दिनविशेष
दि. २० मार्च
* सामाजिक सबलीकरण दिन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना पिता यावे यासाठी सत्याग्रह केला होता. यामुळेच २० मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारताभर साजरा केला जातो
* जागतिक चिमणी दिन
ज्या चिऊताईच्या चिवचिवाटाने सकाळी जाग यायची, तिच्या संवर्धनाची मोहीम कधी हाती घेतली जाईल, याची कल्पना कुणी केली होती काय ? पण आज चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे
नेचर फोरेव्हर सोसायटीचे संस्थापक असलेले नाशिकचे मोहम्मद दिलावर यांना असा दिन असावा अशी कल्पना सुचली. त्यांनी २० ते २५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या साथीने प्रयत्न केल्यावर २०१० साली हा दिन अस्तित्वात आला
* आंतरराष्ट्रीय आनंदी दिन
आनंदी राहता यावं यासाठी अनेकदा लोकं वेगवेगळे उपाय करतात. मात्र त्यानं ते आनंदी होतीलच असं नाही. मानसिक दृष्टीनं आनंदी राहणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. लोकांना आरोग्याप्रती जागरुक करण्यासाठी प्रत्येक वर्षी २० मार्च रोजी आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस साजरा केला जातो
संयुक्त राष्ट्रानं इंटरनेशनल डे ऑफ हॅप्पीनेस साजरा करण्याची घोषणा केली. २०१३ सालापासून हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. २०१३ मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय आनंदी दिन भूटानची राजधानी थिम्पूमध्ये साजरा केला गेला. त्यानंतर हळूहळू हा दिवस जगभरात साजरा केला जाऊ लागला
* जागतिक मौखिक आरोग्य दिन
मौखिक आरोग्य आणि त्याचा एकूण आरोग्याशी गुंतागुंतीचा संबंध याबद्दल जागरूकता पसरविण्यासाठी दरवर्षी २० मार्च रोजी जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा केला जातो. गेल्या दशकभरापासून, जगभरात मौखिक आरोग्य शिक्षण, प्रतिबंध आणि वकिलीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यंदा २०२४ ची थीम आहे - आनंदी तोंड म्हणजे.... आनंदी शरीर. तोंडी आरोग्य आणि एकंदरीत कल्याण यांच्यातील गुंतागुंतीच्या संबंधावर प्रकाश टाकणारी ही थीम भयानक आजार टाळण्यासाठी दंत स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याबद्दल आहे
दररोज दात घासणे आणि तोंडाची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. हे केवळ दातांचे आणि हिरड्यांचे रोग टाळण्यासाठीच नव्हे तर हृदयरोग आणि मधुमेह यासारख्या तीव्र परिस्थितीचा धोका कमी करण्यासाठी देखील महत्वाचे आहे. हे खरे आहे की मौखिक आरोग्य एकंदर कल्याणास हातभार लावते आणि चांगल्या आरोग्याकडे प्रवास स्वच्छ तोंडातून सुरू होतो. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार मौखिक रोग जगभरातील ३.५ अब्ज लोकांना प्रभावित करतात. ते वेदना, अस्वस्थता, विकृती आणि अगदी मृत्यूस कारणीभूत ठरू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज २०१९ नुसार कायमस्वरूपी दातांमध्ये उपचार न केलेल्यामध्ये दात किडणे ही सर्वात सामान्य आरोग्याची स्थिती आहे. साखरेचे सेवन, तंबाखूचे सेवन, अल्कोहोलचा वापर आणि अस्वच्छता ही लोकांच्या दातांचे आरोग्य खराब होण्यामागील कारणे आहेत
१. (१९२०) प्रतिभावंत नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांचा जन्म
प्रेक्षकांना झपाटून टाकतील अश्या नाटकांची कानेटकर यांनी निर्मिती केली. रायगडाला जेंव्हा जाग येते, अश्रूंची झाली फुले व हिमालयाची सावली या कलात्मक नाटकांनी व सुर्याची पिल्ले, लेकुरे उदंड जाहली, गगनभेदी, प्रेमाच्या गावा जावे अशा व्यावसायिक नाटकांनी त्यांनी मराठी रंगभुमीला नवी झळाळी प्राप्त करुन दिली
२. (१९५६) मराठी नवकाव्याचे प्रणेते बाळा सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा. सी. मर्ढेकर यांचे निधन
सातारा जिल्ह्यातील मर्ढे गावचे सुपूत्र, मराठी नवकाव्याचे प्रवर्तक, ज्येष्ठ कवी बा. सी. मर्ढेकर यांनी दुसऱ्या महायुद्धानंतरची समाजातील वेदना व निराशा आपल्या काव्यातून उमटवली. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसऱ्या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे
३. (२०१४) भारतीय पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांचे निधन
ते इंग्रजी भाषेत लेखन करणारे भारतीय लेखक, पत्रकार होते
४. (२०१५) पसरणी ता. वाई, जि. सातारा गावचे सुपुत्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचे निधन
ते एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. साने गुरूजींकडून राष्ट्रवाद आणि निर्व्याज देशभक्तीचं बाळकडू त्यांनी आत्मसात केलं. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत, हैदराबाद मुक्ती संग्रामात आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे. 'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्र राज्याभिमान गीत आणि महाराष्ट्राची लोकधारा या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात. मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक समजले जातात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली. त्यांचे 'गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment