दिनविशेष ०४ एप्रिल
दिनविशेष
दि. ०४ एप्रिल
दिनविशेष
दि. ०४ एप्रिल
१. (१९३०) मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते निळू फुले यांचा जन्म
निळू फुले यांनी 'कथा अकलेच्या कांद्याची' या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण केले. 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, आणि सलग ४० वर्षे या चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर कारकीर्द केली. निळू फुले यांनी १२ हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, तर मराठी भाषेतल्या जवळपास १४० चित्रपटांमधून काम केले आहे. त्यांच्या भूमिकांपैकी 'चोरीचा मामला', 'पुढचं पाऊल', 'शापित', 'सामना', 'सिंहासन' यांतील भूमिका विशेष गाजल्या
नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला. सहज सुंदर अभिनय करणाऱ्या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला
नाट्य रसिक आणि सिने प्रेमींना कलाकार म्हणून अत्यंत प्रिय असलेले निळू भाऊ समाजवादी विचारधारेशी जोडलेले होते. निळूभाऊंनी राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केलेली आहे. ते समाजवादी विचारवंत नेते डॉ राम मनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रेरित होते. मुळातच नास्तिक असलेल्या फुलेंनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेसाठी अंधश्रद्धा विरोधी प्रबोधन, सत्याग्रह, आंदोलनात सक्रीय सहभाग दिला आहे. स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्या नंतरही पिढी घडविणारी राष्ट्रीय संघटना असलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या कला पथकाचे सदस्य राहिलेले निळू फुले यांनी १९५८च्या सुमारास पुण्यातील कला पथकाचे नेतृत्व केले
२. (१९३३) प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचा जन्म
बापू नाडकर्णी हरहुन्नरी खेळडू असूनही क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झाले ते त्यांच्या गोलंदाजीच्या पराक्रमामुळे. त्यांच्या गोलंदाजीच्या अनेक कथा आणि किस्से प्रसिद्ध आहेत. बापू आपल्या गोलंदाजीत एकही वेळा चूक करीत नाहीत हिच सगळ्यात मोठी चूक ते करतात असे क्रिकेटचे पंडित म्हणत. कंजूस गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती
३. (१९४७) मालवणी भाषेवर निस्सीम प्रेम करणारे व तिला रंगभूमीवर आणून प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारे विनोदी अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांचा जन्म
ते नाटककार, निर्माता आणि दिग्दर्शकही होते. त्यांनी मालवणी बोली मराठीत लोकप्रिय केली. ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्षही होते
४. (१९६८) अमेरिकेतील समान नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांचे निधन
ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. यासाठी ते आज मानवाधिकाराचे प्रतीक म्हणून ओळखले जातात
५. (१९८७) ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय यांचे निधन
ते हिंदीमधील आपल्या काळातील सर्वाधिक चर्चित कवी, कथाकार, निबंधकार, पत्रकार, संपादक, प्राध्यापक होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment