दिनविशेष ०८ मार्च

दिनविशेष

दि. ८ मार्च 

* जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो

१९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने 'सार्वत्रिक मतदानाचा हक्क' मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली गेली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा 'जागतिक महिला दिन' म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लारा झेटकिन यांनी मांडला आणि तो पास झाला. त्यानंतर १९११ साली पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला

१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले

भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या, स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या


१. (१८६४) मराठी लेखक,  कादंबरीकार, नाटककार हरी नारायण आपटे यांचा जन्म

ते मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते ज्ञानप्रकाश या मासिकाचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. आठ स्त्रीरत्ने या सदराखाली ह.ना.आपटे यांनी भास्कराचार्यांची लीलावती, राणी दुर्गावती इत्यादी स्त्रियांची बोधप्रद माहिती प्रकाशित केली होती. केशवसुतांची कविता आणि गोविंद बल्लाळ देवल यांचे शारदा हे नाटक हरिभाऊ आपट्यांनीच प्रकाशात आणले

२. (१९२१) गीतकार साहिर लुधियानवी यांचा जन्म

ते एक प्रसिद्ध कवी आणि हिंदी चित्रपट गीतकार होते. संगीतकार एस.डी. बर्मन यांच्यासोबत साहिर यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील वाटचाल सुरू झाली. पहिल्याच भेटीत सचिनदांना साहिर यांनी काही ओळी लिहून दिल्या. १९५१ मध्ये आलेल्या 'नौजवान' चित्रपटात या गीताचा समावेश झाला आणि हे गीत प्रचंड लोकप्रिय ठरले. साहिर यांनी या प्रेमगीतात संपूर्ण निसर्ग उभा केला होता. या गीताने चित्रपटसृष्टीला साहिर यांच्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. हे गीत होते - 'ठंडी हवाएँ लहराके आयें, ऋतु है जवाँ, तुम हो यहाँ, कैसे भुलायें...'

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर