दिनविशेष १७ नोव्हेंबर
दिनविशेष
दि. १७ नोव्हेंबर
* आंतराष्ट्रीय विद्यार्थी दिन
जोसेफ तुस्कानोती भयानक घटना १७ नोव्हेंबर १९३९ ला घडली. जान ओप्लेताल या विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या आणि झेकोस्लोव्हाकियावर नाझींनी केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ आंदोलन पुकारणाऱ्या विद्यार्थ्यांची निदर्शने निर्दयपणे चिरडून टाकत नाझी सैन्याने नऊ जणांना विनाचौकशी देहदंड ठोठावला आणि १२०० जणांची कॉन्स्न्ट्रेशन कॅम्पमध्ये रवानगी केली. तो १७ नोव्हेंबरचा दिवस होता. त्या हुतात्म्यांची आठवण म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून जगभर पाळला जातो. पहिला आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन १९४१ साली इंटरनॅशनल स्टुडंट कौन्सिलने लंडनमध्ये साजरा केला
१. (१९२८) ’पंजाब केसरी’ स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांचे निधन
ते पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली
२. (१९३२) लोभसवाणे रूप, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत अमीट अशी मुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री शकुंतला महाजन तथा ’बेबी शकुंतला’ यांचा जन्म
त्या मराठी-हिंदी चित्रपटांत काम करणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. प्रभात फिल्म कंपनीच्या ’दहा वाजता’ या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभियनय कारकिर्दीस १९४२ मध्ये सुरुवात झाली़. त्यांनी आपल्या आयुष्यात ६० मराठी आणि ४० हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या होत्या
३. (१९३५) भारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य, ’सेवासदन’ या संस्थेचे शिल्पकार, सहकारी चळवळीचे आद्य समर्थक गोपाळ कृष्ण देवधर यांचे निधन
'भारत सेवक समाजा’च्या ज्ञानप्रकाश या दैनिकाचे व शेती आणि शेतकरी या नियतकालिकांचे संपादनकार्य त्यांनी केले. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यताविरोधी संघटनेचे ते प्रांतिक अध्यक्ष होते. विशुद्ध सेवाभावाने व राष्ट्रीय उद्धाराचे भान राखून आमरण लोकसेवा करणारा एक थोर भारत सेवक म्हणून देवधरांचे नाव कायम राहील. ‘सेवासदन’ संस्था ही तर त्यांच्या समाजसेवेचे मूर्तिमंत प्रतीक होय
४. (१९३८) मराठीतील गूढकथा लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचा जन्म
मतकरी हे नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार देखील आहेत. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करून बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांनी ’नाटक’ शिकवले
वृत्तपत्रीय सदरलेखन, मालिका-चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन, माध्यमांतर, ‘बालनाट्य’ व ‘सूत्रधार’ या नाट्यसंस्थांचे लेखक, दिग्दर्शक, नट, नेपथ्यकार, निर्माते वगैरे, कथाकथनकार, दूरदर्शनवरील ‘शरदाचे चांदणे’ व ‘गजरा’सारख्या कार्यक्रमांचे सादरकर्ते, ‘नर्मदा बचाओ आंदोलन’ व ‘निर्भय बनो’ आंदोलनांमधील सक्रिय सहभाग, हौशी चित्रकार, चांगले वक्ते असे मतकरींचे चौफेर कर्तृत्व होते
५. (१९६१) साहित्यिका व समीक्षक, ग्वाल्हेर येथील ४३ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कुसुमावती आत्माराम देशपांडे यांचे निधन
त्या मराठीतील लेखिका व समालोचक होत्या. त्यांनी मराठी लघुकथेला नवीन रूप आणि चैतन्य बहाल केले. मराठी वाङ्मयसमीक्षेच्या क्षेत्रात यांनी केलेले लेखन फार मोलाचे आहे
६. (२०१२) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment