दिनविशेष २१ जानेवारी

दिनविशेष

दि. २१ जानेवारी 

१. (१८८२) कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचा जन्म

हे मराठी लेखक, पत्रकार होते. १९१८ मधे त्यांनी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात स्थापन केलेल्या महिला महाविद्यालयात प्राध्यापकी सुरू केली. ते तेथे तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, आणि इंग्रजी-मराठी साहित्य शिकवीत. कालांतराने वा. म. जोशी हे पुण्याच्या एस.एन.डी.टी. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. इ.स. १९३० च्या मडगाव (गोवा) येथील सोळाव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वा. म. जोशींनी भूषविले होते

२. (१८९४) कवी, कोशकार, आद्य गझलकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन यांचा जन्म

ते मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक होते. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या जूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी 'जूलियन' असे टोपणनाव धारण केले. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’जूलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी जूलियन हे नाव उचलले असेही सांगितले जाते

गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. माधव जूलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. 'प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधु आई' या गीताने ते अजरामर झाले. 'कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी' या बालगीतातून त्यावेळच्या आगीनगाडीचे सुरेख वर्णन त्यांनी केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. पटवर्धनांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे. पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे

३. (१९२४) माजी केंद्रीय मंत्री समाजवादी नेते प्रा. मधु दंडवते यांचा जन्म

ते भारतीय समाजवादी नेते व अर्थतज्ज्ञ होते. हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांवर असलेले प्रभुत्व आणि व्यासंग यामुळे मधु दंडवते यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला ठसा उमटवला. दंडवते मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधानकाळात रेल्वेमंत्री होते. या काळात त्यांच्या पुढाकारामुळे रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाचा प्रवास अनेक प्रकारे सुखावह झाला. या वर्गातील शयनकक्षातील लाकडी फळकुटे बदलून त्यावर कमीतकमी दोन इंच जाडीच्या गाद्या घालण्यात आल्या. याच सुमारास त्यांनी कोकण रेल्वेच्या विकासाचे काम सुरू केले. याशिवाय व्ही.पी. सिंग यांच्या पंतप्रधानकाळात दंडवते भारताचे अर्थमंत्री होते. ते इ.स. १९९०-१९९८ दरम्यान भारताच्या योजना आयोगाचे मुख्याधिकारी होते

४. (१९५०) इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल यांचे निधन

तीव्र बुद्धिमत्ता, चतुराई, सामाजिक विषमतेची सखोल जाण, एकाधिकारशाहीला कडवा विरोध, भाषेची सुस्पष्टता आणि लोकशाहीशी संलग्न असलेल्या समाजावादावरचा विश्वास इत्यादी वैशिष्ट्ये त्यांच्या लेखनात आढळून येतात

ऑर्वेल यांनी लेखनात कल्पनाधारित, तत्त्वनिष्ठ पत्रकारिता, साहित्यिक समीक्षा आणि काव्य असे नाना लेखनप्रकार हाताळले. त्याची नाइंटीन एटी-फोर - १९८४ ही कादंबरी आणि उपहासात्मक लघुकादंबरी अ‍ॅनिमल फार्म विख्यात साहित्यकृती आहेत

'सर्व लोक समान आहेत. परंतू काही इतरांपेक्षा समान आहेत.' हे जॉर्ज ऑर्वेल यांचे प्रसिद्ध वाक्य अजरामर आहे

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर