दिनविशेष २४ जानेवारी
दिनविशेष
दि. २४ जानेवारी
दिनविशेष
दि. २४ जानेवारी
* राष्ट्रीय बालिका दिन
भारतात दरवर्षी २४ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय बालिका दिन’ (National Girl Child Day) साजरा केला जातो. २००८ मध्ये भारत सरकारने या दिवसाची सुरुवात केली होती. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये मुली वाचावा, मुलीसाठी आरोग्य आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे या विषयावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे समाविष्ट आहे
२४ जानेवारी रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना नारी शक्ती म्हणून स्मरण केले जाते. या दिवशी १९६६ साली इंदिरा गांधींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला होता, त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या कन्येने एका सर्वोच्च पदावर पोहोचलेली कामगिरी दरवर्षी स्मरणात राहावी आणि महिला सक्षमीकरणाबाबत जागरूक व्हावे या उद्देशाने २४ जानेवारी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो
देशातील मुलींना भेडसावणाऱ्या सर्व असमानतेबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवणे, मुलींच्या हक्कांबद्दल जागरूकता वाढवणे, मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि पोषण याविषयी जागरूकता निर्माण करणे, मुली आणि महिलांवरील या गुन्ह्यांपासून त्यांचे संरक्षण करणे आणि त्यांच्यासमोरील आव्हानांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे या उद्देशाने राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो
१. (१९२४) तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे यांचा जन्म
ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. ते महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पाश्चात्य तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला. 'पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास', 'तत्त्वज्ञानातील समस्या' ही भाषांतरे, 'नवभारत (मासिक)' मधील त्यांचे लेख आणि विश्वकोशातील पाश्चात्य तत्त्वज्ञानविषयक व तत्त्ववेत्यांच्या नोंदी पहाता रेगे यांच्या कार्याची, त्यांच्या तत्त्वज्ञान मराठीत आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाची खात्री पटेल. भारतीय दर्शने, ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञान व इतर अनुषंगिक परंपरांचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये होती
मार्च १९९६ मध्ये मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने मराठी भाषा - स्थिती आणि भवितव्य हया विषयावर त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी मराठीतील बौद्धिक परंपरेविषयी व त्या अनुषंगाने मराठी भाषा व तिच्या भवितव्याविषयी मर्मभेदक भाष्य केले आहे. ज्ञानभाषा म्हणून मराठी स्थानापन्न होण्यात नेमका कोणता अडथळा होता याची उत्तम मीमांसा त्यांच्या भाषणात आहे
मे.पुं. रेगे हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष होते. ते 'नवभारत (मासिक)’ आणि 'न्यू क्वेस्ट’ या मासिकांचे संपादकही होते. त्याचप्रमाणे ते मराठी तत्त्वज्ञान महाकोश या प्रकल्पाच्या संपादक मंडळात होते
२. (१९६६) भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन
होमी जहांगीर भाभा हे भारतातील एक प्रसिद्ध अणुभौतिक शास्त्रज्ञ व वास्तुविशारद व परोपकारी शास्त्रज्ञ होते. त्यांनी 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च' मध्ये भौतिक शास्त्रज्ञाचे संस्थापक, संचालक व प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांना 'भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक' म्हणून संबोधले जाते
३. (२००५) गोवा मुक्तिसंग्रामातील नेत्या अनुताई लिमये यांचे निधन
त्यांनी गोवा मुक्तीसंग्रामात पोर्तुगीज यांच्या विरोधात लढा देऊन गोवा मुक्त करण्यात महत्वाची भूमिका बजावली
४. (२०११) शास्त्रीय गायक स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment