दिनविशेष ३ सप्टेंबर
दिनविशेष
दि. ३ सप्टेंबर
१. (१९२३) महाराष्ट्र शाहीर कृष्णराव गणपतराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म
ते एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात. मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक समजले जातात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली. त्यांचे ’गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले
२. (१९३५) शेतकरी चळवळीतील नेते, लेखक शरद जोशी यांचा जन्म
१९७९ पासून ’शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा, ऊस, तंबाखू, भात, कापूस, इत्यादी पिके पिकविणाऱ्या व दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व, त्यासाठी वारंवार उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने, वगैरे त्यांनी केले
३. (१९५८) निसर्ग कवी, कोकणकवी माधव केशव काटदरे यांचे निधन
माधव काटदरे यांनी निसर्गकवितांशिवाय काही ऐतिहासिक कविताही लिहिल्या. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज असे त्यांच्या कवितांचे विषय होते. याशिवाय काटदऱ्यांनी शिशुगीते व काही विनोदी कविताही लिहिल्या
४. (१९६७) थोर समाजसुधारक, वार्ताहर संपादक अनंत हरी गद्रे यांचे निधन
ते वार्ताहर, लेखक, नाटककार व थोर समाजसुधारक होते. त्यांना नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक मानले जाते
समतानंद गद्ऱ्यांकडे जाहिरात करण्याचे अनोखे कौशल्य होते. मराठी नाट्यसृष्टी संकटात असताना याच कौशल्याचा वापर करून त्यांनी नाटिका लिहिल्या. नाटकाच्या जाहिरातींत वेगळेपणा आणला. त्यांना ‘जाहिरात जनार्दन’ म्हणत. त्यांची जाहिरातक्षेत्रासाठी लागणारी ग्राहकमानसशास्त्रावरील पकड, शब्दांवरची हुकमत, संवादपटुत्व अशी व्यावसायिक कौशल्ये त्याकाळा अभूतपूर्व होती. त्यांच्या या गुणांचा उपयोग मराठी आणि हिंदी नाटक-चित्रपट निर्मात्यांनी पुरेपूर करून घेतला; पण स्वतः गद्रे त्यापासून म्हणजे त्यातून येणाऱ्या लाभापासून अलिप्तच राहिले
इ.स. १९२२ साली सुरू झालेल्या मौज ह्या साप्ताहिकातील त्यांची संपादकीयेही लोकप्रिय झाली. इ.स. १९३४ साली सुरू केलेल्या 'निर्भीड' ह्या आपल्या दुसऱ्या साप्ताहिकातून गद्ऱ्यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार करीत स्पृश्यास्पृश्यता आणि केशवपनासारख्या वाईट चालींवर कडाडून टीका केली
दलित आणि सवर्णांमधील सामाजिक दरी मिटवण्यासाठी 'झुणका-भाकर चळवळी'सारखे प्रयोग गद्ऱ्यांनी केले. 'झुणका-भाकर' चळवळीमध्ये समाज्याच्या सर्व थरांतील, सर्व जातींचे लोक एकत्र येऊन भोजन करीत असत
५. (१९६८) पत्रकार विजय चोरमारे यांचा जन्म
विजय चोरमारे हे 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक असून कवी म्हणूनही परिचित आहेत. तीन स्वतंत्र कवितासंग्रहांसह एक अनुवादित संग्रह त्यांच्या नावावर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भातील पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment