दिनविशेष १६ मे
दिनविशेष
दि. १६ मे
* जागतिक, महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन दिन
१६ मे हा दिवस जागतिक तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्यात २००७ सालापासून महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन दिन साजरा केला जाऊ लागला. महाराष्ट्रात युवा शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन केंद्रे सुरु केली आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटन केंद्रांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. विशेष म्हणजे यामध्ये उच्च शिक्षित शेतकऱ्यांचं प्रमाण मोठे आहे. कृषी पर्यटन केंद्रातील आर्थिक तसेच व्यावसायिक संधी ओळखून अनेक युवा शेतकरी हा मार्ग निवडत असल्याचं दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्राच्या २९ जिल्ह्यांमध्ये २२९ पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्रे आहेत. कृषी आणि ग्रामीण पर्यटन चळवळ ५२८ कृषी पर्यटन केंद्रापर्यंत गेली आहे
१. (१९२६) हिंदुस्तानी संगीत व सुगम संगीत प्रकारात गायन करणाऱ्या मराठी गायिका माणिक वर्मा यांचा जन्म
त्यांनी मराठी भाषेतील गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते गायली आहेत. किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्तानी संगीत शिकल्या. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल इ.स. १९७४ साली पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले
२. (१९५०) कोल्हापूर संस्थानचे दिवाण, शिक्षणमंत्री आणि सत्यशोधक चळवळीचे सच्चे कार्यकर्ते अण्णासाहेब लठ्ठे यांचे निधन
अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टी जोपासणे, स्त्री-शिक्षणास प्रोत्साहन, वसतिगृहांची निर्मिती आणि धर्मशिक्षण यांसाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले
३. (१९६२) १६ मे १९६२ रोजी सातारा जिल्ह्यातील, पाटण तालुक्यातील कोयना प्रकल्प कार्यान्वित
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच कोयना प्रकल्पाच्या उभारणीचा श्रीगणेशा झाला. धरणाच्या बांधकामास १ मार्च १९५८ ला प्रारंभ होऊन हा प्रकल्प १६ मे १९६२ ला कार्यान्वित झाला. कोयना धरणाच्या जलाशयात आशिया खंडातील दुसरी जलाशय छेद प्रक्रिया (लेक टॅपिंग) २५ एप्रिल २०१२ ला यशस्वीरित्या पार पडली. त्यामुळे कोयनेतील हे अभियांत्रिकी नवल सातासमुद्रापार चर्चेत येताना धरणाची पाणी वापर क्षमता जवळपास २० टीमएसीने वाढली. अभियांत्रिकीच्यादृष्टीने हा वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग होता. पहिल्या ‘लेकटॅपिंग’नंतर कोयनेची वीजनिमिर्ती क्षमता एक हजार मेगावॅटने वाढली. दुसऱ्या ‘लेकटॅपिंग’नंतर धरणाच्या अगदी तळापर्यंतचे शिल्लक राहणारे पाणी वापरायला उपलब्ध झाले. कोयना धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. पावसाळ्यात क्षमतेच्या दुप्पट ते अडीचपट पाणी धरणात येऊनही त्याचे नियंत्रण करण्यात अनेकदा यश आले आहे
४. (१९९४) मराठी नाटककार, लेखक, समीक्षक माधव मनोहर यांचे निधन
इंग्रजी वाङ्मय वाचल्यावर माधव मनोहर यांना मराठी साहित्य आणि मराठी नाटक खूपच खुजे आणि परावलंबी असल्याची जाणीव झाली. येथूनच पुढे माधव मनोहर या समीक्षकाचा उदय झाला. इंग्रजीतले चांगले वाङ्मय मराठीत आणण्याचा त्यांनी सपाटा लावला. दैनिक केसरीत ’चौपाटीवरून’ या सदरात, व ’सोबत'मध्ये ’पंचम' या सदरातून ते नाट्यसमीक्षणे लिहीत असत. ’नवशक्ती’, ’रत्नाकर, ’रसरंग’मधूनही त्यांचे समीक्षालेख प्रकाशित होत. त्यांचे स्वतःचे साहित्य आहे त्यापेक्षा त्यांचे समीक्षासाहित्य अधिक आहे, त्यामुळे माधव मनोहर हे नाव साहित्यिकांच्या पंक्तीतून समीक्षकांच्या पंक्तीत जाऊन बसले
माधव मनोहर वृत्तीने स्थितप्रज्ञ होते. त्यामुळे टीका आणि स्तुती दोनही त्यांना समान असे. कोणी त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली आणि तीही शब्दांच्या माध्यमातून, तरी ते त्याला लेखणीने प्रत्युत्तर देत असत. त्यांची लेखणी इतकी परखडपणे बोलत असे की त्यांना कधी काही बोलावेच लागले नाही. मराठी साहित्यावर टीका करताना ते साहित्य कसे आहे यावरच त्यांचे लक्ष असे, ते कोणाचे आहे याला त्यांच्या लेखी काहीच महत्त्व नसे. माधव मनोहर यांचे वाचन अफाट होते, त्यामुळे ते साहित्यातील चोऱ्या सहज पकडत. वाङ्मयचौर्य पकडण्याच्या त्यांच्या या कामामुळे त्यांना ’साहित्यातले फौजदार’ म्हणत. माधव मनोहर यांच्यानंतर साहित्याला दिशा दाखवणारा इतका समर्थ टीकाकार मिळणे दुर्मीळ आहे
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment