दिनविशेष १० डिसेंबर

दिनविशेष

दि. १० डिसेंबर

* जागतिक मानवी हक्क दिन
* Human Rights Day

संयुक्त राष्ट्र संघाने १० डिसेंबर १९४८ रोजी मानवाधिकारांचा सार्वत्रिक जाहीरनामा जारी करून प्रथमच मानवाच्या हक्कांबद्दल भाष्य केले. १९५० मध्ये सर्व देशांना आमंत्रित करण्यात येऊन या दिवसाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी १० डिसेंबर हा दिवस जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो

वंश, जात, राष्ट्रीयत्व, धर्म, लिंग इत्यादींच्या आधारावर मानवाला वंचित ठेवता येत नाही. मानवी हक्क हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा यामागचा उद्देश आहे. आरोग्य, आर्थिक, सामाजिक आणि शिक्षण यांचा मानवी हक्कांमध्ये समावेश होतो. मानवी हक्क हे मानवाला जन्मापासूनच उपलब्ध आहेत. जात, लिंग, धर्म, भाषा, रंग आणि राष्ट्रीयत्व हक्क मिळण्याच्या मार्गात येत नाही

भारताच्या संविधानात मानवी हक्कांची हमी दिलेली आहे. भारतातील शिक्षणाचा अधिकार या हमी अंतर्गत आहे. आपल्या देशात २८ सप्टेंबर १९९३ पासून मानवी हक्क कायदा लागू झाला आणि सरकारने १२ ऑक्टोबर १९९३ रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना केली


१. (१८९२) रंगभूमीवरील अभिनेते व गायक व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर यांचा जन्म

ते मराठी चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते होते. इ.स. १९२० साली त्यांनी सैरंध्री या मराठी चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९२० च्या दशकापासून इ.स. १९६० च्या दशकापर्यंतच्या सुमारे ४५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे
 
२. (१८९६) स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचे निधन

आल्फ्रेड यांनी स्वतःला सुरक्षित स्फोटके शोधण्यासाठीच्या संशोधनाला वाहून घेतले व पुढे डायनामायटाचा शोध लावला. डायनामायटामुळे नागरी तसेच लष्करी बांधकामे करणे सुलभ झाले व नोबेलने गडगंज संपत्ती मिळवली. आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त होत असल्याचे व त्यामुळे आपण स्वतः इतरांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे शल्य नोबेलच्या मनाला सलत होते. त्याकारणाने आल्फ्रेड नोबेलने दहा लाख स्वीडिश क्रोनरांचे विश्वस्त मंडळ स्थापले व जगातील उत्तमोत्तम संशोधकांना व शांतिदूतांना त्यातून पारितोषिक देणे आरंभले. हे पारितोषिक म्हणजेच नोबेल पारितोषिक होय

३. (१९५५) लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचे निधन

ते मराठी लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक होते. पुण्यात १९४९ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. २४ जून १९५० ते १० डिसेंबर १९५५ या कालावधीत ते साधना साप्ताहिकाचे संपादक होते. लोकशाही, समाजवाद, अर्थशास्त्र आदी विषयांवर त्यांनी लेखन केले

सन १९२० ते १९५०-५५ पर्यंत ज्यांनी महाराष्ट्राची तरुण पिढी वैचारिकदृष्ट्या घडविली, बुद्धिवादाचे आणि त्याचबरोबर नैतिकतेचे संस्कार ज्यांनी तिच्यावर केले, आणि तिला ध्येयप्रवण बनविले अशा विचारवंतांमध्ये आचार्य शं. द. जावडेकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व समाजवादी नेते, कार्यकर्ते, त्याचप्रमाणे राष्ट्रसेवा दलाचे हजारो सैनिक जावडेकर यांच्या वैचारिक शिदोरीवर पोसले गेले

’आधुनिक भारत' या पुस्तकात जावडेकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यढ्याची अतिशय मूलगामी चिकित्सा केली आहे. त्यामुळे मराठीतील तत्त्वज्ञ कादंबरीकार वामन मल्हार जोशी यांनी 'गीतारहस्यानंतरचा थोर ग्रंथ' असे त्याचे वर्णन केले आहे. जावडेकर हे आगरकर, टिळक आणि गांधी या तिघांनाही गुरू मानत. (त्यात पुढे मार्क्‍सची भर पडली.) या सर्व द्रष्टय़ा नेत्यांचे विचार कोणत्याही प्रकारचे किल्मिष येऊ न देता, त्यातील देशाला व समाजाला उपयुक्त व अनुकरणीय असेल असा भाग जावडेकर यांनी साक्षेपाने महाराष्ट्रीय जनतेसमोर मांडण्याचे काम केले आणि त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन केले. त्यामुळे तत्कालीन महाराष्ट्रातील बुद्धिवंत त्यांच्या लेखनाकडे आकर्षित झाले. जावडेकर यांचे संपूर्ण जीवन हे 'बोले तसा चाले' या वृत्तीचा आविष्कार होते. नैतिक मूल्यांवर हुकमत, शुद्ध आचरण आणि स्फटिकवत चारित्र्य यामुळे जावडेकर यांचा त्यांच्या विरोधकांनाही दरारा वाटत असे

४. (२००९) लेखक, कवी आणि टीकाकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे निधन

हे मराठी कवी, कथालेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार होते. मराठी साहित्य विश्वातील मानाचे पान समजल्या जाणा-या 'लघुनियतकालिक चळवळी'मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या मराठी साहित्याची जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश भाषांतरे झाली आहेत

५. (२०२२) प्रसिद्ध मराठी गायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन

‘सोळावं वरीस धोक्याचं’ ते ‘तुझ्या उसाला लागंल कोल्हा’; सुलोचना चव्हाण यांच्या गाजलेल्या लावण्या

सुलोचना चव्हाण यांनी त्यांच्या कारकिर्दीत केवळ लावणी गीतंच नाही, तर गझल, भजन आणि इतर अनेक प्रकारच्या गाण्यांनाही आपला आवाज दिला. मात्र, लावणीनेच त्यांना ओळख मिळवून दिली

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर