दिनविशेष १० नोव्हेंबर
दिनविशेष
दि. १० नोव्हेंबर
■ दिनविशेष
१. जागतिक विज्ञान दिन
शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) वतीने २००२ सालापासून हा दिवस ‘जागतिक विज्ञान दिन’ म्हणून घोषित करण्यात आला. शांतता आणि विकासासाठी असलेल्या जागतिक विज्ञान दिवसाचे पुढील प्रमुख चार उद्देश आहेत. विज्ञानाचा शांतता आणि विकासाबद्दलचा जनमानसातील दृष्टिकोन अधिक प्रगल्भ करणे. विविध देशांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची देवाणघेवाण करणे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान समित्यांची अथवा व्यासपीठांची स्थापना करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे. येणाऱ्या समस्यांकडे वैज्ञानिक जगताचे लक्ष वेधणे. सामान्य जनमानसात विज्ञानाबद्दल जागृती वाढावी, विज्ञानाचा शांततेसाठी व विकासासाठी वापर व्हावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो. २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो
★ घटना
१. (१६५९) शिवप्रताप दिन
१० नोव्हेंबर १६५९ ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगड येथे आदिलशहाचा सेनापती अफझल खान याचा वध केला. या दिवसाची आठवण म्हणून महाराष्ट्रात शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो
◆ जन्म
१. (१९०४) साहित्यिक व समीक्षक, लेखिका कुसुमावती आत्माराम देशपांडे यांचा जन्म
या मराठीतील लेखिका व समालोचक होत्या. त्यांनी मराठी लघुकथेला नवीन रूप आणि चैतन्य बहाल केले. मराठी वाङ्मयसमीक्षेच्या क्षेत्रात यांनी केलेले लेखन फार मोलाचे आहे. नवी दिल्ली येथे त्या आकाशवाणीवरील स्त्रिया आणि मुलांच्या कार्यक्रमाच्या एक प्रमुख निर्मात्या होत्या. २६ ते २९ ऑक्टोबर १९६१ या कालावधीत ग्वाल्हेर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. १८७८ साली सुरू झालेल्या या संमेलन परंपरेत पहिल्या महिला संमेलनाध्यक्ष होण्याचे भाग्य त्यांना मिळाले. त्यांनी 'मराठी कादंबरी पहिले शतक' हा समीक्षात्मक ग्रंथ लिहिला. दीपकळी, मोळी, दीपमान हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत
● निधन
१. (१९९६) शास्त्रीय संगीत व सुगम संगीत या दोन्ही क्षेत्रांत लोकप्रियता मिळवलेल्या गायिका माणिक वर्मा यांचे निधन
या हिंदुस्तानी संगीत व सुगम संगीत या संगीत प्रकारांत गायन करणाऱ्या मराठी गायिका होत्या. त्या हिंदुस्तानी संगीतातील किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत. मराठी भाषेतील गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते त्यांनी गायली आहेत. ’वंदे मातरम’, ’सीता स्वयंवर’, ’मायाबाजार’, ’गुळाचा गणपती’, ’पुढचं पाऊल’ या चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केले
२. (२०१९) भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून ऐतिहासिक काम करणारे टी. एन. शेषन यांचे निधन
हे १९९० ते १९९६ या काळात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांनी भारताच्या पूर्वीच्या निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरमार्ग व दोष दूर केले. शेषन यांना सन १९९६ मध्ये उत्कृष्ट शासकीय सेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment