दिनविशेष २४ डिसेंबर

दिनविशेष

दि. २४ डिसेंबर

■ दिनविशेष 

१. राष्ट्रीय ग्राहक दिन

राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. इ.स. १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत

* सुरक्षेचा हक्क
* माहितीचा हक्क
* निवड करण्याचा अधिकार
* म्हणणे मांडण्याचा हक्क
* तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क
* ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार

ग्राहकांना देण्यात आलेल्या अधिकारांचे आणि हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून भारताच्या केंद्र सरकारकडून हेल्पलाइन चालविण्यात येते. ग्राहकांना येणाऱ्या अडचणी, तक्रारींबाबत हेल्पलाइनकडून मार्गदर्शन करण्यात येते. ग्राहकांनी विकत घेतलेल्या वस्तू किंवा सेवांमध्ये काही त्रुटी असतील, त्याबाबत काय तक्रार करावी, कुठे तक्रार करावी, त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे, याची सर्व माहिती हेल्पलाइनद्वारे लोकांना देण्यात येते

◆ जन्म 

१. (१८९९) नामवंत बालसाहित्यिक, समाजसुधारक व गांधीवादी शिक्षक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ 'साने गुरूजी'  यांचा जन्म

इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी 'काँग्रेस' नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले. इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला

समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला.सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले

१९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित गीता प्रवचने सुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली

२. (१९२४) चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा जन्म

ते लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक होते. त्यांना भारतीय उपखंडातील महान आणि प्रभावी गायकांपैकी एक मानले जाते. मोहमद रफी त्यांच्या आवाज, अष्टपैलुपणा आणि श्रेणीसाठी उल्लेखनीय होते; त्यांच्या गाण्यांमध्ये वेगवान पेपी नंबर ते देशभक्तीपर गीते, दर्द असणारी गाणी, अत्यंत रोमँटिक गाणी, कव्वाली ते गझल आणि भजनांमध्ये शास्त्रीय गाणी अशी विविधता होती. एखाद्या अभिनेत्याच्या व्यक्तिरेखेवर आणि शैलीनुसार आपला आवाज काढण्याच्या क्षमतेसाठी, चित्रपटात स्क्रीनवर गाण्याचे लिप-सिंक करून दाखवणासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी हिंदी भाषा, उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलुगू भाषांमधून गाणी गायली, पण ते आपल्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांची गाणी भारतात, तसेच भारताच्या बाहेर स्थायिक असलेल्या भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. मुकेश, किशोर कुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर, हेमंत कुमार मुखोपाध्याय आणि तलत मेहमूद यांच्याप्रमाणेच ते हिंदी चित्रपटांच्या १९५० ते १९८० च्या दशकांमधले एक प्रमुख पार्श्वगायक होते

● निधन

१. (१९७३) स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरीयार ई. व्ही. रामस्वामी यांचे निधन

ते विज्ञान बोध आणि तर्क विषयाचे क्रांतीकारी विचारक होते. त्यांनी समाजातील अस्पृश्य, पीडित, व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा व समान अधिकार मिळाविण्याचा मार्ग दाखवला. पेरियार एकमेव असे क्रांतीकारक होते की त्यांनी दक्षिण भारतातील राजकारणामधुन ब्राम्हणवादाला सुरूंग लावला आणि समाज व्यवस्था बळकट केली तसेच तमिळनाडूच्या राजकारणात ब्राह्मणेत्तर समाजाला वर्तमान इतिहासातील राजकारणात बरोबरीने बसवले. तामिळनाडू राज्यात आज पण पेरियार रामसामी यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. पेरियार यांनी तत्कालीन मद्रास प्रांतात जस्टीस पार्टीची स्थापना केली

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर