दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष
 
दि. १४ डिसेंबर 

■ दिनविशेष 

१. राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिन (National Energy Conservation Day)

ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व लोकांना पटवून सांगण्यासाठी आणि ऊर्जा कार्यक्षमता तसेच संवर्धन अशा क्षेत्रात, भारताच्या उपलब्धी लोकांसमोर आणण्याच्या हेतून, दरवर्षी १४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो

भारतातील राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे उद्दिष्ट लोकांना उर्जेचे महत्व तसेच बचत आणि ऊर्जा बचतीद्वारे संवर्धनाची जाणीव करून देणे आहे. उर्जेचा अनावश्यक वापर कमी करून, कमी उर्जेचा वापर करून उर्जेची बचत करणे हा ऊर्जा संवर्धनाचा खरा अर्थ आहे. भविष्यातील वापरासाठी उर्जेची बचत करण्यासाठी कार्यक्षमतेने वापरणे अत्यंत आवश्यक आहे. ऊर्जा संवर्धन नियोजनाच्या दिशेने अधिक परिणामकारक परिणाम मिळविण्यासाठी, प्रत्येक मानवी वर्तनाची गांभीर्याने काळजी घेऊन ऊर्जा वाचवता येते. दैनंदिन वापरातील अनेक विद्युत उपकरणे ऊर्जा संवर्धन मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अतिवापराची ऊर्जा वाचवण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे

◆ जन्म 

१. (१९०५) लेखक, कादंबरीकार विष्णुदास पांडुरंग दांडेकर यांचा जन्म

ते एक मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक होते. आपल्या अध्यापनाचा पेशा सांभाळून लेखनही ते करत होते. फेरफटका, टेकडीवरून, एक पाऊल पुढे, काळ खेळतो आहे, पंचवीस वर्षांनंतर आदी लघुनिबंधसंग्रह त्यांनी लिहिले. आशावादी आनंदी वृत्ती, जीवनाकडे उदारपणे पाहण्याचा दृष्टिकोन, सौंदर्याचे आकर्षण आणि कल्पकता तसेच विनोदाचे मिश्रण हे या लघुनिबंधांचे वैशिष्ट्य होय

२. (१९२४) अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक आणि ’द ग्रेटेस्ट शो मॅन’ राज कपूर यांचा जन्म

राज कपूर चित्रपटाच्या मनोरंजनाआड काहीतरी संदेश देत असत. 'आधी कहानी आधा फसाना' अशी त्यांची शैली होती. सामान्य माणसाला नायक बनवून त्या माध्यमातून त्यांनी आपल्याला जे सांगायचे आहे, ते सांगितले. आजही त्यांचे चित्रपट देशविदेशातील विविध चित्रपट महोत्सवांत दाखविले जातात, याचे कारण हेच आहे. राज यांच्या चित्रपटातील नायक हा सामान्य माणूस असायचा. फुटपाथवर राहणारे, फेरीवाले, चहा विकणारे त्यांच्या चित्रपटात सर्रास आढळतात. राज स्वतः अत्यंत साधे होते. महागड्या हॉटेल एवजी ते नेहमी चौकातल्या एखाद्या चहाच्या दुकानावर किंवा ढाब्यावर जायचे. त्यामुळे खरीखुरी मंडळी त्यांना भेटायची. त्यांची सुख-दुःखे त्यांना समजायची. त्यांच्या चित्रपटाचा हा प्रेरणास्रोत होता

३. (१९३४) चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक श्याम बेनेगल यांचा जन्म

चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन न मानता त्यातून प्रेक्षकांची अंर्तदृष्टी विकसित करणारा विचार दिला पाहिजे अशी बांधिलकी मानणाऱ्या दिग्दर्शकांत त्यांना मानाचे स्थान आहे

बेनेगल यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकावर आधारित भारत एक खोज नावाची ५३ भागांची मालिका दूरदर्शनसाठी दिग्दर्शित केली. उच्च निर्मितीमूल्य असलेली ही मालिका बरीच लोकप्रिय झाली. भारतीय रेल्वेवर आधारित यात्रा आणि सत्यम शंकरमंची यांच्या अमरावती कथालु या तेलुगू कथासंग्रहावर आधारित अमरावती की कथायें तसेच कथासागर आणि संविधान या मालिका त्यांनी दूरदर्शनसाठी दिग्दर्शित केल्या आहेत. तसेच जवाहरलाल नेहरू आणि सत्यजित राय यांच्या जीवनावरील उत्तम लघुपटांची निर्मिती केली आहे

सत्यजित राय आणि मृणाल सेन या महान दिग्दर्शकांनी निर्माण केलेल्या समांतर चित्रपट चळवळीतून प्रेरणा घेत श्याम बेनेगल यांनी कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपट शैलीला एकत्र आणणारा एक वेगळा मध्यम मार्ग चोखाळला आणि थबकलेल्या समांतर चित्रपट चळवळीला नवी दिशा दाखवली. समाजव्यवस्थेच्या परिघावर फेकल्या गेलेल्या व्यक्ती आणि समुदायांच्या कथा त्यांनी वेळोवेळी प्रामुख्याने मांडल्या. अशाप्रकारच्या समाजघटकांबद्दल भारतीय प्रेक्षकांच्या मनात सहानुभूती जागवत मानवतावादी दृष्टिकोन घडवण्याचा प्रयत्न केला. वेगळ्या प्रकारचे चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न करताना त्यांनी कथेच्या निवेदन शैलीतही वेगळे प्रयोग करून पहिले

● निधन

१. (१९७७) गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचे निधन

ते विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते होते. ते त्यांच्या नावाची आद्याक्षरे ग.दि.मा. या नावाने लोकप्रिय होते. मराठी गीतनिर्मितीच्या क्षेत्रात त्यांचे स्थान अजोड आहे. सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे त्यांच्या रचना श्रेष्ठ ठरल्या

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर