दिनविशेष १५ ऑक्टोबर
दिनविशेष
दि. १५ ऑक्टोबर
■ दिनविशेष
१. जागतिक ग्रामीण महिला दिन
१९९५ मध्ये बीजिंग येथे महिलांवरील चौथ्या जागतिक परिषदेत ग्रामीण महिलांना एका विशेष दिवसासह सन्मानित करण्याचा विचार आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांनी मांडला होता. तेव्हा १५ ऑक्टोबर हा 'जागतिक ग्रामीण महिला दिन' म्हणून साजरा करण्याची सूचना करण्यात आली. कृषी आणि ग्रामीण विकास, अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी आणि ग्रामीण गरिबी निर्मूलनामध्ये स्थानिक महिलांसह ग्रामीण महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका आणि योगदान आहे
२. जागतिक अंध दिन
१५ ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक अंध दिन किंवा पांढरी काठी सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पहिल्या महायुद्धानंतर डॉ. रिचर्ड व्हुव्हर यांनी सर्वप्रथम अंधांना चालण्या फिरण्यासाठी सोयीची पडेल अशी विशिष्ठ स्वरूपाची काठी तयार केली. ती काठी हुव्हर केन म्हणून ओळखली गेली. १९२१ मध्ये मध्ये ब्रिस्टलचे फोटोग्राफर जेम्स विंग्ज यांना अपघातात अंधत्व आले. तेव्हा गडद रंगांच्या काठय़ा घेऊन फिरताना वाहनचालक आणि इतर डोळस व्यक्तींना दुरून ती ओळखणे कठीण जाते. हे लक्षात आल्यानंतर अंधारातही सहजपणे दिसेल, असा पांढरा रंग आपल्या काठीला दिला
३. वृत्तपत्र विक्रेता दिन
वृत्तपत्र विक्रेता ते राष्ट्रपती असा प्रेरणादायी जीवनप्रवास करणारे डों। ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा दिवस 'वृत्तपत्र विक्रेता दिन' म्हणून साजरा केला जातो. भल्या पहाटे वाचकांना नियमितपणे घरपोच वृत्तपत्र पोहचवण्याचे अविरत काम करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रति यानिमित्ताने कृतज्ञता व्यक्त करण्यात येतो. २०१८ सालापासून हा दिवस साजरा करण्यात येतो
४. वाचन प्रेरणा दिन
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. वाचनाने अनुभवविश्व व्यापक होतं. जाणीवा समृद्ध होतात. जीवनाचं आणि भवतालाचं आकलन अधिक सखोल होतं. मनाची अव्याहत मशागत करणारा आणि जीवनानुभवाचं अनवट दर्शन घडवणारा पुस्तकांसारखा दुसरा गुरू नाही. भाषेचा अभिजात गोडवा आणि आशयगर्भ कस याची नीजखूण वाचनामुळेच खोलवर पटत जाते. हा दिवस महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालयांमध्ये साजरा केला जातो
◆ जन्म
१. (१९२६) मराठी भाषेतील कवी नारायण सुर्वे यांचा जन्म
कवी नारायण सुर्वे यांच्यावरती मार्क्सवादी विचाराचा पगडा होता. आपल्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाची कवने लिहिली. आपल्या हक्क आणि अस्तित्वासाठी झगडणारा माणूस त्यांच्या कवितेतील अनुभव सृष्टीच्या मध्यवर्ती भूमिकेत आहे. त्यांची कविता तळागळातील जनतेचे प्रतिनिधीत्व करते. 'माझे विद्यापीठ' हा त्यांचा काव्यसंग्रह खूप गाजला
२. (१९३१) भारताचे माजी राष्ट्रपती, भारताच्या अवकाश भरारीचे शिल्पकार, महान शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा जन्म
ते एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. तसेच त्यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते. कलाम हे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले होते, आणि तेथेच त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला. त्यांनी पुढील चार दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून, प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे काम केले
कलाम यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. वाचनाने अनुभवविश्व व्यापक होतं. जाणीवा समृद्ध होतात. हा दिवस महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालयांमध्ये साजरा केला जातो
३. (१९४९) एन. डी. टी. व्ही. (NDTV) या वृत्तवाहिनीचे सह-संस्थापक, पत्रकार प्रणॉय रॉय यांचा जन्म
ते भारतीय अर्थशास्त्रज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट, सेफोलॉजिस्ट, पत्रकार आणि लेखक आहेत. ते एनडीटीव्हीचे कार्यकारी सह-अध्यक्ष आहेत आणि पत्नी राधिका रॉय यांच्यासह सह-संस्थापकांपैकी एक आहेत. एनडीटीव्ही हे भारतातील पहिले स्वतंत्र न्यूझ नेटवर्क होते. प्रणय रॉय यांना देशातील ओपिनियन पोलचे श्रेय देखील दिले जाते
● निधन
१. (१९६१) हिंदी साहित्यिक, उपन्यासकार, निबंधकार, कथाकार सूर्यकांत त्रिपाठी ’निराला' यांचे निधन
मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने ते हिंदी भाषा शिकले आणि तीत साहित्यनिर्मितीही करू लागले. वृत्तीने ते बंडखोर आणि विचाराने क्रांतिवादी होते. आर्थिक संघर्षाबरोबरच साहित्यिक मान्यतेसाठीही त्यांना संघर्षच करावा लागला. जीवनभर कराव्या लागलेल्या संघर्षाचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर व परिणामतः काव्यावर झालेला आहे. उत्तरायुष्यात मानसिक तोल ढासळल्यामुळे त्यांच्या वृत्तीत विक्षिप्तपणा आला. काव्याशिवाय त्यांनी कथा, कादंबऱ्या आणि निबंधही लिहिले. समन्वय, मतवाला, सुधा इ. नियतकालिकांचे संपादनही त्यांनी काही काळ केले. एकूण ४४ ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत
त्यांच्या अभिव्यक्तीवर बंगाली आणि इंग्रजी भाषांतील काव्याचा प्रभाव दिसतो. निरालांचे एकूण काव्य वैविध्यपूर्ण आहे. शृंगार, कारूण्य, वात्सल्य, हास्य, उपरोध यांनी ते संपन्न आहे. राम की शक्तिपूजासारख्या त्यांच्या दीर्घकाव्यात पौरुष व ओज यांचा प्रत्यय येतो. तुलसीदास ही चिंतनपर, अंतर्मुख वृत्तीची दीर्घकविता त्यांच्या निसर्गप्रेमाची, सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या तळमळीची आणि रचनाकौशल्याची साक्ष देते
निसर्गप्रेम, सौंदर्याची आसक्ती, उत्तुंग कल्पनाशक्ती, चोखंदळ शब्दयोजना, सूक्ष्मता, वैयक्तिकता ही सर्व छायावादी वैशिष्ट्ये तर निरालांच्या काव्यात आढळतातच पण त्यांचे खास वैशिष्ट्य हे, की, ते काळाबरोबर गतिशील राहिले छायावादाच्या हळव्या व भावविवश विश्वातून कठोर वास्तवाच्या खडबडीत भूमीवर ठामपणे उभे राहिले. ‘भिक्षुक’, ‘वह तोडती पत्थर’, ‘बनबेला’, ‘कुकुरमुत्ता’ यांसारख्या सामाजिक आशयाच्या कविता त्यांनी लिहिल्या. वास्तवाशी इमान राखण्याच्या वृत्तीमुळे आणि संवेदनशील स्वभावामुळे त्यांच्या कविता आजही ताज्या व परिणामकारक वाटतात. म्हणूनच छायावादाचा प्रभाव ओसरल्यावरही निरालांची लोकप्रियता टिकून राहिली. भारतीयसांस्कृतिक परंपरेचा रास्त अभिमान, सद्यःकालीन सांस्कृतिक ऱ्हासाबद्दलचा विषाद आणि आदर्शाची अनिवार ओढ त्यांच्या काव्यात व्यक्त झाली. निरालांच्या कथा आणि मनोवेदनांनी थरथरणाऱ्या कितीतरी कविता रसिकांच्या ह्रदयाचा ठाव घेतात
२. (२००२) लेखक व पटकथाकार वसंत सबणीस यांचे निधन
ते मराठी साहित्यिक, नाटककार होते. लेखक, विनोदी नाटककार, ग्रामीण कथेला विनोदी बाज देणारे कथाकार व पटकथालेखक म्हणून वसंत सबनीस महाराष्ट्रात गाजले होते. त्यांचे मूळ नाव रघुनाथ दामोदर सबनीस होते. चिल्लरखुर्दा (१९६०), भारूड (१९६२), मिरवणूक (१९६५), पंगत (१९७८), आमची मेली पुरुषाची जात (२००१) हे प्रसिद्घ लेखसंग्रह होत. त्यांच्या कथांवरून 'एकटा जीव सदाशिव', 'सोंगाड्या' हे दादा कोंडकेनिर्मित चित्रपट बनले. 'अशी ही बनवाबनवी', 'एकापेक्षा एक', 'गंमत जंमत', 'नवरी मिळे नवऱ्याला', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' ह्या सचिन पिळगावकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटांच्या कथा-पटकथा सबनीसांच्या होत्या
३. (२०२०) चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार भारताला मिळवून देणाऱ्या भारतीय वेषभूषाकार भानु अथैय्या यांचे निधन
रिचर्ड अॅटेनबरोच्या ‘गांधी’ या चित्रपटातील गांधीजींच्या वेषभूषेसाठी त्यांना ऑस्कर पारितोषिक मिळाले. जोम मोलो यांच्याबरोबर विभागून हे पारितोषिक मिळाले होते. हे पारितोषिक मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत. तसेच ‘लगान’, ‘स्वदेश’ यासारख्या चित्रपटांमधील कलाकारांच्या वेषभूषा त्यांनी समर्पकपणे साकारल्या. भानू यांनी अमोल पालेकरांच्या ‘महर्षी कर्वे’ या मराठी चित्रपटासाठीही वेषभूषा केली होती
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment