दिनविशेष १ डिसेंबर
दिनविशेष
दि. १ डिसेंबर
* जागतिक एड्स दिन
दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी आणि या रोगामुळे मरण पावलेल्यांचा शोक वक्त करण्यासाठी हा दिवस पाळावा असे संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केले आहे. सरकारी आणि आरोग्य अधिकारी, अशाशकीय संस्था आणि जगभरातील व्यक्ती एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणावरील शिक्षणासह हा दिवस साजरा करतात
१. (१८८५) साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा काकासाहेब कालेलकर यांचा जन्म
कालेलकर मोहनदास करमचंद गांधी यांच्या गुजरातमधील साबरमती आश्रमाचे सदस्य झाले. तिथे असतानाच त्यांनी गांधींजींच्या 'सर्वोदय' या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम पाहिले. गांधीजींच्या प्रेरणेमुळे गुजरात विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. काही काळ ते या विद्यापीठाचे कुलगुरूही होते
भारत स्वतंत्र झाल्यानंतर काकासाहेब बारा वर्षे राज्यसभेचे सदस्य होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे इ.स. १९५३ साली 'मागासवर्गीय आयोग' नेमण्यात आला. कालेलकर या आयोगाचे अध्यक्ष होते
२. (१९०९) मर्ढे ता. जि. साताराचे सुपुत्र, मराठी नवकाव्याचे प्रवर्तक बा. सी. मर्ढेकर यांचा जन्म
ते मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसऱ्या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमा व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे
३. (१९५४) नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचा जन्म
मुंबई येथे जन्मलेल्या मेधा पाटकर यांचे पालक सामाजिक व राजकीयदृष्ट्या जागरूक होते. त्यांच्या वडिलांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला होता. आई स्वादर नावाच्या स्त्रियांच्या प्रश्नाला वाहिलेल्या संस्थेची कार्यकर्ती होती. त्यांच्या पालकांच्या विचारांचा मेधा पाटकर यांच्या जडणघडणीवर खोल परिणाम झाला
पाटकर यांनी टाटा सामाजिक शास्त्र संस्थेतून एम.ए.ची पदवी मिळवली (TISS). त्यानंतर सात वर्षे मुंबईतील विविध स्वयंसेवी संस्थांमधून काम केले. त्यांनी काही काळ टाटा सामाजिक शास्त्र संस्थेत शिक्षकाचे कामही केले. नर्मदा बचाव आंदोलनचे राष्ट्रीय समन्वय म्हणून त्यांनी काम केले
४. (१९९०) राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचे निधन
त्या एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी होत्या. त्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ८ व्या अध्यक्षा होत्या. या पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या. त्या भारतातील नेहरू-गांधी या प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील सदस्य होत्या. त्यांचे भाऊ जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते, त्यांची भाची इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या आणि त्यांचे नातू राजीव गांधी हे भारताचे सहावे पंतप्रधान होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment