दिनविशेष २९ जुलै
दिनविशेष
दि. २९ जुलै
* आंतरराष्ट्रीय वाघ दिन - २०२३
International Tiger Day - २०२३
असं म्हटलं जातंय की वाघ जगला तर जंगल जगेल आणि पर्यायाने निसर्गातील अन्न साखळी कायम राहिल. वन्यप्राण्यांच्या अन्नसाखळीतील वाघ हा सर्वात वरचा प्राणी, निसर्गातील की स्टोन प्रजातींपैकी एक. पण नैसर्गिक अधिवास नष्टता, अवैध शिकार, तस्करी, जंगलतोड आणि इतर कारणांमुळे वाघांची संख्या कमी झाली. त्यामुळे त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २९ जूलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातोय
रशियातील सेंट पीटर्सबर्ग मध्ये २९ जुलै २०१० साली झालेल्या व्याघ्र संवर्धनाच्या शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करणे असा आहे. त्या माध्यमातून मानव-वाघ संघर्षाची दरी कमी करणे आणि निसर्गाचे संवर्धन करणे साध्य केले जाऊ शकेल
२०२२ सालच्या व्याघ्र जनगणनेमध्ये भारतात ३,१६७ वाघ असल्याचं स्पष्ट झालं आहे. २००६ ते २०१८ या काळात भारतामध्ये वाघांच्या संरक्षणासंबंधी करण्यात आलेल्या कामांमुळे वाघांची संख्या जवळपास दुप्पट म्हणजे १४०० वरून ३००० पर्यंत पोहोचली होती
भारतात एकूण ५३ व्याघ्र संरक्षित क्षेत्रे आहेत. जगातल्या ७५ टक्के वाघांचे वास्तव्य हे भारतात आहे. भारतात सध्या सर्वाधिक वाघांची संख्या ही मध्य प्रदेशमध्ये आहे. त्या खालोखाल कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र, तामिळनाडू, आसाम, केरळ, राजस्थान, ओडिशा आणि छत्तीसगडचा क्रमांक लागतो
मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे ५२६ वाघ आहेत, त्या खालोखाल कर्नाटकमध्ये ५२४ वाघ आहेत. महाराष्ट्राचा या यादीमध्ये चौथा क्रमांक लागत असून राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३१२ वाघ आहेत
भारतात सापडणारा बेंगॉल टायगर हा जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो. परंतु, अनिर्बंध शिकार आणि अधिवासावरील अतिक्रमणांमुळे त्यांची संख्या कमी होत आहे. वाघांची तस्करीसाठी अनिर्बंध शिकार, जंगलतोड आणि वाघांच्या अधिवासावर अतिक्रमण यामुळे मानव आणि वाघांमध्ये संघर्ष निर्मांण होताना दिसत आहे.
Project Tiger History : 'प्रोजेक्ट टायगर'ची सुरुवात
वाघांच्या संवर्धनासाठी १९७३ साली भारत सरकारने प्रोजेक्ट टायगर हा प्रकल्प सुरु केला. बेंगॉल टायगर म्हणजे वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. प्रोजेक्ट टायगरच्या माध्यमातून वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न सुरु झाला. प्रोजेक्ट टायगरसाठी नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन ऑथोरिटी स्थापन करण्यात आली. M-STrIPES या मॉनिटरिंग सिस्टिमच्या माध्यमातून वाघांच्या हालचालीवर पाळत ठेवण्यात आली. त्यामुळे आपोआपच त्यांच्या शिकारीवर नियंत्रण आले
१. (१८९१) बंगाली समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे निधन
ते एकोणिसाव्या शतकातील भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. बंगाली गद्याचे सुलभीकरण आणि आधुनिकीकरण करण्याचे त्यांचे प्रयत्न लक्षणीय होते
२. (१९९६) स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न अरुणा असफ अली यांचे निधन
इ. स. १९४२ सालच्या चले जाव आंदोलनात गांधीजीनी राष्ट्रास 'करो वा मरो' चे आव्हान केले. त्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंक मैदानावर भरलेल्या सभेत अरुणा असफ अलींनी काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या राजकारणात सक्रीय होत्या. त्या १९५८ मध्ये दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या. त्यांनी लिंक या नावाने प्रकाशन संस्था काढून वृत्तपत्रे, मासिके व पुस्तके प्रकाशित केली
४. (२००२) गायक व संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे निधन
हे महाराष्ट्रातील संगीतकार व गायक होते. बाबूजी या नावानेदेखील त्यांना ओळखले जाते. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीत आहे. फडके यांनी मराठी व्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपटांमध्येही गाणी गायली आणि संगीतबद्ध केली
४. (२००६) मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे निधन
ललित लेखन आणि संतसाहित्याच्या लेखनाबरोबरच त्यांची 'आस्वाद समीक्षा' साहित्य जगतात कौतुकास पात्र ठरली होती
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment