दिनविशेष
दि. ०४ जानेवारी
■ दिनविशेष
१. जागतिक ब्रेल दिन
जागतिक ब्रेल दिन दरवर्षी 4 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस लुई ब्रेल यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. लुई ब्रेल हे अंध व्यक्तींना वाचन आणि लेखनाची क्षमता मिळवून देणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक होते
ब्रेल लिपी ही सहा बिंदूंच्या विशिष्ट नमुन्यांद्वारे तयार केलेली लिपी आहे, ज्यामुळे अंध व्यक्तींना शिकणे आणि माहिती मिळवणे सुलभ होते. ही लिपी शिक्षण, स्वातंत्र्य, आणि समानतेचा मार्ग उघडते
या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे अंध आणि दृष्टिहीन व्यक्तींना समाजात समान हक्क मिळवून देणे आणि ब्रेल लिपीच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे होय. या दिवशी शाळा, संस्था, आणि स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात
जागतिक ब्रेल दिन आपल्याला अंध व्यक्तींसाठी समान संधी निर्माण करण्याचा संदेश देतो. ब्रेल लिपीच्या वापरातून त्यांचे जीवनमान सुधारण्यास आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यास मोठी मदत होते
◆ जन्म
१. (१६४३) इंग्लिश शास्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म
ते एक इंग्रज भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते. न्यूटन यांचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत व त्यांची गणितीय परिभाषा ही सर्वश्रुत आहे
२. (१८०९) आंधळ्या व्यक्तींसाठी ब्रेल लिपी तयार करणारे लुई ब्रेल यांचा जन्म
ते फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक होते. त्यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहय्याने वाचनाची पद्धत / लिपी विकसीत केली
३. (१९०९) मराठी पत्रकार, विचारवंत, लेखक, नवसाहित्यिककार प्रभाकर पाध्ये यांचा जन्म
पदवीनंतर त्यांनी मुंबईस परतून पत्रकारिता आरंभली. मो.ग. रांगणेकरांच्या 'चित्रा' साप्ताहिकात पाध्ये रुजू झाले. या साप्ताहिकातून पाध्यांनी राजकीय विषयांवर व्यासंगपूर्ण लिखाणास आरंभ केला. याशिवाय हरिभाऊ मोटे यांच्या 'प्रतिभा' साप्ताहिकात पाध्ये साहित्यिक घडामोडींवर लिहीत असत. चित्रा साप्ताहिकातले त्यांचे लिखाण झाल्यावर ते १९३८ - १९४५ सालांदरम्यान 'धनुर्धारी'चे संपादक होते. त्यानंतर १९४५ - १९५३ सालांदरम्यान ते 'नवशक्ती'चे संपादक होते
पत्रकारितेच्या जोडीनेच पाध्यांनी ललित साहित्यही लिहिले. त्यांची 'मैत्रीण' ही कादंबरी, 'त्रिसुपर्ण' (इ.स. १९८३) हा दृष्टांतकथासंग्रह व अन्य चार कथासंग्रह प्रकाशित झाले. पाध्यांनी प्रवासवर्णने व समीक्षाही लिहिल्या. त्यांच्या 'सौंदर्यानुभव' या समीक्षापर ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला
४. (१९१४) साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मराठी कवियत्री इंदिरा संत यांचा जन्म
शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती नारायण संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या
● निधन
१. (१९९४) सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट संगीतकार आर. डी. बर्मन तथा राहुल देव बर्मन तथा पंचमदा यांचे निधन
त्यांना बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक मानले जातात. आपल्या १९६१ ते १९९४ दरम्यानच्या कारकिर्दीमध्ये बर्मनने ३३१ चित्रपटांना संगीत दिले व स्वतः काही गाणी देखील म्हटली. किशोर कुमार व आशा भोसले हे त्यांचे विशेष आवडीचे पार्श्वगायक होते
२. (२०२२) सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन
अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जातात. त्यांना २०२१ मध्ये सामाजिक कार्य श्रेणीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment