दिनविशेष १० जुलै

दिनविशेष

दि. १० जुलै

* जागतिक मातृसुरक्षा दिन

१० जुलै रोजी जगभरात ‘मातृ सुरक्षा दिन' साजरा केला जातो. सन २००५ पासून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याची जगभर अंमलबजावणी सुरू केली. आईचे आरोग्य आणि विशेषतः गरोदर पणाच्या कालावधीत होणा-या मृत्युदरात झालेली वाढ, याबाबत जनजागृकता निर्माण करण्यासाठी तसेच यावर उपाययोजना करण्याची गरज भासवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आता त्यासाठी १० जुलै हाच दिवस का निवडला असावा? तर यामागे सुद्धा एक खास कारण आहे. उद्या म्हणजेच ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस (World Population Day) साजरा केला जातो. लोकसंख्येची वाढ आणि नवमातांचे आरोग्य (New Mother's Health) याचा संबंध जोडून १० जुलै हा दिवस निवडण्यात आलेला आहे

तज्ञांच्या माहितीनुसार, गरोदर महिलांमध्ये होणाऱ्या मृत्यूचे मुख्य कारण हे रक्तदाबाशी संबंधित समस्या असतात. प्रसूतीच्या वेळी रक्तस्त्राव वाढणे, गरोदर असताना सतत रक्तदाब कमी अधिक होत राहणे यामुळे महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यातही हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या माता या अधिक धोक्याच्या ठिकाणी असतात. मुळातच गरोदर महिलांच्या अपघाती मृत्यूपेक्षाही आरोग्याची योग्य काळजी न घेतल्याने निर्माण होणाऱ्या समस्या अधिक आहेत. याशिवाय दोन अपत्यांमधील सुरक्षित अंतर, गरोदरपणात घ्यायची काळजी या सर्व बाबीत सुद्धा जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी या दिवसाची सुरुवात करण्यात आली आहे


१. (१९१३) कवयित्री पद्मा गोळे यांचा जन्म

त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रितीपथावर हा इ.स. १९४७ साली प्रकाशित झाला. कवितासंग्रहांशिवाय त्यांनी रायगडावरील एक रात्र, स्वप्न (इ.स. १९५५), नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली 'वाळवंटातील वाट' नावाची कादंबरीही प्रकाशित झाली

२. (१९२३) साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, रहस्यकथाकार, लेखक गुरुनाथ आबाजी कुलकर्णी तथा जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म

इंग्रजी साहित्याचे अभ्यासक असलेले जी. ए. कुलकर्णी यांनी काजळमाया, रक्तचंदन आदी कथासंग्रह लिहिले. माणसाच्या मनोव्यथा लिहिणाऱ्या जी ए कुलकर्णी यांच्या विदूषक व शांताक्का या व्यक्तिरेखांनी मराठी मनावर गारुड केले

जीए, अनंत व आनंद अंतरकर यांच्यांमधील पत्रव्यवहार ’एक धारवाडी कहाणी’ नावाच्या पुस्तकाद्वारे प्रकाशित झाला आहे. जीएंचे पत्रसाहित्य वाचणे हा उच्च प्रतीचा आनंद आहेच, शिवाय हे साहित्य पुढील पिढ्यांच्या वाङ्‌मयीन अभ्यासाठी उपयुक्त आणि मोलाचा ठेवा आहे

३. (१९३९) शेतकरी ते संशोधक झालेले, ९ वेगवेगळ्या तांदळाच्या जातीचे संशोधन लावणारे कृषी संशोधक शेतकरी दादाजी खोब्रागडे यांचा जन्म

केवळ इयत्ता तिसरी पर्यंत शिकलेले खोब्रागडे एक अल्पभूधारक शेतकरी होते. १९८३ पासून त्यांनी तांदळाचे नवीन वाण बनवण्याच्या प्रयोगाला सुरुवात केली. सहा वर्षांच्या बीजगुणनाच्या प्रयोगानंतर ते नवीन वाण तयार करण्यात यशस्वी झाले. या वाणाला काय नाव द्यायचे, हे न सुचल्यामुळे त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या एच.एम.टी. कंपनीच्या एच.एम.टी. सोना घड्याळावरून तेच नाव या वाणाला दिले

४. (२००५) मराठी संगीतकार, पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचे निधन

जयवंत कुलकर्णी यांना गायनाचे धडे तत्कालीन प्रसिद्ध शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवासकर यांच्याकडून मिळले. लक्ष्मणरावांनी त्यांना हार्मोनियम वाजवायलाही शिकवले. जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील गाण्यांवर सत्तरच्या दशकातील तरुणाई इतकी फिदा होती की, त्यांनी मंचावर उभे राहून गायलेल्या 'हिल पोरी हिला' किंवा 'ही चाल तुरू तुरू' या दोन गाण्यांना हमखास वन्स मोअर मिळत असे. उडत्या चालीच्या संगीतासोबतच जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील जोरकसपणा ही त्यांच्या काळची खासियत होती. मराठी चित्रपटगीतांसाठी व भावगीतांसाठी हा प्रयोग त्याकाळी नवीनच होता. जयवंत कुलकर्णी यांनी जी चित्रपट गीते गायली त्यांतल्या बऱ्याच गाण्यांमध्ये गावरान बाज ठासून भरलेला असे

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर