दिनविशेष २६ जून
दिनविशेष
दि. २६ जून
* जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन
दरवर्षी २६ जून हा दिवस जगभर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध विधायक उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो. युनोने १९८८ साली याची घोषणा केली. २६ जून या दिवसाला चीनमधील पहिल्या अफू युद्धाच्या काळात (१९८७) अफू व्यापारावर घातल्या गेलेल्या बंदीचा संदर्भ आहे
१. (१८७४) छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म
छत्रपती राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावांनी प्रसिद्ध होते. हे मराठ्यांच्या भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानाचे राजे (राज्यकाळ १८९४ - १९००) आणि पहिले छत्रपती (१९००-१९२२) होते
राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात
२. (१८८८) विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा जन्म
ते बालगंधर्व नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमीवरील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते होते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहूब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते
रंगभूमीवरील ५ दशकात त्यांनी २५ हुन अधिक नाटकात भूमिका केल्या. 'सिंधू' ही एकच प्याला मधील त्यांची शेवटची भूमिका
३. (२००१) लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचे निधन
ते व. पु. काळे या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी ६० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. पार्टनर, वपुर्झा, ही वाट एकटीची आणि ठिकरी ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत
प्रसिद्ध कथाकथनकार होते. त्यांचे १,६०० पेक्षा जास्त कथाकथनाचे कार्यक्रम झाले होते. ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून येणारे ते पहिले मराठी लेखक आहेत. त्यांनी भरपूर कथासंग्रह लिहले आहेत. त्यामध्ये सखी, तप्तपदी हे कथासंग्रह वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment