दिनविशेष १० मार्च
दिनविशेष
दि. १० मार्च
१. (१८९७) देशातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक, कवियत्री, शिक्षणतज्ज्ञ सावित्रीबाई फुले यांचे निधन
आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी इ.स. १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती
२. (१९२९) कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म
सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ज्युलिअस सीझर, रोमिओ आणि ज्युलिएट, दी टेम्पेस्ट या शेक्सपिअरच्या तीन नाटकांचे मुळाबरहुकूम भाषांतरे ही त्यांच्या नावावर आहेत. पाडगावकर यांनी या तीनही पुस्तकांना दीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. अशाच दीर्घ प्रस्तावना कबीर आणि सूरदास या पुस्तकांनाही आहेत
३. (१९७२) विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला
सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक मराठी नाटक आहे. हे नाटक स्त्रीवादी दृष्टिकोनातून आहे. सखाराम बाईंडर मध्ये हाताळलेला विषय स्फोटक होता. पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध तेंडुलकरांच्या प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली
४. (१९९९) मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे निधन
ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment