दिनविशेष ०५ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. ०५ फेब्रुवारी
◆ जन्म
१. (१९०५) स्वातंत्र्यसैनिक, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्वचिंतक, सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचा जन्म
ते स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत पद्धतीने काम करणारे नेते होते. पश्चिम महाराष्ट्रातील (विशेषतः नगर जिल्ह्यातील) स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व त्यांनी व त्यांचे थोरले बंधू रावसाहेब पटवर्धन यांनी केले. १९४२ नंतर अनेक वर्षे दक्षिण महाराष्ट्रात भूमिगत राहून यशस्विपणे चळवळीचे कार्य करणारे अच्युतराव इंग्रजांच्या हाती कधीच लागले नाहीत
२. (१९३३) बालसाहित्यिका, लेखिका आणि कथाकथनकार गिरीजा कीर यांचा जन्म
किर्लोस्कर, प्रपंच, ललना इ. मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. गिरिजाबाईंनी विविध वाङ्मयप्रकारांत आपले लेखन केले. त्यांची एकूण ८५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य इत्यादी विविधता आहे. १९६८ ते १९७८ या काळात अनुराधा मासिकाची साहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांनी काम केले. हे काम करीत असताना सामाजिक प्रश्नांसंबंधीच्या प्रेमापोटी कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागात जाऊन त्यांनी त्यांच्या जीवनाचा जवळून अभ्यास केला. त्यांनी त्यांचे पुष्कळसे लिखाण या अनुभवांतूनच लिहिले आहे
गिरिजाघर, देवकुमार, चांदण्याचं झाड, चंद्रलिंपी, चक्रवेध, स्वप्नात चंद्र ज्याच्या, आभाळमाया, आत्मभान, झपाटलेला इ. गिरिजाबाईंच्या कादंबऱ्याही लोकप्रिय आहेत. गाभाऱ्यातील माणसं, जगावेगळी माणसं, कलावंत, साहित्य सहवास ही त्यांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके आहेत. त्यांनी बालसाहित्यावरही बरेच लेखन केले आहे. त्यांच्यातील लेखिका ही शृंगारिक तशीच गंभीर आणि अंतर्मुखही दिसते. तसेच त्या उत्कृष्ट कथाकथनही करीत असत. त्यांचे दोन हजाराहून अधिक कथाकथनाचे कार्यक्रम देशां-परदेशांत झाले आहेत. गिरिजा कीर यांचे प्रकाशित झालेले 'जन्मठेप' हे पुस्तक त्यांनी ६ वर्षे येरवडा तुरुंगातील जन्मठेप झालेल्या कैद्यांवर संशोधन करून लिहिले आहे
३. (१९४९) महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचा जन्म
याशिवाय त्या मराठी साहित्यिक होत्या. त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या असून त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून 'बाबांची शाळा' हा मराठी चित्रपट निघाला, त्याचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते
● निधन
१. (२००३) जेष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधी यांच्या हरिजन या मराठी अंकाचे संपादक गणेश गद्रे यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment