दिनविशेष २२ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. २२ फेब्रुवारी
१. (१९२२) प्रसिद्ध भारतीय व्हायोलिनवादक विष्णु गोविंद तथा व्ही. जी. जोग यांचा जन्म
ते २० व्या शतकातील हिंदुस्थानी संगीत परंपरेतील व्हायोलिनचे अग्रगण्य प्रवर्तक होते. हिंदुस्थानी संगीतात या वाद्याचा परिचय करून देण्याचे श्रेय त्यांना जाते
२. (१९४४) महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे निधन
कस्तुरबा गांधींनी पतीच्या राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. १८९७ साली त्या महात्माजींबरोबर राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेस गेल्या. १९०४-१९१२ दरम्यान त्या दरबान शहराजवळील फिनिक्स वसाहतीमध्ये समाजकार्यात मग्न होत्या. १९१३ मधील भारतीय मजुरांच्या शोषणाविरोधातील चळवळीत त्यांना ३ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्या महात्माजींच्या तुरुंगवासाच्या काळात त्यांनी भारतामध्ये चळवळीचे कार्य सांभाळले. १९१५ मध्ये गांधीजी निळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहासाठी जेव्हा परतले, तेव्हा कस्तुरबाही त्यांच्याबरोबर भारतात आल्या. त्यांनी या शेतकऱ्यांच्या बायका आणि मुलांना साक्षरता आणि स्वच्छतेचे धडे दिले
३. (१९५८) स्वातंत्र्य चळवळीतील नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद यांचे निधन
मुसलमान समाजाला भारतीय सत्याग्रहात सामील करून घेण्याचे मुख्य श्रेय आझादांनाच मिळते. आझाद १९३९ ते ४६ पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनाच्या वेळी त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. १९४५ साली सर्व नेत्यांबरोबर त्यांची सुटका झाली. १९४२ ची क्रिप्स योजना, १९४५ ची वेव्हेलची सिमला परिषद व १९४६ मधील ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ इ. प्रसंगीच्या सर्व वाटाघाटींत काँग्रेसतर्फे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनीच पुढाकार घेतला. स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्यंत शिक्षणमंत्री म्हणून राहिले. आझाद प्रभावी वक्ते होते. त्यांचे इंग्रजी, उर्दू, अरबी व फार्सी भाषांवर चांगले प्रभुत्व होते; त्यांनी अनेक वृत्तपत्रांतून स्फुट लेखन केले आणि उर्दूत काही पुस्तके लिहिली आहेत.
४. (२००९) अभिनेते, लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचे निधन
ते एक बहुरंगी मराठी लेखक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते होते. मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख असणारे डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांना त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी इ.स. १९७९ मध्ये केला होता. तेव्हापासून या नाटकाचे १,९६० पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. ह्या तीन तासांच्या एकपात्री प्रयोगात ते ५२ रूपे सादर करायचे. त्यामुळे लोक त्यांना वऱ्हाडकर म्हणायचे
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment