दिनविशेष १६ ऑक्टोबर
दिनविशेष
दि. १६ ऑक्टोबर
* जागतिक अन्न दिन
जागतिक अन्न दिन दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेची स्थापना प्रथम १९४५ मध्ये झाली. उपासमारीवर कारवाई करणे हा या संघटनेचा उद्देश होता. त्यानंतर १९७९ मध्ये पहिल्यांदा जागतिक अन्न दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जाऊ लागला. हा दिवस साजरा करण्याचे विशेष महत्त्व आहे. अन्न दिनानिमित्त अन्न सुरक्षा आणि पौष्टिक आहाराची गरज याबाबत लोकांना जागरुक केले जाते. जगातील अनेक देश सध्या दारिद्र्यरेषेखाली आहेत. या देशांतील लोकांना संतुलित आहार मिळत नाही. त्यामुळे बहुसंख्य जनता कुपोषित होत आहे. संतुलित आणि पौष्टिक आहाराच्या अभावामुळे लोक अनेक आजारांना बळी पडतात. कुपोषणाची समस्या दूर करणे आणि लोकांना संतुलित आणि पौष्टिक आहाराची जाणीव करून देणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो
१. (१८९०) झुणका भाकर चळवळीचे प्रवर्तक, वार्ताहर, संपादक, जाहिरातशास्त्रातील तज्ञ, समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक समतानंद तथा अनंत हरी गद्रे यांचा जन्म
दलित आणि सवर्णांमधील सामाजिक दरी मिटवण्यासाठी 'झुणका-भाकर चळवळी'सारखे प्रयोग त्यांनी केले. 'झुणका-भाकर' चळवळीमध्ये समाज्याच्या सर्व थरांतील, सर्व जातींचे लोक एकत्र येऊन भोजन करीत असत
त्यांच्याकडे जाहिरात करण्याचे अनोखे कौशल्य होते. मराठी नाट्यसृष्टी संकटात असताना याच कौशल्याचा वापर करून त्यांनी नाटिका लिहिल्या. नाटकाच्या जाहिरातींत वेगळेपणा आणला. त्यांना ‘जाहिरात जनार्दन’ म्हणत. त्यांची जाहिरात क्षेत्रासाठी लागणारी ग्राहक मानसशास्त्रावरील पकड, शब्दांवरची हुकमत, संवादपटुत्व अशी व्यावसायिक कौशल्ये त्याकाळी अभूतपूर्व होती
२. (१९४४) भारतातील औद्योगिकीकरणास हातभार लावणारे प्रसिद्ध कारखानदार उद्योजक गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचे निधन
श्रीलंका येथील सरकारांशी काचकारखाने सुरू करण्याबद्दल त्यांनी वाटाघाटी करून प्रत्यक्ष कारखान्यांची उभारणी केली. १९४२-४३ मध्ये 'प्रभाकर' कंदिलांची निर्मिती ही गुरुनाथांनी सर्वांत महत्त्वाची कामगिरी समजली जाते. प्रभाकर कंदील पुढे लवकरच जगद्विख्यात झाला. ओगलेवाडीच्या कारखान्यात विविध प्रकारचा काचमाल, एनॅमलवेअर, प्रभाकर कंदील व स्टोव्ह, विजेच्या मोटरी व पंप ह्यांचे उत्पादन होते
३. (१९४८) मराठी नाटककार माधव नारायण तथा माधवराव जोशी यांचे निधन
जळगाव येथे झालेल्या ३४ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. पालिकांच्या कारभारावरील टीकेमुळे गाजलेले ’म्युनिसिपालिटी’ हे नाटक त्यांनी लिहिले होते. या नाटकाने जोशींना सर्वाधिक ख्याती मिळाली. म्युनिपालिटीत निवडून गेलेले सदस्य कसा गैरकारभार करतात याचे विडंबनचित्र या नाटकात आहे
बोलीभाषेचा मुक्त वापर करणारे संवाद, प्रासादिक पद्यरचना, नाटकातील प्रमुख हास्यरस आणि उपहासाचा वापर यामुळे माधवराव जोशी यांची नाटके समाजातील सर्व थरांतील लोकांना आवडली. जोशांच्या काही नाटकामधून त्यांनी एका नव्या प्रकारच्या एकांक-प्रवेशी तंत्राचाही उपयोग केला होता
४. (२००२) मराठी लेखक, कादंबरीकार नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचे निधन
ना. सं. इनामदार हे मराठीतील श्रेष्ठ ऐतिहासिक कादंबरीकार होते. इतिहासकाळातील उपेक्षित पात्रांना न्याय देणारा लेखक अशी त्यांची कायमची ओळख मराठी वाचकाला राहिलं. कादंबरीमधे काय सांगितले आहे, त्याच्याएवढेच महत्त्व ते कसे सांगितले आहे, या गोष्टीला असते. इतिहासाचा विपर्यास होऊ नये यासाठी कसून संशोधन, इतिहासाचे सजर्नशील आकलन, आणि प्रसंगातील नाटयमयता व चित्रदर्शी शैली, यामुळे ते लोकप्रिय कादंबरीकार ठरले.
त्यांच्या ऐतिहासिक कादंबरी लेखनाला महाराष्ट्रात तोड नाही.
ऐतिहासिक वास्तवातून वर्तमानाचे परिक्षण करणारे, ते थोर कादंबरीकार होते. एकीकडे काय घडले याचे तपशील गोळा करणे, उपलब्ध माहितीतून जरूरी तो तपशील न मिळाल्यास, त्याविषयी बिनचूक ठोकताळे बांधणे, इतिहासाचा आदर करणे, आणि त्यानंतर पुन्हा आपल्या दृष्टिला दिसलेला, भावलेला इतिहास उभा करणे, ही दुहेरी तारेवरची कसरत ऐतिहासिक कादंबरीकाराला करावी लागते आणि इनामदारांनी ती लीलया किती सहजपणे साधली होती हे त्यांच्या लेखनातून दिसून येते
१८५७ च्या स्वातंत्र्यसमरावर लिहीलेली 'बंड' ही त्यांची पहिली कादंबरी, परंतु ती प्रसिध्द होण्यास मात्र १९९६ साल उजाडले. त्या समराच्या शताब्दीच्या निमित्ताने त्यानी ती लिहीली होती. झेप ही त्यांची प्रथम प्रसिध्द झालेली, दुसरी ऐतिहासिक कादंबरी, १९६३ सालामधे प्रकाशित झाली. ज्या काळात वाढते औद्योगिकीकरण, दाबले गेलेले कामगार, बदलणारे सामाजिक आणि व्यक्तिगत वास्तव यांचे पडसाद मराठी साहित्यसृष्टित उमटत होते, त्या काळात आपली आगळी वेगळी शैली घेऊन ना. सं. इनामदार आले आणि त्यांनी मराठी वाचकांना अक्षरश: जिंकून घेतले. इतिहास पुन्हा पुन्हा तपासण्याची 'शिकस्त' केली. त्यांची ही 'झेप' मराठी वाङमय जगताला एका नव्या क्षितिजाकडे नेणारी ठरली
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment