दिनविशेष २७ सप्टेंबर
दिनविशेष
दि. २७ सप्टेंबर
* जागतिक पर्यटन दिवस
* World Tourism Day
दरवर्षी २७ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक पर्यटन दिन' म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. १९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरुवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO) ची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली होती
जगातील विविध भागांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी दरवर्षी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. अनेक देशांची पर्यटन मंडळे जागतिक पर्यटन दिनाच्या उत्सवात सामील आहेत, जे त्यांच्या शहरांमध्ये, राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी आकर्षक योजना जाहीर करतात
* गुगल स्थापना दिवस
जगातील प्रचंड माहितीच्या साठ्याचे व्यवस्थापन करणे व जगातील कोणालाही ही माहिती सहजगत्या उपलब्ध करून देणे हा हेतू असल्याने कंपनीचे नाव गुगल असे ठेवण्यात आले. गुगल कंपनीची स्थापना ४ सप्टेंबरला झाली असली तरी २००५ पासून कंपनीने २७ सप्टेंबर हा दिवस वाढदिवसासाठी जाहीर केला. या पाठीमागचे कारण म्हणजे २७ सप्टेंबर रोजी गुगलला सर्वात अधिक पेज व्ह्यू मिळाले. २७ सप्टेंबर या दिवशी सर्वात जास्त पेज व्ह्यू मिळाल्याने हाच दिवस गुगलचा वाढदिवस म्हणून साजरा करण्यात यावा असा अट्टाहास गुगलमधील कर्मचाऱ्यांनी धरला. कंपनीने तो मान्य केला, तेव्हापासून म्हणजे २००५ पासून २७ सप्टेंबर याच दिवशी गुगलचा वाढदिवस साजरा केला जातो
१. (१८३३) समाजसुधारक आणि ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजाराम मोहन रॉय यांचे निधन
राजा राममोहन रॉय यांनी भारतीय शिक्षणव्यवस्थेत बदल घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी बालविवाह, सती प्रथा यांसारख्या समाजातील अनिष्ट रुढी, परंपरांविरोधात आंदोलन उभारत त्यांनी भारतीय समाजाला नवी दिशा दिली
२. (१९२९) काळकर्ते, लेखक आणि पत्रकार शि. म. परांजपे यांचे निधन
ते मराठी पत्रकार, निबंधकार, लेखक होते. तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध 'काळ' या मराठी साप्ताहिकातून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते
त्यांनी आपल्या पत्राची जाहिरात ‘धार्मिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि वाङ्मयीन विषयांची निष्पक्षपातीपणे व निर्भयपणे पूर्ण चर्चा करणारे वृत्तपत्र’ अशा शब्दांमध्ये केली होती. ते ‘काळकर्ते’ परांजपे म्हणून ओळखले जात असत. त्यांच्या लिखाणात देशाभिमान, पांडित्य व रसिकता यांचे मिश्रण होते. वक्रोक्ती व व्याजोक्ती ही त्यांच्या लिखाणाची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात. ‘वक्रोक्ती’ हा नवा अलंकार त्यांनी मराठी भाषेला दिला. विष्णूशास्त्री चिपळूकर शिवरामपंतांना शिक्षक म्हणून लाभले होते. त्यांचा शिवरामपंतांवरील प्रभाव लेखनातून ठळकपणे जाणवतो
३. (१९९२) प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षणतज्ज्ञ, अनुताई वाघ यांचे निधन
त्या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचे काम केले. पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक यांचेसोबत त्यांनी बालशिक्षणाचे कार्य केले
त्यांनी ४७ वर्षे अविरत व निरपेक्ष वृत्तीने ग्रामीण शिक्षणाचे कार्य केले. बोर्डी येथील ग्राम बालशिक्षा केंद्र व कोसबाड येथील नूतन बालशिक्षा केंद्रात अध्यापिका म्हणून त्यांनी कार्य केले
४. (२००४) हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातला अजरामर ध्रुवतारा, ठुमरी सम्राज्ञी पद्मभूषण शोभा गुर्टू यांचे निधन
त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्या शास्त्रीय संगीतात पारंगत तर होत्याच, परंतु उपशास्त्रीय संगीत गायकीवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. त्यांचे अभिनय अंगाने ठुमरी गायन रसिकप्रिय होते. लोकांनी त्यांना 'ठुमरी सम्राज्ञी' म्हणून नावाजले होते
ठुमरी, दादरा, कजरी, होरी, चैती इत्यादी उपशास्त्रीय संगीत प्रकार हे शोभाताईंची खासियत होते. आपल्या गायनात शास्त्रीय संगीतातील आलापी त्या खुबीने वापरत असत. गायिका बेगम अख्तर व उस्ताद बडे गुलाम अली खान यांच्या गायकीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. शोभाताईंच्या ठुमरी गायनाचे असंख्य चाहते होते. त्यांनी मराठी व हिंदी भाषा चित्रपटांतही पार्श्वगायन केले होते. त्यांनी सर्वप्रथम ज्या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले तो म्हणजे कमाल अमरोहींचा पाकिजा (१९७२) होय. फागुन (१९७३) मध्ये त्यांनी 'बेदर्दी बन गए कोइ जाओ मनाओ सैंयां' हे गीत गायले. मैं तुलसी तेरे आँगन की (१९७८) साठी त्यांनी गायलेल्या 'सैंया रूठ गए' गाण्याबद्दल त्यांना फिल्मफेअरचे उत्कृष्ट पार्श्वगायिकेचे नामांकन मिळाले होते. 'सामना' व 'लाल माती' ह्या मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते. गझल, मराठी नाट्य संगीत या गायन प्रकारांतही त्यांनी श्रोत्यांची दाद मिळविली. त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment