दिनविशेष २६ नोव्हेंबर

दिनविशेष

दि. २६ नोव्हेंबर

■ दिनविशेष 

१. भारतीय संविधान दिन

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या राज्यघटनेस देशाच्या संविधान सभेने मान्यता दिली. त्यामुळे या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी देशात सर्वत्र 'संविधान दिन' साजरा केला जातो

आपल्या देशाचे सर्व कायदे या राज्यघटनेने बनवलेले आहेत.या संविधानांतर्गत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, संसद, राज्य विधिमंडळ, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यासह देशातील सर्व न्यायालये त्याअंतर्गत काम करतात. शिवाय, याच संविधानाने आपल्या अनेक हक्क दिले आहेत ज्यामुळे आपण संपूर्ण स्वातंत्र्य आणि समानतेने जीवन जगतो. देशातील नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधान दिनाचा मूळ उद्देश आहे

★ घटना 

१. (२००८) २६/११ मुंबई येथे दहशतवादी हल्ला

मुंबई पोलिस दलातील हेमंत करकरे, अशोक कामठे, विजय साळसकर, तुकाराम ओंबाळे यांच्यासह १७ जणांना या दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आले

◆ जन्म

१. (१९२१) भारतीय दुग्धोत्पादनातील ’धवल क्रांती’चे जनक, ’अमूल’चे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष व्हर्गिस कुरियन यांचा जन्म

ते भारतीय अभियंते तथा उद्योजक होते. भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरियन यांची अमूल या दुग्धप्रक्रिया उद्योगाच्या घडणीत मोठा वाटा होता

२. (१९२३) चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचा जन्म

ते मराठी चित्रपट दिग्दर्शक होते. ते प्रामुख्याने मराठी चित्रपट उद्योगात कार्यरत होते. त्यांनी दिग्दर्शित केलेले मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५), रंगल्या रात्री अश्या (१९६२), एकटी (१९६८), मुंबईचा जावई (१९७०), घरकुल (१९७१) आणि जावई विकत घेणे आहे (१९७२) हे चित्रपट प्रसिद्ध आहेत. या चित्रपटांसांठी त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले

● निधन

१. (१९८५) रविकिरण मंडळातील कवी यशवंत दिनकर पेंढारकर तथा कवी यशवंत यांचे निधन

यशवंत दिनकर पेंढरकर ऊर्फ कवी यशवंत हे मराठी कवी होते. 'महाराष्ट्रकवी' म्हणून त्यांना गौरवाने उल्लेखले जाते. ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते. जव्हार संस्थानाचे राष्ट्रगीत देखील त्यांनीच रचले. आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्त्वाचे स्थान आहे. 'रविकिरण मंडळातील' सप्तर्षींमध्ये माधव जूलियन सोबत यशवंत यांच्या नावांचा अग्रक्रमाने उल्लेख केला जात असे. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना ’महाराष्ट्र कवी’ म्हणून गौरविण्यात आले होते

२. (१९९४) मराठी चित्रपटसृष्टी आणि समाजमनावर पाच तपे अधिराज्य गाजवणारे चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन

ते मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या भावनेचा व स्वातंत्र्याचा दिव्य संदेश भालजींनी आपल्या चित्रपटांतून दिला. बहिर्जी नाईक, नेताजी पालकर, मोहित्यांची मंजुळा यांतील संवादांमधून भालजींनी दुबळेपणा व लाचारीविरुद्ध शाद्बिक आसूड ओढले. स्वातंत्र्य मिळाले तरी सुराज्य निर्माण करण्यासाठी त्याग, निष्ठा, औदार्य व संयमी असा खंबीरपणा आणि आत्मविश्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टिकोनातून उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती केली

भालजींचे चित्रपट किंवा त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी कार्यशाळाच होती. तसेच त्यांचा संच म्हणजे कुटुंबच होते. शिस्तबद्धता, वेळापत्रकानुसार काम, कामांचे नेटके वाटप, स्तोत्रपठण, प्रार्थना, रेखीव दिनक्रम, वगैरे... चित्रपटाच्या माध्यमातून भालजींनी सुलोचनादीदी, चंद्रकांत मांडरे, सूर्यकांत मांडरे, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार घडवले. शिवाजीचा काळ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा व प्रसंग ही भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यांच्या युगप्रवर्तक अशा कारकिर्दीमुळे भालजींना यथार्थतेने चित्रतपस्वी असे म्हटले जाते

३. (२०१०) शाहीर विठ्ठल उमप यांचे निधन

ते मराठी शाहीर व लोककलाकार होते. उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली. त्यांनी लिहिलेल्या 'जांभूळ आख्यान' या नाटकाचे ५०० हून अधिक प्रयोग झाले

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर