दिनविशेष ११ ऑक्टोबर

दिनविशेष

दि. ११ ऑक्टोबर

■ दिनविशेष 

१. आंतरराष्ट्रीय बालिका दिन (International Girl Child Day)

आंतरराष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स (UN) च्या आमसभेत हा दिवस मुलींसाठी सन्मानाचा दिवस म्हणून घोषित करणारा ठराव मंजूर करण्यात आला. तेव्हापासून हा दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. १९९५ मध्ये बीजिंगमधील महिलांच्या जागतिक परिषदेत बीजिंग जाहीरनाम्यात सर्वप्रथम महिला आणि मुलींच्या हक्कांसाठी आवाज उठवला गेला. जगभरातील मुलींना भेडसावणाऱ्या समस्या ओळखण्याची ही जगाच्या इतिहासातील पहिली सुरूवात होती

◆ जन्म 

१. (१९०२) स्वातंत्र्यसैनिक आणि सर्वोदयी नेते जयप्रकाश नारायण यांचा जन्म

ते स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते आणि सर्वोदय चळवळीचे प्रमुख नेते होते. उत्तर भारतातील ते एक महत्त्वाचे नेते होते

२. (१९४२) प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांचा जन्म

भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे

३. (१९४६) संगणक तज्ञ विजय भटकर यांचा जन्म

'सी. डॅक' या प्रगत संगणकीय विकसन केंद्राचे ते संस्थापक होते. ८ ग्रंथांचे लेखन-संपादन व सुमारे ७५ शोधनिबंध यांमुळे त्यांनी संगणकीय विज्ञान क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. भटकरांनी १९९३ मध्ये परम-८०० तर १९९८ मध्ये परम-१००० हे संगणक बनवले. हा संगणक प्रति सेकंद एक अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो. विकसनशील देशातील असा हा एकमेव संगणक आहे. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपान सोडता फक्त भारतात आहे

● निधन
 
१. (१९६८) अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी आयुष्य वाहिलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन

त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी इ.स. १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते

तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. 'आते है नाथ हमारे' हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते

भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांची जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते

तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले. देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला

ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेले लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता या ग्रंथामधील विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर