दिनविशेष ७ नोव्हेंबर
दिनविशेष
दि. ७ नोव्हेंबर
* विद्यार्थी दिन
७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आता श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. येथे ते इ.स. १९०४ पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले. शाळेत त्यांच्या नावाची 'भिवा रामजी आंबेडकर' अशी नोंद आहे. शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकासमोर बाल भिवाची स्वाक्षरी आहे. सोबाच त्यांचे मोठे बंधू आनंदराव आंबेडकर यांचा देखील प्रवेश झाला होता. त्यांच्या नावाची नोंद 'लक्ष्मण रामजी आंबेडकर' अशी नोंद आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. इ.स. २००३ पासून पत्रकार अरुण जावळे हे शाळा प्रवेश दिनाचे आयोजन करत आलेले आहेत. या दिनाला विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करण्याची मागणी त्यांनी अनेकदा महाराष्ट्र शासनाला केली होती. शेवटी इ.स. २०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून ठरविला
विद्यार्थी दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ७ नोव्हेंबर हा दिवस 'विद्यार्थी दिवस' म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला. अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले. यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात
* जागतिक कर्करोग जागृती दिन
कर्करोग या प्राणघातक आजाराशी लढण्यासाठी तसेच कर्करोगाचा लवकरात लवकर शोध लागावा याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी देशात दरवर्षी ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन पाळला जातो
कर्करोग हा रोगांचा एक मोठा समूह आहे ज्यामध्ये असामान्य पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि शरीराच्या जवळपासच्या भागांवर आक्रमण करण्यासाठी किंवा इतर अवयवांमध्ये पसरण्यासाठी त्यांची सामान्य मर्यादा ओलांडतात. हे शरीराच्या कोणत्याही अवयव किंवा ऊतीमध्ये सुरू होऊ शकते. या रोगाच्या अंतिम टप्प्याला मेटास्टेसिंग म्हणतात आणि कर्करोगामुळे मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे
१. (१८८४) भारताबाहेर राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देणारे क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि ’गदर पार्टी’ चे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म
अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉ. पांडुरंग खानखोजे मेक्सिकोत गेले. १९२० सालापासून ते १९४७ सलापर्यंत त्यांनी मेक्सिकोमध्ये वनस्पतीशास्त्राचे व पीक निर्मिती शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात हायब्रीड मका, तांब्या रोगाला तोंड देणारा, पावसाळ्यात, उन्हाळ्यात व थंडीत बर्फालाही तोंड देईल असा गहू, अधिक उत्पादन देणारे सोयाबीन आणि घेवड्याचे उत्पादन, कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात, समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर पिकवता येणारी जात, आदींवर संशोधन करून मेक्सिकोमध्ये त्यांनी हरित क्रांती घडवून आणली. मेक्सिकन सरकारने खानखोजे यांना कृषिसंचालक म्हणून नेमले होते
२. (१९०५) मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा ’केशवसुत’ यांचे निधन
ते मराठी कवी होते. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात
वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते. आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता आहेत
३. (२००९) लेखिका व स्वातंत्र्यसैनिक सुनीता देशपांडे यांचे निधन
त्यांनी पुलंबरोबर अनेक नाटकांत काम केले. तसेच 'वंदेमातरम्' या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय गाजली होती. 'राजमाता जिजाबाई' हा एकपात्री प्रयोगही त्यांनी रंगवला होता. पुलंच्या 'सुंदर मी होणार' मधील दीदीराजे ही मध्यवर्ती भूमिका सुनिताबाईंनी साकारली होती
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment