७. 'फक्त रेल्वे स्टेशनचा विकास, मात्र रेल्वे प्रवाशांवर आघात'

७. 'फक्त रेल्वे स्टेशनचा विकास, मात्र रेल्वे प्रवाशांवर आघात'


आज सर्व वर्तमानपत्रात मोदी सरकारने पूर्ण पानभर जाहिरात देऊन, रेल्वे स्थानक विकासाचा मोठा गाजावाजा केला आहे. पण हा खरचं रेल्वेचा विकास आहे का...? यावर सर्व नागरिकांनी विचार करणे आवश्यक आहे. आजच लोकसत्ता वर्तमानपत्रात एक बातमी आली आहे. वातानुकूलित डबे वाढविण्याच्या रेल्वेच्या धोरणाचा फटका नारिकांना, शयनयान डब्यांमध्ये घट, सामान्यांचा प्रवास महाग. गेल्या काही वर्षात हीच परिस्थिती सगळीकडे आहे. लांब पल्याच्या रेल्वेतील शयनयान व जनरल डब्यांची संख्या कमी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना पैशाचा मोठा भुर्दंड सहन करावा लागतच आहे. मात्र प्रवाशांना प्रवास करण्यासही अडचण निर्माण होत आहे.


मी सातारा जिल्ह्यातील रहिवाशी असून जिल्ह्यात रेल्वेचे जाळे पसरले आहे. गेल्या काही वर्षांत, विशेषत्वाने कोरोना नंतर रेल्वेमध्ये काय काय बदल झाले आहेत याचा आढावा यानिमित्ताने मी मांडत आहे. सातारा जिल्ह्यातून मुंबईला जाणारी प्रसिद्ध गाडी 'कोयना एक्स्प्रेस' याचे जनरल डबे मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे मर्यादित लोकांनाच आता या रेल्वेने प्रवास करता येत आहे. सर्वसामान्य लोकांना कमी पैशात या रेल्वेने प्रवास करता येत होता. आता मात्र त्यांना जास्त पैसे देऊन दूसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. सातारा जिल्ह्यातून रात्री मुंबईला धावणारी 'सह्याद्री एक्स्प्रेस' रेल्वेने बंद केलेली आहे. यासाठी काय कारण दिले तर महसूल मिळत नाही. पण ज्या गाडीला प्रवाशांचे वेटिंग असायचे ती गाडी तोट्यात कशी काय असू शकते...? सातारा जिल्ह्यातून पुणे - मिरज ही पॅसेंजर धावते. ही पॅसेंजर पहिल्यांदा सर्व रेल्वे स्थानकावर थांबत होती. आता मात्र ही पॅसेंजर सर्व स्थानकांवर थांबत नाही. त्यामुळे लोकांना आपल्या स्थानकांवरून आजूबाजूच्या ज्या स्थानकावर रेल्वे थांबते तेथे प्रवास करण्यासाठी जावे लागत आहे. जर प्रत्येक स्थानकावर गाडी अगोदर थांबत होती तर आता का थांबू शकत नाही. अगोदरची पॅसेंजर रेल्वेही मोठी होती ज्यामध्ये लोक आराम करू शकत होते. आताची रेल्वे मात्र लोकल टाइप आहे, त्यामध्ये प्रवास करताना अवघडल्यासारखे होते.

मागील काही वर्षात रेल्वे विभागाचा आढावा घेतल्यास आपल्याला काय दिसते. रेल्वे विभागात सध्य स्थितीत विविध प्रकारची २ लाख ६३ हजार पदे रिक्त आहेत. समाजात एवढी बेरोजगारी असताना मोदी सरकार भरती न करता कंत्राटी तत्वावर लोकांना भरत आहे. त्यामुळे रेल्वेचे मोठे नुकसान होत आहे. रेल्वेने दररोज २.५ कोटी लोक प्रवास करतात, कमी कर्मचाऱ्यांच्या समस्येमुळे त्यांना योग्य सोयीसुविधा प्रवास करताना मिळत नाहीत. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कधी आपला जीवही गमवावा लागतो. रेल्वेने मागील काही वर्षात रेल्वे प्रवासाचे दर मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहेत. रेल्वे प्लॅटफॉर्मचे तिकीट ही महाग केलेले आहे. जेष्ठ नागरिकांच्या सवलतीत ही मोठी कपात केली आहे. रेल्वे तिकीट कॅन्सलेशनचे चार्जही मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहेत. अनेक सोयीसुविधा कमी केलेल्या आहेत. तरी परवा संसदेत उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की रेल्वेवर सध्यस्थितीत ३४, १८९ कोटी रूपये कर्ज आहे. हे एवढे सगळे करूनही जरी मोठ्या प्रमाणात कर्ज राहत असेत तर येणाऱ्या काळात रेल्वे तोट्यात जाणार हे नक्की. रेल्वेने मागील काही दिवसांत एक रेल्वे आणली आहे वंदे भारत त्याचे उद्घाटन फक्त मोदीच करतात. या रेल्वेचे वैशिष्ट्य काय तर जलद प्रवास करते, रचना आकर्षक. पण या रेल्वेचे मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत. त्याच्या त्रुटी मोठ्या प्रमाणात समोर आलेल्या आहेत. या रेल्वेमुळे इतर रेल्वेवर परिणाम झाला असून सर्वसामान्य, मध्यमवर्गीय रेल्वे प्रवाशांना यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशात वंदे भारत सारखी रेल्वे चालवून भागणार नाही. त्याने सर्व प्रशाशांचे हित, संतुलन साधले जाणार नाही. त्यासाठी सर्व प्रकारच्या रेल्वे (पॅसेंजर, एक्स्प्रेस, सुपरस्टार एक्स्प्रेस) यांच्या सुधारणा व विकासावर भर द्यायला हवा.


आपण सर्व लोकांनी जीवनात कधी ना कधी रेल्वे प्रवास केलाच असेल आणि आताही करत असाल. तेव्हा आणि आता यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय याचे योग्य आकलन तुम्ही करा. तेव्हा तुम्हाला समजेल की तेव्हा आणि आताच्या परिस्थिती मध्ये काय फरक आहे. आज देशात सर्व क्षेत्रात (रेल्वेतही) जी जाहिरातबाजी, इव्हेंटबाजी चालू आहे. त्याने देशातील नागरिकांचे कधीच भले होणार नाही. आणि या अगोदरच्या नोटाबंदी, जीएसटी, टाळेबंदी वा इतर निर्णयातूनही ते झालेले नाहीये. त्यामुळे नागरिकांनी प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करावा. त्या त्या क्षेत्रातील तज्ञ लोकांनी सांगितलेली माहिती वाचावी, ऐकावी, बघावी तरच तुम्हाला त्याचे योग्य आकलन होईल. तुम्ही त्या क्षेत्राबद्दलचे योग्य आराखडे बांधू शकाल.

- विशाल पवार
९५९४४१५११५
दि. ०६ ऑगस्ट २०२३

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर