दिनविशेष ०१ जुलै
दिनविशेष
दि. ०१ जुलै
* कृषी दिन (महाराष्ट्र राज्य)
राज्यात दरवर्षी १ जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो. या निमित्ताने १ जुलै ते ७ जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो. वसंतराव नाईक यांची जयंती 'कृषी दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला. तेव्हापासून एक जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषीदिन साजरा होत आहे. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो
* राष्ट्रीय डॉक्टर्स डे
प्रसिद्ध डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी भारतात १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा केला जातो. १९९१ मध्ये पहिला राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा करण्यात आला
१. (१९१३) हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म
महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा होता. कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल, याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते. वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. त्यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो
वसंतराव नाईक हे हाडाचे शेतकरी होते. 'शेती आणि शेतकरी' हे त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. तसेच त्यांनी राज्यात 'कृषी विद्यापीठा'ची स्थापना केली. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. १९७२ च्या दुष्काळाचे संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारले आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला
२. (१९३८) ज्येष्ठ बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म
ते भारतीय बासरीवादक, संगीतकार आहेत. हिंदुस्तानी संगीतशैलीच्या ढंगाने केलेल्या बासरीवादनासाठी ते प्रसिद्ध आहेत
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment