दिनविशेष २५ जानेवारी
दिनविशेष
दि. २५ जानेवारी
* राष्ट्रीय मतदार दिन
मतदानाच्या अधिकाराचे लोकशाहीत महत्त्व काय आहे, तो हक्क बजावल्याने काय परिणाम होऊ शकतो, मतदारांची भूमिका कशी महत्त्वाची ठरु शकते याबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता करण्यासाठी दरवर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो.
राष्ट्रीय मतदार दिन देशात २०११ पासून साजरा करण्यास सुरुवात झाली. विविध राजकीय पक्ष आणि केंद्र तसेच राज्य सरकारकडून या दिवशी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. एक मतदार म्हणून देशातील नागरिकाला जेव्हा हा हक्क मिळतो, तेव्हा त्यासोबत एक जबाबदारीही येते, ती म्हणजे लोकशाही टिकवण्याची जबाबदारी. आपल्या देशात १८ वर्षे पूर्ण केलेल्या आणि मतदार यादीत नाव असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे
* राष्ट्रीय पर्यटन दिन
२५ जानेवारी रोजी भारतात राष्ट्रीय पर्यटन दिन (National Tourism Day) साजरा केला जातो. या निमित्ताने देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच देशातील पर्यटनस्थळांचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार प्रसार केला जातो. देशातील पर्यटनस्थळांची (Tourism) संपूर्ण जगाला ओळख व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने देशाची विविधता, एकता, आपली संस्कृती (Indian Culture) जगभरात पसरवण्याचा प्रयत्न केला जातो
आपल्या देशाचे वैभव जगासमोर आणण्याचा राष्ट्रीय पर्यटन दिन हा एक प्रभावी मार्ग आहे. तसं पाहायचं झालं तर जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. मात्र भारताचा राष्ट्रीय पर्यटन दिन हा २५ जानेवारी रोजी आहे. या दिवसाची सुरुवात १९४८ रोजी म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्यानंतर लगेच झाली होती. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच १९५१ साली कोलकाता, चैन्नई येथे विभागीय पर्यटन कार्यालयांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दिल्ली, मुंबई येथेदेखील पर्यटन कार्यालय तयार करण्यात आले
देशातील पर्यटन स्थळांचे महत्त्व अधोरेखित व्हावे हा राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. तसेच हा दिवस साजरा करुन पर्यटनाला चालना मिळेल तसेच भारतीय अर्थव्यवस्थेला पर्यटनाच्या माध्यमातून बळ मिळावे, यामुळे देखील हा दिवस साजरा केला जातो. वैश्विक स्तरावर पर्यटानाचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, तसेच सांस्कृतिक मुल्याच्या महत्त्वाबाबात जागरुकता वाढवण्यासाठीही हा दिवस देशभरात साजरा केला जातो
१. (१८६२) सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे यांचा जन्म
त्या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या
न्यायमूर्ती रानड्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन रमाबाई स्त्री समाज सुधारणा चळवळीमध्ये सामील झाल्या. त्यांनी आपले आयुष्य समाज चळवळीसाठी वाहून घेतले. स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि व्यासपीठ निर्माण करण्यासाठी 'हिंदू लेडीज सोशल क्लब'ची मुंबईमध्ये स्थापना केली. पुण्यातील 'सेवा सदन' या संस्थेच्या अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुण्यात मुलींसाठी 'हुजुरपागा' शाळेची स्थापना केली
२. (१९३८) नाटककार व समीक्षक सुरेश खरे यांचा जन्म
ते एक मराठी नट, लेखक, दिग्दर्शक, जाहिरात पटकार, चित्रपट पटकथालेखक, नाट्यावलोकनकार, प्रशिक्षक, संवादक, मुलाखतकार, संस्थाचालक आणि मराठी नाटककार आहेत. सुरेश खरे हे मुंबईच्या सिद्धार्थ लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहेत. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी एकांकिकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली. सुरेश खरे लिखित ’काचेचा चंद्र’मुळे डॉ. श्रीराम लागू आणि ’मला उत्तर हवंय’ या नाटकामुळे विजया मेहता, या अभिनेत्यांचा व्यावसायिक रंगभूमीवरचा प्रवास यशस्वीरीत्या सुरू झाला
३. (१९५८) पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म
त्या भारतीय चित्रपटांतील पार्श्वगायिका आहेत. त्यांनी हिंदी बॉलीवूड गाण्याबरोबरच इंडिपॉप गाणी (उडत्या चालीची हिंदी गाणी) गायली आहेत
४. (२०१५) ज्येष्ठ मराठी समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचे निधन
मराठीतील अक्षरवाङ्मय इंग्रजीत अनुवादित करून त्यांनी मराठीचे स्थान देश आणि जागतिक स्तरावर उंचावण्याचे काम केले. महाराष्ट्राबाहेरच्या भारताला आणि जागतिक साहित्यविश्वाला मराठीतील कसदार लेखन पोचवण्याची त्यांची कामगिरी मोलाची ठरली
विलिंग्डन महाविद्यालय, सांगलीचे प्राचार्य म्हणून हातकणंगलेकरांनी केलेली कामगिरीही अजोड राहिली. एखाद्या महाविद्यालयाचे नाव एखाद्या प्राचार्याशी जोडले जाण्याचे भाग्य त्यांच्या वाट्याला आले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment