दिनविशेष १२ ऑगस्ट
दिनविशेष
दि. १२ ऑगस्ट
* जागतिक युवा दिन
जागतिक स्तरावर १२ ऑगस्ट हा दिवस 'जागतिक युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने युवकांशी निगडीत विविध पैलूंवर चर्चा घडवून आणली जाते. सृजनशील अशा युवा शक्तीच्या माध्यमातून जगभरात शांततेची स्थापना व्हावी हा यामागचा विचार आहे
संयुक्त राष्ट्रांनी १९८५ मध्ये पहिले जागतिक युवा वर्ष साजरे केले. या घटनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त १९९५ मध्ये जगातील युवावर्गाच्या स्थितीत अनुकुल बदल घडवून आणण्यासाठी ‘वर्ल्ड प्रोग्राम ऑफ ॲक्शन फॉर युथ’ स्वीकारण्यात येऊन त्या माध्यमातून मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली
या कार्यक्रमाच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्षण, रोजगार, गरिबी, आरोग्य, पर्यावरण, सहभाग, जागतिकीकरण, युवक आणि संघर्ष, एचआयव्ही एड्स आदी १५ क्षेत्रांची निवड प्राधान्याने केली. युवकांना मिळणाऱ्या संधींची संख्या वाढविणे, त्यांची गुणवत्ता वाढविणे आणि त्या माध्यमातून समाजासाठी युवकांचे योगदान वाढविणे यादिशेने या कार्यक्रमाद्वारे चांगले प्रयत्न झाले आहेत
लिस्बन येथे ८ ते १२ ऑगस्ट १९९८ दरम्यान पार पडलेल्या युवकांशी निगडीत मंत्र्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत १२ ऑगस्ट रोजी जागतिक युवा दिन साजरा करण्याची शिफारस करण्यात आली आणि त्यावर १७ डिसेंबर १९९९ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून हा दिवस जागतिक युवा दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो
सुरक्षा परिषदेने आपल्या २०१५ आणि २०१६ सालच्या ठरावात शांतीस्थापनेच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले आहे. सामाजिक न्याय आणि शांतीस्थापनेच्या अशाच प्रयत्नांना यावर्षीच्या युवा दिनाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले
युवक हा समाजात बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. युवकांना नागरिकांचे अधिकार, सामाजिक न्याय आणि विश्वशांतीच्या महत्त्वाबाबत जागरूक केले तर जगात विविध पातळ्यांवर असणारे संघर्ष, वाद कमी होऊ शकतील. अशा अनुकुल बदलासाठी युवावर्ग निश्चितपणे पुढे येईल. जनसामान्यांच्या प्रगतीसाठी जागतिक शांततेचे महत्त्व लक्षात घेता शांतता प्रस्थापित करण्यात युवकांची भूमिका महत्त्वाचे ठरणार आहे
आजचा युवक ज्ञान आणि विज्ञानाच्या विश्वात वावरणारा आहे. मानवी मुल्ये आणि मानवी विकासाबाबत त्याला चांगली जाण आहे. विज्ञान - तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्याची क्षमता त्याच्यात आहे. या क्षमतेचा उपयोग तो जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी निश्चितपणे करू शकतो. जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने या भूमिकेबाबत चर्चा होणे आणि त्यादिशेने युवकांचा सहभाग वाढणे तेवढेच महत्त्वाचे आहे
* जागतिक हत्ती दिन
दरवर्षी १२ ऑगस्ट हा दिवस 'जागतिक हत्ती दिन' म्हणून साजरा केला जातो. हत्तींच्या दुर्दशेबद्दल जनजागृती करणे आणि त्यांच्या संवर्धनाचा विचार करणे हा या दिवसाचा उद्देश आहे
हत्तीवरील हल्ले रोखण्यासाठी तसेच त्यांच्या संरक्षणासाठी एलिफंट रीइंट्रोक्शन या फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. तो दिवस होता १२ ऑगस्ट २०१२ आणि तेव्हापासून हा दिवस जागितक हत्ती दिन साजरा केला जात आहे
* राष्ट्रीय ग्रंथपाल दिन
ग्रंथालयशास्त्राचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त १२ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो
१. (१९१९) पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय अंतराळ संस्थेचे जनक, भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म
१९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे
२. (१९४८) कवी, समीक्षक व अनुवादक फकिरा मुंजाजी तथा फ. मुं. शिंदे यांचा जन्म
फ. मु. शिंदे यांचे अनेक काव्यसंग्रह प्रचंड गाजले. विशेषतः आई कविता आजही जनमानसांत तितकीच लोकप्रिय आहे
३. (१९५९) अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी भारतीय बुद्धिबळ पटू प्रवीण ठिपसे यांचा जन्म
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment