जन्म
ते हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक व संगीतकार होते. त्यांना सन २००७ चा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळाला होता. मराठी भाषेमध्ये मन्ना डे यांनी गाणी गायली आहेत. त्यातले घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा हे ‘वरदक्षिणा’ चित्रपटातील ग.दि. माडगूळकर यांचे गीत आणि वसंत पवार यांचे संगीत असलेले हे गाणे विशेष लोकप्रिय आहे
३. (१९२२) स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते मधु लिमये यांचा जन्म
ते मराठी भारतीय राजकारणी होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात, तसेच गोवा मुक्तिसंग्रामात सहभाग घेतला
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment