दिनविशेष २२ ऑक्टोबर
दिनविशेष
दि. २२ ऑक्टोबर
◆ जन्म
१. (१९००) भारतीय स्वातंत्र्य संग्रांमातील एक प्रमुख क्रांतिकारक अशफ़ाक उल्ला खान यांचा जन्म
त्यांनी काकोरी कांड या नावाने प्रसिद्ध असलेल्या घटनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. राम प्रसाद बिस्मिल प्रमाणेच अशफ़ाक उल्ला खान हे उर्दू भाषेचे चांगले कवी होते. भारतीय स्वातंत्र्य संग्रामच्या इतिहासामध्ये बिस्मिल आणि अशफाक यांची भूमिका निर्विवादपणे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक अनुपम उदाहरण आहे
२. (१९३७) हिंदी चित्रपटातील अभिनेते, लेखक कादर खान यांचा जन्म
ते हिंदी चित्रपटांचे पटकथा लेखक आणि त्यांत अभिनय करणारे अभिनेते होते. ज्या चित्रपटाची कथा कादर खान लिहीत, किंवा ज्या चित्रपटात ते अभिनय करीत त्या चित्रपटांत ते स्वतःला पूर्णपणे झोकून देत. चित्रपटाचा ते कणा असत
३. (१९४७) प्रसिद्ध कवी अदम गोंडवी यांचा जन्म
भारतातील गरिबांच्या दुरवस्थेवर आपल्या कवितेच्या माध्यमातून कवी अदम गोंडवी यांनी लक्ष वेधले. ते सत्तेच्या पुढे कधी झुकले नाहीत. कष्टकरी मजदुरांचा आवाज त्यांनी उचलला. महिलांच्या प्रश्नाबाबत त्यांनी लिखाण केले. भ्रष्ट राजकीय नेत्यांवर त्यांनी लिखाणाच्या माध्यमातून आसूड ओढला
● निधन
१. (१९७८) साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके यांचे निधन
नारायण सीताराम फडके हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ना. सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध होते
तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात होते. फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात, त्या केवळ मनोरंजन करतात, मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत, आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणाऱ्या असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असत. असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई, मृदुमधुर भाषा, कथेमधले एखादे नाजूक रहस्य, विस्मयाच्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांचे कथांचे विशेष होते
रत्नागिरी येथे १९४० साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना देण्यात आला होता
१९२० च्या दशकात फडक्यांनी भारताची लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी जन्मदर नियंत्रण आणि युजेनिक्स (Eugenics) यांचे जोरदार समर्थन केले. १९२७ मध्ये त्यांनी 'भारतातील लैंगिक समस्या' या विषयावर प्रकाशित केलेल्या पुस्तकासाठी अमेरिकेतील कुटुंब नियोजनाच्या सुप्रसिद्ध समर्थक, श्रीमती मार्गारेट सेंगर ह्यांनी प्रस्तावना लिहिली होती. बर्थ कंट्रोल रिव्ह्यूव नावाच्या नियतकालिकात देखील ह्या विषयावरील त्यांचे लेख प्रसिद्ध झाले होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment