दिनविशेष १२ नोव्हेंबर
दिनविशेष
दि. १२ नोव्हेंबर
■ दिनविशेष
१. राष्ट्रीय पक्षी दिन
२. राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन
१२ नोव्हेंबर १९४७ मधे याच दिवशी महात्मा गांधी यांचे दिल्ली आकाशवाणीवरुन भाषण प्रसारित झाले होते. म्हणून १२ नोव्हेंबर हा दिवस ’राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो
◆ जन्म
१. (१८९६) जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक डॉ. सलीम अली यांचा जन्म
त्यांचा जन्मदिन भारतात राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. ते भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी होते. सलीम अली यांनी भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, पक्ष्यांच्या विविध जाती आणि जातींमधील वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या ह्या कार्याने भारतात हौशी पक्षिनिरीक्षक बनण्याची परंपरा चालू झाली. भारतातील हे पक्षी निरीक्षक सलीम अली यांना आद्य गुरूमानतात. त्यांना birdman of India असे ही संबोधले जाते
१९५० व ६० च्या दशकात जेव्हा भारतात पर्यावरण हा शब्द अस्तित्वातच नव्हता त्यावेळेस भरतपूरच्या केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान तसेच केरळमधील सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानात तत्कालिन होणारे पर्यावरणास हानीकारक प्रकल्पांना त्यांनी विरोध दर्शावला. त्यांचे वाक्य तत्कालीन पंतप्रधान चरणसिंग यांना चांगलेच झोंबले होते. ताजमहाल नष्ट झाला तर पुन्हा बांधता येईल परंतु सायलंट व्हली सारखे जंगल एकदा नष्ट झाल्यावर पुन्हा उभारता येणार नाही. त्यांनी केलेल्या शास्त्रीय वादावर सरकारने नमते घेउन इंदिरा गांधी सरकारने हे प्रकल्प स्थगित केले तसेच अंततः त्यांना राष्ट्रीय उद्यानांचा दर्जा देउन कायमचे संरक्षित केले. तसेच अनेक दुर्मिळ प्राणी व पक्षी यांबाबत आपल्या पुस्तकांद्वारे, संस्थेद्वारे, शिष्यांमार्फत केलेले सरकार तसेच सामान्य नागरिकांमध्ये केलेले प्रबोधन भारतातील पर्यावरण चळवळीचा पाया ठरले. त्यामुळेच भारतातील आद्य पर्यावरणवाद्यांमध्ये डॉ. सलीम अली यांचा समावेश होतो
२. (१९०४) पत्रकारिता, लेखन, वक्तृत्व, राजकारण व समाजकारण या क्षेत्रातील निस्वार्थीपणे आणि अविरतपणे केलेल्या कार्यामुळे ज्यांचे आयुष्य एक धडपडीचा इतिहास बनून गेले असे श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी यांचा जन्म
ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते होते. ते प्रथम समाजवादी, नंतर प्रजासमाजवादी आणि शेवटी संयुक्त समाजवादी पक्षाचे सभासद होते. पत्रकारिता, लेखन, वक्तृत्व, राजकारण व समाजकारण या क्षेत्रांतील निःस्वार्थीपणे अन् अविरतपणे केलेल्या कार्यामुळे ज्यांचे आयुष्यच ‘एक धडपडीचा इतिहास’ बनून गेले असे ते समाजवादी लढवय्ये असून मवाळ वृत्तीचे एक नेते होते
३. (१९३२) पक्षी आणि वन्यजीव विषयक ग्रंथकार मारूती चितमपल्ली यांचा जन्म
त्यांनी वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ म्हणजे ३६ वर्षे नोकरी केली. नोकरीदरम्यान आणि त्यानंतरही अशी एकूण ६५ वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली, जंगलातील प्राणीजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे लेखन अतिशय ओघवत्या शैलीत करतात. त्यांचे वाचनही प्रचंड आहे आणि त्यांना पुस्तकांचीही आवड आहे. पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली, लेखक व्यंकटेश माडगूळकर प्रसिद्ध चित्रकार ए. ए. आलमेरकर यांच्याशी त्यांचा स्नेह होता. २००६ मध्ये सोलापूरला येथे झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना भूषविले
४. (१९४०) हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक अमजद खान यांचा जन्म
ते भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक होते. सुमारे वीस वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी सुमारे १३० चित्रपटात काम केले. त्यांच्या १९७५ सालच्या शोले या चित्रपटातील गब्बरसिंग व मुकद्दर का सिकंदर (१९७८) या हिंदी चित्रपटातली खलनायकाच्या भूमिकेमुळे त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली
● निधन
१. (१९५९) स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचे निधन
केशवरावांना तात्यासाहेब या नावाने ओळखले जात असे. ते मराठी राजकारणी, बहुजन समाजोद्धार चळवळीचे नेते होते. केशवराव जेधे यांचा संबंध ब्राह्मणेतर चळवळीशी होता. पुणे येथील जेधे मॅन्शन हे या चळवळीचे केंद्र होते. पुण्यातील प्रसिद्ध स्वारगेट चौक हे त्यांच्या नावावर आहे. त्यांनी 'शांतीचा गांधी पुतळा। देशा प्यारा जाहला।' ही कविता लिहली. केशवराव व बाबूराव या बंधूंचा सत्यशोधक चळवळीकडे ओढा होता. त्यांनी ’मजूर’ हे वृत्तपत्र काढले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment