दिनविशेष १७ जानेवारी
दिनविशेष
दि. १७ जानेवारी
◆ जन्म
१. (१९४५) कवी, गीतकार, पटकथालेखक, जेष्ठ अभिनेते जावेद अख्तर यांचा जन्म
इ.स. १९७० व इ.स. १९८० च्या दशकांत त्यांनी सलीम खान यांच्यासोबत हिंदी चित्रपटांसाठी पटकथालेखन केले. त्यांच्या पटकथा सलीम-जावेद या जोडीच्या नावाने लिहिल्या आहेत. सध्या हिंदी चित्रपटक्षेत्रात अख्तरांचे गीतकार म्हणून मोठे नाव आहे
त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’, उर्दूतील उत्तम काव्य लेखनासाठी ‘साहित्य अकादमी’ आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या अनेक गाण्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत
● निधन
१. (१९७१) स्वातंत्रसैनिक, घटनातज्ज्ञ बॅ. नाथ बापू पै यांचे निधन
ते एक मराठी स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ होते. भारतीय लोकसभेचे ते सभासद होते. ते एक फर्डे वक्ते होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांच्या वक्तृत्वाने सभेची रंगत वाढत असे
२. (२०१३) मराठी व हिंदी लेखिका ज्योत्स्ना देवधर यांचे निधन
ज्योत्स्ना देवधर यांनी पुणे विद्यापीठातून हिंदी विषयामध्ये एम.ए. केल्यानंतर वर्धा येथून ‘साहित्य विशारद’ ही पदवी संपादन केली. इ.स. १९६० मध्ये आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर त्या निर्मात्या म्हणून रुजू झाल्या अणि ‘गृहिणी’ या कार्यक्रमाचा भाग असलेल्या ‘माजघरातील गप्पा’ याद्वारे त्या घरांघरांमध्ये पोहोचल्या
ज्योत्स्ना देवधर यांनी ‘अंतरा’ या हिंदी कथासंग्रहापासून त्यांनी साहित्य लेखनास सुरुवात केली. ‘घर गंगेच्या काठी’ या पहिल्याच मराठी कादंबरीने त्यांना अफाट लोकप्रियता लाभली. ज्योत्स्ना देवधर यांचे लेखन स्त्रीवादी आणि वास्तववादी होते. त्यांच्या कथांतून आपल्याला स्त्रीच्या वाट्याला येणारी दुःखे, वेदना, तिच्या जीवनातील कारुण्य यांचे चित्रण पहायला मिळते
त्यांनी लिहिलेले 'पंडिता रमाबाईंचे चरित्र' हे चरित्र लिखाणाचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या ‘घर गंगेच्या काठी’, ‘कल्याणी’ आणि ‘पडझड’ या कादंबऱ्या पुणे विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ आणि इस्लामिया विद्यापीठ या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात होत्या. त्यांच्या विविध कथांचे कन्नड, तेलगू, तमीळ, मल्याळम, आसामी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनुवाद झाले आहेत
३. (२०२२) राज्याच्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन
एन. डी. पाटील यांचे जीवन म्हणजे संघर्ष गाथा आहे. आयुष्यभर त्यांनी केवळ शेतकरी आणि कष्टकरी यांचाच विचार करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. त्यामुळे शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नाचा उगम म्हणजेच एन. डी.साहेब, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शेतकऱ्यांविषयी त्यांना खूप तळमळ होती. एन.डीं.चा रुद्रावतार १९७२ सालातील दुष्काळामध्ये दिसला. सर्वत्र दुष्काळ पडला होता. लोकांच्या हाल अपेष्टांना पारावार राहिला नव्हता. जगण्यासाठी ते लढत होते. पाऊस पाणी नसल्याने पोटाची आबाळ होत होती. कुपोषणाने अनेकांना मृत्यूशय्येवर गाठले होते. अशा काळात लोकांना जगवायचे असेल तर रोजगारी हमीची कामे हाती घेण्याची आग्रही मागणी एन.डी.पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली. आंदोलन हे जनआंदोलन बनून गेले. आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने हे आंदोलन आक्रमक व रक्तरंजीत बनले. या आंदोलनात चार कष्टकऱ्यांचा बळी गेला. अखेर शासनाला रोजगार हमी कायदा करून लोकांच्या हाताला काम द्यावे लागले. एन. डी. पाटील यांच्या प्रयत्नाने आणि आंदोलकांच्या रक्ताने रोजगार हमी कायदा अस्तित्वात आला. आज या कायद्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील बेरोजगार, कष्टकऱ्यांच्या हाताला काम मिळाले आहे. यामध्ये एन.डी. यांचे योगदान मोठे आहे
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment