दिनविशेष १ नोव्हेंबर
दिनविशेष
दि. १ नोव्हेंबर
१. (१९१८) आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार शरद तळवलकर यांचा जन्म
हे मराठी चित्रपटांतील अभिनेते होते. चेहऱ्यावरील भावातुनच विनोद आणि वेदना दाखविणारे शरद तळवलकर विनोदी अभिनेता म्हणून अभिनय करतानाच ते दु :खद प्रसंगातही हेलावून टाकणारे त्यांचे भाव चेहऱ्यावर दाखवीत. शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. मुंबईचा जावई या चित्रपटात त्यांनी केलेली भूमिका वास्तवाशी निगडित असून खूपच सुंदर होती
२. (१९२६) संगीतकार, गीतकार व दिग्दर्शक यशवंत देव यांचा जन्म
आपल्या वडिलांकडून मिळालेला संगीत साधनेचा वारसा यशवंत देव यांनी समर्थपणे पुढे नेला. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘भावसरगम’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली
३. (१९३२) मराठी, हिंदी, इंग्रजी कवी अरुण बाळकृष्ण कोलटकर यांचा जन्म
ते मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषांत कविता करणारे भारतीय कवी होते. मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे पदवीधारक असलेले कोलटकर एक उत्तम ग्राफिक्स डिझायनर व जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कलादिग्दर्शक होते. १९५०–१९६० च्या दशकांत त्यानी लिहिलेल्या कविता या मुंबईतील विशिष्ठ बोली मराठीतल्या असून त्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या व गुन्हेगारांच्या जीवनाचे दर्शन घडते
४. (१९४५) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म
ते मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेसोबत काम करू लागले. इ.स. १९८९ साली नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची संघटना सुरू केली. ते स्वत या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते
बाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या इ.स. १९८२ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर इ.स. १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर १९९८ पासून मृत्यूपर्यंत संपादक होते
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते
५. (१९९४) शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे निधन
मुंबई द्वैभाषिक राज्यात महाराष्ट्रावर होत असलेल्या अन्यायाबाबत मराठी भाषिकांमध्ये प्रचंड असंतोष होता. कॉ. श्री. अ. डांगे अटकेत, कम्युनिस्ट आणि सोशॅलिस्टांमध्ये बेबनाव अशा वेळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्त्व उभे करू शकेन अशी यंत्रणा उभी करण्यासाठी साथी एम. एम. जोशी, कॉ. डांगे आणि केशवराव जेधे इ. नेत्यांना एकत्र आणण्यासाठी लाल निशाण पक्षाचे कॉ. एस. के. लिमये, कॉ. यशवंत चव्हाण आणि कॉ. दत्ता देशमुख या तिघांचेही योगदान फार महत्त्वाचे होते. कॉ. डांगे आणि साथी एस. एम. जोशी या दोनही नेत्यांचा या तिघांवरही पूर्ण विश्वास होता. त्या विश्वासाच्या जोरावरच कॉ. एस. के. लिमये, कॉ. यशवंत चव्हाण आणि कॉ. दत्ता देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या समितीची मोट बांधण्यासाठी (पडद्यामागे) बरेच प्रयत्न केले
६. (२००५) लेखिका योगिनी जोगळेकर यांचे निधन
४५ कादंबर्या, ४ कवितासंग्रह, ४ नाटके, १२ कुमार वाङ्मयाची पुस्तके इ. त्यांची साहित्य संपदा त्यांच्या नावावर आहे
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment