दिनविशेष ९ सप्टेंबर
दिनविशेष
दि. ९ सप्टेंबर
१. (१८२८) रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म
हे रशियन लेखक, कादंबरीकार, नाटककार, तत्त्वज्ञ, शांततावादी शिक्षणसुधारक होते. दर्जेदार कादंबरीलेखनामुळे, विशेषकरून 'वॉर अँड पीस' आणि आना 'कारेनिना' या दोन अप्रतिम साहित्यकृतींमुळे टॉलस्टॉय महान साहित्यिक मानले जातत. या दोन्ही कादंबऱ्या आजतागायत सर्वोत्तम व वास्तववादी ललित साहित्याचा उच्च बिंदू मानल्या जातात. टॉलस्टॉय हे त्याच्या गुंतागुंतीच्या व विरोधाभासी सभावासाठीही तितकाच परिचित होते. १९७० नंतर त्याची मते आदर्शवादी व निराकारी बनली आणि ते समाज प्रवर्तक गणले जाऊ लागले. त्यांनी किंग्डम ऑफ गॉड इज विदिन यू या लिखाणातून मांडलेल्या अहिंसक लढ्याबद्दलच्या संकल्पनेचा २०व्या शतकातील महात्मा गांधी व मार्टिन लुथर किंग या थोर व्यक्तींवर प्रचंड प्रभाव पडला
२. (१८५०) आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंद्रू हरिश्चंद्र यांचा जन्म
हिंदीतील परखडतेचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचे भाषेचा विकास आणि सर्व विधींना समृद्ध करण्यात मोठे योगदान आहे
३. (१९१०) भारतातील ऑटो रिक्षा इंडस्ट्रीचे जनक उद्योगपती, गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक नवलमल फिरोदिया यांचा जन्म
४. (१९१२) मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील चरित्र अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म
त्यांनी अभिनयक्षेत्रात येण्याआधी शिक्षिकेचे काम केले. त्यांचे त्यांच्या पतींबरोबरचे समाजकार्यातील योगदानही मोठे आहे. लीला ह्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधून काम केले तसेच त्यांनी 'आज कि बात' ह्या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. त्यांची 'माँ ' ह्या चित्रपटातील भूमिका अविस्मरणीय ठरली. ‘लक्स’ साबणाच्या जाहिरातीसाठी मॉडेलिंग करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या
हिंदी चित्रपटातील वात्सल्यसिंधू आई म्हणूनही त्या कायम स्मरणात राहतात. त्यांनी दिलीपकुमार-राजकपूर-देव आनंद यांच्या आईच्या केलेल्या भूमिका गाजल्या
५. (१९४२) स्वातंत्र्यसैनिक शिरीषकुमार मेहता याचा गोळी लागून मृत्यू
महात्मा गांधींनी ९ ऑगस्ट १९४२ ला इंग्रजांना 'चले जाव'चा आदेश दिला. त्यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्या, ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. बरोबर महिनाभरानंतर, ९ सप्टेंबर १९४२ ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवीत शिकत असलेला शिरीष सहभागी झाला होता. भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. शिरीषकुमारच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन झुगारले आणि 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्'चा जयघोष सुरूच ठेवला. पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. शिरीषकुमार मेहता सोबत पोलिसांच्या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्यामदास शहा हे अन्य चौघेही शहीद झाले
६. (१९४२) ९ सप्टेंबर १९४२ रोजी वडूज येथे मामलेदार कचेरीवर काढण्यात आलेल्या मोर्चावर इंग्रज सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबारात मोर्चातील ९ स्वातंत्र्य सैनिकांना हौतात्म्य आले
* स्वातंत्र्य संग्रामातील वडूज चा रक्तरंजित इतिहास !
सातारा जिल्हयातील खटाव हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वाना परिचित आहे. मात्र या तालुक्यातील काही गावे आपल्या वैशिष्टयाने महाराष्ट्रात प्रसिध्द पावली आहेत. या तालुक्याचे मुख्य कचेरीतील गाव वडूज हे हुतात्म्यांची भूमी आहे. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्स्व साजरा झाला आहे. पण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वडूज येथे नऊ स्वातंत्र्य सैनिकांना आपले प्राण अर्पण करावे लागले आहेत
महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखाली १९४२ च्या चळवळीचे सारा देश खडबडून जागा झाला होता. महात्मा गांधीनी इंग्रजांना भारत छोडोचा आदेश दिला आणि सर्वच कार्यकर्ते मोर्चे बांधू लागले. जिल्हयात औंध येथील बॅ. आप्पासाहेब पंत, बंडोपंत लोमटे, गौरीहर, सिंहासने, दादासाहेब साखवळकर, नानासाहेब, आयाचित, पिलोबा वडूजकर, रामभाऊ नलवडे, माणिकचंद दोशी, बापूराव कचरे यांनी गावोगावी गुप्त बैठका घेवून ९ सप्टेंबर १९४२ रोजी वडूज येथे मामलेदार कचेरीवर मोर्चा करण्याचे ठरविले
९ सप्टेंबर १९४२ ला हा विराट मोर्चा जयराम स्वामी वडगाव येथून सकाळी ६ वाजता वडूजकडे चालत निघाला. मोर्चात १५०० लोक सामील झाले होते. वडगाव ते वडूज हे १३ मैलाचे अंतर तोडून पायी निघालेला मोर्चा स्वार्थ साधण्यासाठी किंवा काही मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी निघाला नव्हता तर मातृभूमीच्या मुक्ततेसाठी व इंग्रजांच्या जुलमी छळाला प्रत्युत्तर देण्यासाठी होता. सकाळी ६ वाजता निघालेला मोर्चा दुपारी ११ वाजता वडूजला येऊन पोहोचलो व १२ वाजता कचेरीवर आला
वातावरण तापले होते. गोऱ्या शिपायांचा कडक बंदोबस्त होता. त्यावेळी मामलेदार अंकली तर फौजदार बिंडीगिरी होते. मोर्चा कचेरीजवळ आल्यानंतर परशूराम घार्गे यांनी खांद्यावर तिरंगी झेंडा घेऊन उभे होते. वंदे मातरम् , भारत माता की जय अशा गगनाला भिडणाऱ्या घोषणा दिल्या जात होत्या. मामलेदार अंकली व फौजदार बिंडीगिरी यांनी मोर्चा कचेरीपासून १५० फूटावर असलेल्या गोविंदराव महादेव शिंदे यांच्या हॉटेलाजवळ अडवला. अडवून ठेवलेल्या मोर्चाने भर उन्हात तेथेच बैठक मारली
मात्र कोणताही गुन्हा नसताना अचानक बेसावध झालेल्या मोर्चावर गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. परिस्थिती आटोक्याबाहेर गेली तरच बंदुकीचा वापर करायचा असतो आणि तोही पायावर गोळया मारायाच्या असतात. परंतू ब्रिटिशांच्या या निर्दयी पोलिसांनी सर्व संकेत धाब्यावर बसवून मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या परशूराम घार्गे यांच्यावर एका मागून एक अशा गोळ्या झाडल्या आणि इतरांनाही बंदूकी चालविण्याचा हुकूम दिला. त्यामुळे निर्दशकांची धावपळ सुरू झाली. जवळ कोणतेच हत्यार नाही. अशावेळी गोळ्यांच्या वर्षावाने जागच्या जागीच पाचजणांनी होतात्म्य पत्करले. चारजण गंभीर जखमी झाल्याने वाटेतच त्यांना हौतात्म्य आले. शेकडोजण कायमचे जायबंदी झाले. यात परशुराम श्रीपती घार्गे, किसन बाळा भोसले, खाशाबा मारूती शिंदे, सिदु पवार, राम कृष्णा सुतार, बलभीम हरी खटावकर, बाळकृष्ण दिगंबर खटावकर, श्रीरंग शिंदे, आनंद श्रीपती गायकवाड या ९ जणांचे मृतदेह दहिवडीला नेण्यात आले
या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए.आर.अंतुले हे वडूज येथे आले असता त्यांनी जालीयनवाला बागसारखी एक पवित्र वास्तू बनविण्यासाठी हुतात्मा स्मारके उभे करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे या हुतात्म्यांच्या विचारांची साक्ष देण्यासाठी हुतात्मा स्मारके उभारली आहेत
७. महाराष्ट्रातील श्रेष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांचा जन्म
श्रीधर फडके यांनी अनेक चित्रपटांना संगीतबद्ध केले आहे
७. (१९५०) पंजाबचे प्रसिद्ध क्रांतिकारक कवी पाश यांचा जन्म
त्यांचे मूळ नाव अवतारसिंग संधू पण 'पाश' या टोपणनावानेच त्यांनी लिखाण केले. नक्सलवादी चळवळीने प्रेरित होऊन प्रतिरोधाच्या कविता त्यांनी लिहिल्या. त्यांच्या कवितांचे चार खंड ‘लोह कथा’, ‘उद्दीन बजन मगर’, ‘सद्दीक सम्यन विच’ आणि ‘खिलरे होये वारके’ प्रकाशित केले. पाशच्या कविता अनेक भाषेतून अनुवादित झाल्या
८. (१९७४) कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीर चक्र प्राप्त भारतीय सैन्य अधिकारी विक्रम बात्रा यांचा जन्म
९. (१९९४) लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे निधन
त्यांनी लावणीसाठी वा गायकीसाठी लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. वयाच्या १० व्या वर्षीच त्यांच्यातल्या संगीत कलेची जाणीव झाली. त्यांनी बालवयातच एकट्याचे लावणी सादरीकरण केले. त्यानंतरच्या काळात गोदावरीबाई पुणेकर यांच्या नेतृत्वाखालील लावणी गटात त्या सामील झाल्या. गोदावरीबाई या एका अर्थाने त्यांच्या प्रथम शिक्षिका व सहकारी ठराव्यात. तेथे त्या नृत्य, गवळणी, गझल या गोष्टीशी वकुबाने परिचित झाल्या. जवळपास पाच दशके सत्याभामाबाईंनी रंगमंचाची आणि लावणीची सेवा केली. ती देखील अविरतपणे, जोमाने आणि स्वतःच्या शैलीने
१०. (२०१०) समाजवादी कामगार नेते, वकील, लेखक वसंत निळकंठ गुप्ते यांचे निधन
ते मराठी समाजवादी कामगार नेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक होते. राष्ट्रसेवा दलात सहभागी झाल्यानंतर एस. एम. जोशी आणि साने गुरुजींच्या प्रभावाखाली आल्यानंतर त्यांच्या कामाला गती आली. शिक्षणानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. तेथे समाजवादी पक्षाच्या कामात सहभाग घेण्यास त्यांनी सुरुवात केली. कामगारांच्या समस्यांवरील खटले लढवणे, संघटनात्मक बांधणी इत्यादी कामांत त्यांनी विशेष सहभाग घेतला. इ.स. १९७१ साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयात ४० कंपन्यांच्या वकिलांसमोर कामगारांचा एकमेव वकील म्हणून उभे ठाकून गुप्त्यांनी तो खटला कामगारांना जिंकून दिला
११. (२०१२) भारतातील धवल क्रांतीचे जनक व्हर्गिस कुरियन यांचे निधन
भारतातील धवल क्रांतीचे जनक म्हणून डॉ. वर्गीस कुरियन यांचे नाव घेतले जाते. दुग्ध उत्पादनात भारताला अग्रेसर बनवण्यात कुरियन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. दूध उत्पादनात तूट असलेला देश ते जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश हे भारताचे स्थित्यंतर घडवून आणण्यात वर्गीस कुरियन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती
#vishalinc5 #satara #सातारा
* पत्रकार अशोक वानखेडे यांचा जन्मदिवस
Comments
Post a Comment