दिनविशेष २५ जुलै
दिनविशेष
दि. २५ जुलै
◆ जन्म
१. (१८७५) विश्वविख्यात शिकारी आणि तत्संबंधी लेखक, छायाचित्रकार, वन्यजीव संवर्धक जिम कॉर्बेट यांचा जन्म
जिम कॉर्बेट यांच्या दूरदृष्टीमुळे भारतात वन्यजीवांना अभयाने राहता यावे म्हणून अभायारण्ये घोषित करण्यात आली. त्यातील पहिले लॉर्ड माल्कम हिली यांच्या नावाने हिली राष्ट्रीय उद्यान घोषित करण्याचा मान जिमना मिळाला. याच राष्ट्रीय उद्यानाचे १९५७ साली कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान असे नामांतरण करण्यात आले
२. (१९१९) गायक, संगीतकार सुधीर फडके यांचा जन्म
बाबूजी या नावानेदेखील त्यांना ओळखले जाते. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीत आहे. फडके यांनी मराठी व्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपटांमध्येही गाणी गायली आणि संगीतबद्ध केली
३. (१९२२) कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट यांचा सातारा जिल्ह्यातील कराड येथे जन्म
वसंत बापट तरुण वयातच भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात सहभागी झाले. १९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांचा सहभाग होता. ऑगस्ट १९४३ पासून जानेवारी १९४५ पर्यंत ते तुरुंगात होते. तुरुंगातून सुटल्यावर वसंत बापट 'नॅशनल कॉलेज (वांद्रे) आणि 'रामनारायण रुईया कॉलेज (माटुंगा)' ह्या मुंबईतील महाविद्यालयांत मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक झाले. लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. शेवटपर्यंत ते राष्ट्रसेवा दलाशी संलग्न होते. 'बिजली' ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'अकरावी दिशा', 'सकीना' आणि 'मानसी' हे त्यांचे ’बिजली’नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या. वसंत बापट १९८३ ते १९८८ या काळात साधना नियतकालिकाचे संपादक होते. १९९९ मध्ये मुंबई येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले
● मृत्यू
१. (१८८०) समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांचे निधन
शेती व आरोग्य हे त्यांचे आवडते विषय होते. शास्त्रीय ज्ञानाची जोड देऊन शेतीत नवे प्रयोग करावेत व संशोधन करावे असे त्यांना वाटत असे. गणपतरावांनी २ एप्रिल १८७० रोजी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली. या संस्थेतर्फे गणपतरावांनी जी विधायक व समाजोपयोगी कामे केली, त्यामुळे त्यांना 'सार्वजनिक काका' हे टोपणनाव मिळाले
२. (२०१५) भारतीय वकील आणि राजकारणी आर. एस. गवई यांचे निधन
ते भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि रिपाइं गवई गटाचे संस्थापक व अध्यक्ष होते. ते आंबेडकर प्रणीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातही अनेक कार्ये केली. गवई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही काम केले होते. ते बिहार, सिक्किम व केरळ या तीन राज्यांचे राज्यपाल, तसेच लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सदनाचे सदस्य (खासदार) होते. गवई हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सलग ३० वर्ष सदस्य (आमदार) होते. यादम्यान त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती, उपासभापती व विरोधी पक्षनेता या पदांवर कार्य केले
३. (२०२४) भारतीय कॅथोलिक धर्मगुरू, लेखक, सामाजिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन
ते पर्यावरणाचे रक्षणकर्ते, सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व होते. ’सुवार्ता’ या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्तीधर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाचा स्वतंत्र ठसा उमटला. ’हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संरक्षण, जतन व संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. वसईतील ’राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोठी मोहीम राबविली
#visalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment