दिनविशेष ०६ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. ६ फेब्रुवारी
१. (१८९०) सरहद्द गांधी व बादशाह खान या नावाने प्रसिद्ध, वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी खान अब्दुल गफार खान यांचा जन्म
त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला होता. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. गफारखानांनी १९२९ मध्ये 'खुदाई खिदमतगार' ही संघटना उभारली होती. या संघटनेच्या सदस्यांना 'लाल डगले वाले' म्हणून ओळखत. ही संघटना 'सुर्ख पोश' या नावाने देखील ओळखली जात होती
२. (१९१५) आधुनिक राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप यांचा जन्म
ते हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतलेखक, कवी आणि गायक होते. 'ऐ मेरे वतन के लोगो' हे प्रसिद्ध गीत त्यांनी लिहले
३. (१९३१) भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित मोतीलाल गंगाधर नेहरू यांचे निधन
ते अलाहाबाद येथील एक नामवंत वकील होते. पुढे त्यांनी वकिली सोडून दिली व भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लक्ष घातले. १९२२ साली त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास व लाला लजपत राय ह्यांच्याबरोबर काँग्रेस पक्षांतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. १९२८ साली कोलकाता येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. तसेच १९२८ मध्ये काँग्रेस पक्षाने भारताची भावी राज्यघटना बनवण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते
४. (१९३२) प्रभातचा अयोध्येचा राजा हा बोलपट मुंबईच्या कृष्णा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला
अयोध्येचा राजा हा ६ फेब्रुवारी इ.स. १९३२ रोजी प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील बोलपट होता. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या
५. (१९३९) बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे निधन
ते इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते. ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्त्ववान संस्थानिक (कारकीर्द - १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात
सामाजिक क्षेत्रात सयाजीराव गायकवाडांनी केलेली कामगिरीही त्यांच्या सामाजिक सुधारणेची साक्ष देणारी आहे. पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment